चिनी कापूर वृक्षाची पानगळ झाल्यानंतर ती जमिनीवर पडून कुजतात. पानात असणारा कापराचा अंश जमिनीत मिसळून इतर वनस्पतींच्या बियांची उगवणक्षमता आणि जमिनीतील उपयुक्त बुरशी नष्ट करतो. या वृक्षाचा स्थानिक परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून चिनी कापराच्या झाडांबाबतचा संदेश वेगाने पसरत आहे. वास्तविक पाहता कापूर सर्वांनाच माहीत आहे; पण हा कोठून मिळतो, हा कसा तयार करतात याबाबतची माहिती मात्र अनेकांना नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘कापराचे झाड अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते’ अशी माहिती सोशल मीडियावर काही जण देत आहेत. वास्तविक ही शास्त्रीय माहिती नाही. याबाबत सर्वांनी जागरूकता बाळगावी. कोरोना काळात ऑक्सिजनची महती सर्वांना ठाऊक झाल्याने वातावरणातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती, सर्वांत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे, असे लोकांचे मत बनले आहे. अशा गैरसमजुतींचा गैरफायदा घेण्यासाठी हल्ली याबाबतचे अनेक संदेश विविध माध्यमांतून समाजात पसरवले जात आहेत. वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब यांसारखे वृक्ष सर्वांत जास्त ऑक्सिजन हवेत सोडतात आणि वेगाने हवा शुद्धीकरणाचे कार्य करतात, हा संदेशही त्यातलाच एक भाग आहे. आता त्याच्यात भर पडली आहे कापराच्या झाडाची. पृथ्वीवरील सर्व वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि स्वतःचे अन्न तयार करतात हे सर्वांनाच माहीत आहे. सर्वच वनस्पती कमी-अधिक प्रमाणात हवेतील कार्बन डायऑक्साइड, इतर विषारी वायू शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात हे वैज्ञानिक सत्य आहे. ज्या वृक्षांचे आकार मोठे आहेत, फांद्यांची संख्या आणि विस्तार जास्त आहे, पर्णसंभार जास्त आहे असे सर्वच वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि सभोवतालची हवा शुद्ध करतात, हे विज्ञानामध्ये पूर्वीच स्पष्ट झाले आहे. मग कापूर वृक्षाचे इतके कौतुक कशासाठी आणि का?याचा विचार करावा. कापूर आणि कापराचे झाड नैसर्गिक कापूर व कृत्रिम कापूर असे कापराचे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक कापूर विविध वनस्पतींपासून मिळवला जातो. नैसर्गिक कापराचे चार प्रकार आहेत. याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. भीमसेनी कापूर (बारूस किंवा बोर्निया कापूर)
हा कापूर सुमात्रा बेटावर आढळणाऱ्या ड्रायोबॅलेनॉप्स ॲरोमेटिका (कूळ ः डायपिटिरोकारपेएसी) वृक्षापासून मिळवितात. कापराचे स्फटिक झाडांच्या मध्यभागी खोडात, जेथून फांद्या फुटतात. या भागात तसेच सालीच्या खाली तयार होतात. इंडोनेशियातील बोर्निओ बेटातून हा कापूर भारतात येतो. अगदी प्राचीन काळापासून हा कापूर प्रख्यात असून, वैदिक काळापासून आयुर्वेदात वापरला जातो. त्याच्या पातळ द्रव्यास कापूर तेल म्हणतात. हा कापूर पाण्यात बुडतो. हवेतील बाष्प शोषून घेत नाही. आयुर्वेदात यास अपक्व कर्पूर म्हणतात. या कापूर वृक्षांची लागवड पूर्वी भारतात तमिळनाडू राज्यात केल्याच्या नोंदी ग्रंथात आहेत. हा कापूर चीन, जपान, कोरिया, फार्मासा येथे आढळणाऱ्या सिनॅमोमम कॅम्फोरा (कूळ ः लॉअरेएसी) वृक्षापासून मिळवितात. हा कापूर पाण्यात बुडत नाही, हवेतील बाष्प शोषतो.वृक्षांची पाने, डहाळ्या व फांद्या पाण्यात उकळवून उर्ध्वपातन क्रियेने हा कापूर मिळवितात. या कापूर वृक्षाची लागवड आपल्या देशात प्रामुख्याने दक्षिण व पूर्व भारतातील राज्यांत अगदी कमी संख्येने केल्याचे संदर्भ आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी चिनी कापराच्या वृक्षाची लागवड बागेत केलेली दिसते. चिनी कापूर आयुर्वेदात वापरतात. चिनी कापरास पक्व कर्पूर म्हणतात. हा कापूर पाण्यापेक्षा हलका असल्याने पाण्यावर तरंगतो. हा कापूर ब्लूमिया बालसमीफेरा, ब्लूमिया डेन्सीफ्लोरा व ब्लूमिया लॅसेरा (कूळ ः ॲस्टरेसी) या क्षूपवर्गीय वनस्पतींपासून मिळतो. या सर्व वनस्पती भारतात आढळतात. ब्लूमिया लॅसेरा (भांगरूडी, भुरांडो) ही वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. या वनस्पतींच्या पानांपासून कापूर मिळवितात. हा कापूर ‘ऑसिमम किलिमॅण्डॅस्कॅरिकम’ (कर्पूरी तुळस) या ‘लॅमिएसी’ कुळातील क्षूपवर्गीय वनस्पतीपासून मिळवितात. ही वनस्पती जम्मू, डेहराडून, कोलकता, ओदिशा, निलगिरी भागांत आढळते. भीमसेनी आणि चिनी कापूर आयुर्वेदात वापरले जाणारे भीमसेनी व चिनी कापूर विदेशी वृक्षांपासून मिळवतात. या कापरांची आजही आयात केली जाते; पण आजअखेर या वृक्षांची भारतात मोठ्या प्रमाणात लागवड नाही. कृत्रिम कापूर
हा कापूर टर्पेंटाइन या रसायनावर रासायनिक क्रिया करून तयार करतात. हा कापूर आयुर्वेदिक औषधात वापरत नाहीत; फक्त पूजेसाठी वापरतात. कापराचा वापर प्रतिजैविक, बुरशीनाशक व कीटक परावर्तक म्हणूनही करतात. चिनी कापूर वृक्षाचा परिसंस्थेवर होणारा परिणाम
हल्ली चिनी कापूर वृक्षांची रोपे अनेक नर्सरींमध्ये उपलब्ध आहेत. या वृक्षाबाबत पसरविण्यात आलेला संदेश आणि कापराच्या धार्मिक महत्त्वामुळे कापूर वृक्ष आपल्याकडेही असावा, असे प्रत्येकास वाटू लागले आहे. यामुळे रोपांची विक्री जोरात सुरू आहे. कोणत्याही विदेशी वृक्षांची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी त्या वृक्षांचा आपल्या स्थानिक परिसंस्थेवर अनिष्ट परिणाम होतील का, याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. कारण निलगिरी, ग्लिरिसिडीया, सुरू, ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभूळ, विदेशी शमी यांसारख्या इतर विदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे निर्माण झालेल्या अडचणी आपण आज सहन करीत आहोत, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. चिनी कापूर वृक्षांची फळे पक्षी खातात. त्यांच्या विष्ठेतून बियांचा प्रसार वेगाने होतो. बियांची उगवणक्षमता खूप असल्याने आणि त्यांच्या रोपांची कोणत्याही हवामानात चिवटपणे तग धरून वाढण्याची क्षमता आहे. त्यामुळे कापराचे वृक्ष झपाट्याने वाढतात, फोफावतात आणि सर्वत्र वेगाने पसरतात. त्यामुळे स्थानिक वनस्पतींसाठी घातक ठरतात हे सिद्ध झाले आहे. चिनी कापूर वृक्षाची पानगळ झाल्यानंतर ती जमिनीवर पडून कुजतात. पानात असणारा कापराचा अंश जमिनीत मिसळून इतर वनस्पतींच्या बियांची उगवण क्षमता आणि जमिनीतील उपयुक्त बुरशीही नष्ट करतो. यामुळे स्थानिक परिसंस्थेवर या वृक्षांचा विपरीत परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडातील देशात या वृक्षाच्या लागवडीवर बंदी घालण्यात आली आहे. कापराचे वृक्ष नष्ट करण्यात आले असून, या वृक्षास ‘उपद्रवी वनस्पती’ म्हणून घोषित केले आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी यापुढे विदेशी वृक्ष आणि विदेशी वनस्पतींच्या मोहजालात न अडकता आणि सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या अवैज्ञानिक संदेशांना न फसता चिनी कापूर वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करू नये. देशी वृक्षांची लागवड करून आपली स्थानिक जैवविविधता संपन्न बनविण्यास सहकार्य करावे. - डॉ. मधुकर बाचूळकर, ९७३०३९९६६८, (लेखक वनस्पती तज्ज्ञ आहेत.)