छत्तीसगडमध्ये ठिबकसिंचनाचा वापर वाढत असून, या पद्धतीने घेतलेल्या टोमॅटोची काढणी करताना महिला. 
कृषी सल्ला

प्रत्येक गाव सुराज्य करण्यासाठी...

गेल्या भागामध्ये आपण छत्तीसगड येथील हवामान बदलासंदर्भात झालेले अभ्यास आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला जातो. या भागामध्ये या राज्यातील शेती, सुराज्य गाव योजना याविषयी माहिती घेऊ.

Nagesh Tekale

गेल्या भागामध्ये आपण छत्तीसगड येथील हवामान बदलासंदर्भात झालेले अभ्यास आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला जातो. या भागामध्ये या राज्यातील शेती, सुराज्य गाव योजना याविषयी माहिती घेऊ. छत्तीसगड राज्यामध्ये तीन प्रकारच्या जमिनी आढळतात. बागड  बागड ही पठारावरची सपाट जमीन असून, तेथे सोयाबीन, भात यांसारखी नगदी पिके घेतली जातात. बारहा हा जमिनीचा प्रकार उत्तम समजला जातो. यात पाणी शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक आहे. या जमिनीत कायम ओलावा असतो. या जमिनीवर स्थानिक भाताचे वाणांचे (जे ११० ते १४० दिवसांत परिपक्व होतात) उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र महानदी आणि तिच्या उपनद्यांना येणारे पूर, उशिरा येणारा पाऊस याचा या पिकावर परिणाम होत आहे. या स्थानिक वाणांची जागा आता संकरित वाणांनी घेतली आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांची उपलब्धता केली जाते. यांत्रिकीकरणाला चालना दिली जाते. अर्थात, यात शेतकऱ्यांपेक्षा विक्रेत्यांचाच अधिक फायदा होत आहे. या भागात बोअरवेलची संख्याही वेगाने वाढत आहे. डिपरा ही डोंगर टेकड्यांच्या पायथ्याची जमीन. येथे पाण्याचा निचरा वेगाने होतो. छत्तीसगडच्या कृषी विभागाने या तिन्ही प्रकारच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कृषी क्षेत्राचा वातावरण बदलाच्या दृष्टिकोनामधून सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार बागड पद्धतीमध्ये पाणी साठवून भूगर्भात जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच भागात अधिक हमीभावाची खात्री देत सेंद्रिय सोयबीन आणि भात पिकास प्रोत्साहन दिले जात आहे. बारहा पद्धतीमध्ये भाताच्या स्थानिक वाणास प्रोत्साहन दिले जात आहे. स्थानिक भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शाश्‍वत पाणीपुरवठा करून साडेचार महिन्याचे हे भात वाण वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डिपरा या जमिनीवर डोंगर उतारावर सध्या सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणावर लागवड दिसून येते. कमी पाण्यावर भरपूर उत्पादन देणाऱ्या या पिकाच्या परागसिंचनासाठी जंगलामधील मधमाश्यांचा फायदा होतो. वातावरण बदलास सामोरे जाताना सूर्यफुलाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. या राज्यात राष्ट्रीय फल उत्पादन कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी फळे, मसाला पिके, औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे उत्पादन घेऊ लागले आहेत. राज्य शासनाने कृषी उत्पादन साठवणुकीसाठी सुमारे ११० गोदामे आणि ५० शीतगृहे बांधली आहेत. ही सेवा अल्प भाड्यात शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. भारतीय हवामान खात्याशी संबंधित ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रत्येक गावामध्ये उपलब्ध केली आहे. ध्वनिक्षेपकाच्या साह्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या पावसाचा अंदाज (नेहमीसारखा की मुसळधार), वारा, वादळे, गारपीट, दुष्काळाची पूर्व सूचना, नद्यांना येणारे पूर यांची माहिती दिली जाते. छत्तीसगडमध्ये बहुतेक शेतकरी पशुपालन करतात. जंगलात मुबलक चारा असून, शासनाद्वारे काही राखीव कुरणेही विकसित केली आहेत. पशुधनापासून प्राप्त होणाऱ्या कंपोस्ट खताला शासनाचे अनुदान आहे. सुराज्य योजना  पाणी संवर्धन आणि संरक्षणाच्या विविध योजना असून, त्यात शेतकऱ्यांचा मुक्त सहभाग दिसतो. यामुळे आज या राज्यातील शेतकरी रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये फळे आणि पालेभाज्या घेताना दिसतो. ‘सुराज्य गाव योजना’ ही छत्तीसगडमधील राज्य शासनाची एक सुंदर योजना. ग्रामसभेद्वारे नियंत्रित होणाऱ्या या योजनेत ‘नारवा’, ‘गारुवा’, ‘गुवा’ आणि ‘बाड’ या चार तत्त्वावर काम चालते. त्याच्या आद्याक्षरावरून या योजनेस NGGB असेही म्हणतात.

  • नारवा (Narwa) मध्ये डोंगर, दऱ्या, जंगलामधून वाहणारे झरे, लहान नद्या यांचे लोकसहभागातून संवर्धन आणि संरक्षण.
  • गारुवा (Garuwa) मध्ये पशुपालनास प्रोत्साहन दिले जाते. दुभत्या पशूंना मोफत चारा दिला जातो.
  • गुवामध्ये या पाळीव जनावरापासून प्राप्त झालेल्या शेणापासून गावपातळीवर खत निर्मिती आणि साठवण केली जाते. गरजू शेतकऱ्यांना त्याचे मोफत वाटपही केले जाते.
  • बाड (Baad) हा चौथा प्रकार गावामधील शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहित करतो.
  • वातावरण बदलाच्या सर्वांत जास्त झळा ग्रामीण भागास विशेषतः तेथील कृषी जीवनास बसणार आहेत. जागतिक असलेल्या या समस्येस सामोरे जाण्यासाठी प्रत्येक लहान गाव हे छत्तीसगडमधील गावांप्रमाणेच सुराज्य होणे गरजेचे आहे. निसर्गाचा सन्मान करणारे गाव... चार वर्षांपूर्वी बस्तरमधील एका लहान आदिवासी गावाला भेट देण्याचा योग आला. गावाचा परिसर, घरे ही आदिवासी खेड्याप्रमाणे निसर्गाचा सन्मान करणारी पारंपरिकच. गावामधील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये गावात सुरू असलेल्या विविध योजनांची आणि लाभार्थीची नावे होती. प्रत्येक घराची स्वत:ची शेणखत साठवण जागा होती. प्रति दिन त्यातील अर्धा हिस्सा ग्रामपंचायतीला दिला जात होता. गाव परिसरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे लहान मोठे मळे होते. अनेकांच्या परसदारीही भाजीपाला लावलेला दिसत होता. किमान एक दोन फळ झाडे तरी दिसत होती. वाहणारा लहान ओढा निर्मळ पाण्याने भरून वाहत होतात. सुराज्य गाव योजनेअंतर्गत गावाला शासकीय अनुदान मिळत होते. त्याचा सर्व तपशील बोर्डावर लिहिलेला होता. अंगणवाडीमधील मुलांना प्रति दिन एक कप ताजे दूध देण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाने वाटून घेतलेली होती. या मुलांच्या आहारात स्थानिक पिकवलेली फळे आणि ताज्या भाज्यांचा समावेश होत होता. तेथील अंगणवाडीला भेट दिली, तेव्हा मला जाणवले की प्रत्येक मूल गुटगुटीत आहे. मला खरेतर प्रश्‍न पडला की आपल्याकडे असे का होऊ शकत नाही? अशी सुराज्ये आपल्याकडे का निर्माण होत नाहीत, याचा विचार करताना जाणवले की आपली मानसिकता हेच कारण आहे.

  • गावाचा विकास हा शासनाचे काम आहे, आम्ही फक्त उपभोगाचे मानकरी आहोत, हा आमचा समज.
  • सर्व काही शासकीय अनुदानातूनच व्हावे. खरे तर गावाचा विकास लोकसहभागातूनच व्हावा. आवश्यक तिथे शासकीय अनुदान जरूर असावे. त्यातही पारदर्शकता हवी. आजही गावामधील ९९ टक्के लोकांना आपल्या गावात कोणत्या कामासाठी किती अनुदान आले आणि ते कोणाला मिळाले, हेच माहीत नसते. त्यामुळे अपात्र व्यक्ती अनुदान ढापण्यात आघाडीवर असतात.
  • स्वतःपासून सुरुवात केली तरी हळूहळू गाव बदलेल. बस्तरमधील एका आदिवासी गावाने मला शिकवले की राष्ट्र बदलाची पहिली पायरी आपल्या गावापासून सुरू होते. नैसर्गिक गारव्यासाठी हवी केवळ घनदाट पर्णसंभार असलेली वृक्षसंपदा. उन्हाच्या काहिलीमध्ये दारे खिडक्या बंद करून एसी, कुलरचा गारवा घेतल्याने आपण वातावरण बदलापासून वाचू शकू, असा ज्यांचा समज असेल, त्यांना तो लखलाभ.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT