Bamboo
Bamboo Agrowon
कृषी प्रक्रिया

Bamboo : बांबू कोंबांपासून लोणचे, बिस्कीट

टीम ॲग्रोवन

सचिन शेळके, अमोल गुडले

---------------

बांबू (Bamboo) ही गवतवर्गीय बहुपयोगी औषधी वनस्पती आहे. सर्वात वेगाने विकसित होणारी आणि अष्टपैलू उपयोग असणारी वनस्पती आहे. इतर वनस्पतीच्या तुलनेत सर्वात वेगाने विकसित होणारी आणि बहुपयोगी वनस्पती म्हणून ओळखली जाते. (Bamboo Product)

कागद उद्योग, प्लायवूड, फर्निचर उद्योग, पार्टिकल बोर्ड, कोळसा, वीज निर्मिती अशा विविध उद्योगांमध्ये बांबूचा वापर केला जातो. बांबूपासून आकर्षक शोभिवंत वस्तु, टिकाऊ फर्निचर व पर्यावरण पूरक वस्तूंना परदेशातही चांगली मागणी आहे. तसेच फ्लोअरिग, बेंच टॉप, कुंपण आणि पडदे यासारख्या बांधकाम साहित्यासाठी देखील बांबूचा वापर केला जातो. त्यामुळे बांबू शेती ही आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आणि फायदेशीर आहे.

बांबू कोवळ्या कोंबांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात. बांबूच्या ताज्या आणि मऊ कोंबांपासून लोणचे, सूप, सलाड, बांबू करी इत्यादी पदार्थ बनवले जातात. तसेच बांबूचे पीठ, पास्ता, नूडल्स, बिस्कीट, जॅम, केक यासारखे अनेक खाद्यपदार्थ बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून बनवले जातात. बांबूच्या कोवळ्या कोबांपासून विविध प्रक्रिया आणि खाद्यपदार्थ निर्मितीमधून ग्रामीण भागातील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो.

औषधी गुणधर्म ः

- बांबूच्या कोवळ्या कोंबापासून बनविलेली लोणचे व कढीच्या सेवनाने अपचनाचा त्रास कमी होतो. यामुळे भूक व पचनशक्ती वाढते.

- वजन व लठ्ठपणा कमी करणे, कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे इत्यादी गुणधर्म आढळतात.

- बांबूची मुळे, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब यांचा विविध औषधांमध्ये वापर केला जातो.

- कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.

- बांबू ही खूपच तंतूमय आणि क्षारयुक्त वनस्पती आहे. यात जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ, तंतुमय पदार्थ, ॲन्टीऑक्सिडेंट तसेच विविध पोषक घटक मुबलक प्रमाणात आहेत.

कोंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ ः

१) कोंबापासून पीठ ः

प्रथम बांबूचा कोंब स्वच्छ पाण्याने धुवून सोलून त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत. तुकड्यांतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी टिश्यू पेपरवर अंकुर (लहान तुकडे) १ तास पसरवून ठेवावेत. त्यानंतर ओव्हनमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानास २२ तास वाळवून घ्यावेत. चांगल्याप्रकारे सुकलेले बांबूचे सुके काप ग्राइंडरमधून फिरवून बारीक दळून घ्यावे. तयार भुकटी १ मिमी छिद्राच्या स्टीलच्या चाळणीतून चाळून घ्यावे. उपलब्ध बांबू पीठ २५० गेजच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये सीलबंद करून फ्रीजरमध्ये साठवून ठेवावे.

२) लोणचे ः

साहित्य ः

बांबू शूट १ किलो, मिरची १०० ग्रॅम, मोहरीचे तेल ५०० ग्रॅम, लोणचे मसाला १०० ग्रॅम, जिरे ३० ग्रॅम, ओवा २० ग्रॅम, पांढरी मोहरी पावडर १२५ ग्रॅम, ॲसिटिक आम्ल २ ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम, हिंग २ ग्रॅम, मीठ ५० ग्रॅम.

कृती ः

प्रथम बांबू शूट स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर बांबू शूटची वरील साल काढून त्याचे १ सेंमी आकाराचे तुकडे करून घ्यावेत. मंद आचेवर कढईत ५ ते १० मिनिटे तेल गरम करून घ्यावे. गरम तेलामध्ये हिंग टाकून तेल कोमट करून घ्यावे. त्यानंतर मिरची, लोणचे मसाला, जिरे, ओवा, पांढरी मोहरी पावडर, ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल आणि मीठ हे सर्व जिन्नस टाकून मिश्रण चांगले एकजीव करावे. तयार मिश्रणामध्ये कोमट तेल घालून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर मिश्रणात बांबू शूटचे तुकडे घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. चांगले एकजीव झाल्यानंतर मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे. तयार लोणचे निर्जंतुक काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे.

३) बिस्कीट ः

गव्हाचे पीठ व बांबू शूटच्या पिठापासून फोर्टिफाइड कुकीज तयार केली जातात. बांबूचा बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.

साहित्य ः

गव्हाचे पीठ ८०० ग्रॅम, बांबू पीठ २०० ग्रॅम, तूप किंवा लोणी ३० ग्रॅम, साखर ४० ग्रॅम, दूध ६० मिलि आणि बेकिंग पावडर २ ग्रॅम.

कृती ः

वरील सर्व साहित्य पातेल्यामध्ये एकत्रित करून ५ ते १० मिनिटे चांगले मिसळून घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून लगदा तयार करून घ्यावा. लगदा अर्धा तास तसाच झाकून ठेवावा. लाकडी रोलिंग पिन वापरून योग्य जाडीची आणि गोलाकार बिस्किटाच्या आकाराची तयार करावीत. ही बिस्किटे ओव्हनमध्ये १८०-------- अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० मिनिटे ठेवून बेक करावीत. तयार बिस्किटे बटर पेपर मध्ये पॅक करावी.

४) भाजी ः

चिरलेला कोंब कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावा. मंद आचेवर भांड्यात तेल तापवून मोहरी, हिंग घालून फोडणी द्यावी. त्यावर चिरलेला कांदा टाकून परतून घ्यावा. नंतर त्यात शिजवून घेतलेला कोंब व भिजवलेली डाळ घालावी पुन्हा मंद आचेवर हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतावे. भाजी वाफवून चांगली शिजवून घ्यावी. नंतर किसलेले ओले खोबरे वरून पसरून सुकी भाजी तयार करावी. रस्सा भाजी करायची असेल तर भाजीत थोडे पाणी घालावे. तयार भाजीत ओले खोबरे बारीक वाटून घालावे व भाजी परतून शिजवून घ्यावी.

--------------------

- सचिन शेळके, ८८८८९९२५२२

(पीएच. डी. विद्यार्थी, अन्न विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सॅमहिंगिन बॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश)

- अमोल गुडले, ७७२०००९४७१

(बांबू तंत्रज्ञान विद्यालय, लोदगा, जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT