तांदलवाडी (जि. जळगाव) बाजार ओट्यांवर शेतकरी दर गुरुवारी शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात.
तांदलवाडी (जि. जळगाव) बाजार ओट्यांवर शेतकरी दर गुरुवारी शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात.  
ग्रामविकास

शेती, ग्रामविकासासाठी झटतेय तांदलवाडी

Chandrakant Jadhav

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी केळीवरील करपा रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक पीक व्यवस्थापन सुरू केले. त्यात सातत्यही ठेवले. गावातील युवकांनी एकत्र येत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. केळी उत्पादनासोबत दुग्ध व्यवसायाने तांदलवाडीला विकासाची दिशा दाखविली आहे.

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) हे गाव रावेर शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर आहे. तापी नदीकाठावर हे गाव वसले असून, सुमारे पाच हजार एवढी लोकसंख्या आहे. १९७६ मध्ये हतनूर धरणामुळे या गावाचे पुनर्वसन झाले. काळी कसदार जमीन, चहूबाजूला केळी व कपाशीची लागवड दिसते. हे गाव नव्याने वसले असेल तरी यासोबत काही अडचणीदेखील आल्या. पावसाळ्यात अडचणी येऊ नयेत म्हणून प्रमुख १२ शेतरस्त्यांपैकी ९ रस्त्यांचे खडीकरण झाले आहे. ट्रक थेट शेतात जाईल असे रस्ते आहेत.

केळी, कपाशीतून आली समृद्धी  

गावाचे क्षेत्र ७०० हेक्‍टर असून, ४०० हेक्‍टरवर केळी लागवड असते. उर्वरित क्षेत्रात तूर, कपाशी लागवड असते. शेती शंभर टक्के ठिबक सिंचनाखाली आहे. मागील दहा वर्षांपासून गावाने बीटी कपाशीऐवजी देशी सुधारित कापूस जातींच्या लागवडीवर भर दिला आहे. 

करपा निर्मूलनासाठी प्रयत्न    गावातील सुमारे ३०० केळी उत्पादक २०१३ पासून करपा निर्मूलनासाठी एकाचवेळी एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करीत आहेत. या सामूहिक प्रयत्नांतूनच सर्वज्ञ कृषी विज्ञान मंडळाची स्थापना झाली. मंडळातर्फे शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून दिली जातात. पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाते.

वारकरी परंपरा आणि निसर्गसंपदा   गावात अनेक वर्षांपासून ऑगस्ट महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह होतो. रोज पहाटे काकडा आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन असे कार्यक्रम होतात. गावातील वृद्ध, महिला वर्गाचा त्यात हिरिरीने सहभाग असतो. आठ दिवस कीर्तनाचे कार्यक्रम होतात.

गावकऱ्यांनी एक हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे. स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार असतो. कचऱ्याचे ढीग करणे, रस्त्यावर कचरा फेकणे असा प्रकार होत नाहीत. कुऱ्हाडबंदी, चराईबंदीदेखील केली आहे. गावात दारूबंदीचा ठराव झाला असून, त्याची माहिती उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.  गावातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. आमदार व खासदार निधीतून अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले. गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती करून तेथे ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २०१३ मध्ये गावात पाणी पुरवठा योजना झाली आहे.

लोकसहभागातून मंदिरांचा विकास 

दत्त मंदिरासाठी ग्रामस्थांनी पाच लाख रुपये वर्गणी गोळा करून पत्र्याचे दणकट शेड उभारले. तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रमाद्वारे मंदिरात सभामंडप व संरक्षण भिंतीचे काम झाले. दत्त मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये वसंत महाजन, वैभव महाजन, अमोल महाजन, वसंत पाटील यांचा सहभाग असतो. गावात व्यंकटेश श्रीराम मंदिरामध्ये लोकसहभागातून दहा लाख रुपये खर्चून सभामंडप उभारला. या मंदिराच्या कामासाठी एम. टी. चौधरी, काशिनाथ पाटील, एकनाथ पाटील, सुरेश पाटील, सुरेश रमेश पाटील, मोहन पाटील यांचा सहभाग असतो. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थ एकत्र येतात. यावेळी गावाच्या विकासाबाबत चर्चा केली जाते.

उपक्रमांना ग्रामपंचायतीचे सहकार्य  

गावात लग्नकार्य व इतर कार्यासाठी भांड्यांची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. ग्रामनिधीतील १५ टक्के रकमेतून भांडी खरेदी केली जाते. गावातील दहा व्यक्तींना मिनी चक्कीचे वितरण झाले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा १५ टक्के ग्रामनिधीतून २०० विद्यार्थांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयुर्वेदिक दवाखाना गावात सुरू झाला आहे.

दुग्ध विकासाची साथ  

 गावामध्ये १९८५ पासून अमर सहकारी दूध उत्पादक संस्था आहे. या संस्थेमध्ये दूध संकलन होते. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने गावच्या वेशीवरच वजन काटा सुरू केला आहे.याचा फायदा केळी उत्पादक आणि व्यापाऱ्यांना होतो.

समृद्ध गाव अशी ओळख 

तांदलवाडीत प्रवेश करताच आपण शहरात आलोय, असे वाटते. गावात टुमदार बंगलेही आहेत. हे दृश्‍य गाव समृद्धीची जाणीव करून देते. माजी आमदार राजाराम गणू महाजन हे याच गावचे. तेदेखील शेती करतात. जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजनदेखील याच गावचे. बाजार समिती आणि तालुक्‍याच्या इतर सहकारी संस्थांवर या गावातील व्यक्ती सातत्याने प्रतिनिधित्व करीत  आहेत.

 - श्रीकांत वसंत महाजन,  सरपंच, तांदलवाडी, ९९७५६२७२५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT