प्रदर्शनात सहभागी शेतकरी
प्रदर्शनात सहभागी शेतकरी 
इव्हेंट्स

दुष्काळातही आम्ही जिद्द सोडलेली नाही !

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : 'दुष्काळाचे सर्वांत जास्त चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यात काही शेतकरी रक्ताचे पाणी करून २४ तास शेतीमध्ये लढत आहेत. ते अभिमानाने सांगतात "होय...दुष्काळ आहे; पण मला माहीत नाही!" सकाळ अॅग्रोवनच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या निमित्ताने दुष्काळाशी लढणाऱ्या बहाद्दूर शेतकऱ्यांच्या यशोगाथा चर्चिल्या जात आहेत. त्यातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळते आहे. औरंगाबादच्या पाचोडे गावचे नारायणराव घोडके यांनी दुष्काळी स्थितीत सर्व लक्ष दूधदुभत्या जनावरांवर केंद्रित केले आहे." माझ्या तीन होलस्टिन फ्रिजियन गाईंपासून सुमारे ५० लिटर दूध मिळते. सहकारी किंवा खासगी डेअरीमध्ये दुधाला २०-२२ रुपये प्रतिलिटर दर दिला जातो, त्यामुळे मी स्वतः शहरात दूध विक्रीसाठी नेतो. तिथे ४० रुपये दराने दूध विकले जाते. दुष्काळात पिकांनी दगा दिला, तरी दुभती जनावरे समस्येतून सोडवतील, हे माझ्या लक्षात आले आहे. दुष्काळातही याच शाश्वत उत्पन्नाचा आधार मिळाला आहे,`` असे श्री. घोडके यांनी सांगितले.शेतकऱ्याने कोणता तरी कृषीपुरक व्यवसाय केला पाहिजे. स्वतःच्या पिकाचे किंवा प्रक्रिया उत्पादनाचे मार्केटिंग स्वतः करायला हवे. दुसऱ्यावर विसंबल्यास ते तुमचा नफा लाटणारच. मला तरी दूध व्यवसायाने दुष्काळात सावरले आहे, असे श्री. घोडके सांगतात. जालना जिल्ह्यातील मालखेडा (ता. भोकदन) येथील रामकिसन पाटील यांना विहीर पुनर्भरणाचा फायदा झाला. गावामध्ये स्वाध्याय परिवाराने दिलेल्या संदेशानुसार २०११ मध्ये त्यांनी सहा हजार रुपये खर्चून विहीर पुनर्भरण केले. एक लिटर पाणी जिरवा, तुम्हाला ५० लिटर पाणी मिळेल, हे म्हणणे सत्य झाले. दुसऱ्या उन्हाळ्यात पाण्याची वणवण करावी लागली नसल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. श्री. पाटील यांनी चार वर्षांपूर्वी दहा परस दुसरी विहीर खोदली. मात्र, त्याच वेळी सात एकर शेतीमधील सर्व पाणी एका जागी आणले. पुनर्भरण केले. सर्व शेती ठिबकखाली आणली. पुनर्भरणामुळे त्यांना पाणीटंचाई अशी जाणवलीच नाही. " मला तीन एकरांत अद्रकापासून साडेपाच लाख रुपये मिळाले. अजून दोन एकर पीक उभे आहे. अनुदानाची वाट न बघता शेतकऱ्याने मिळेल त्यामार्गाने पाणीबचत केली पाहिजे,`` असा संदेश श्री. पाटील देतात. भोकरदन तालुक्यातील सुभानपूरचे पुरुषोत्तम माणिकराव सुसर हेदेखील दुष्काळाशी अशीच झुंज देत आहेत. त्यांनी विहीर पुनर्भरणासाठी यंत्रांची मदत घेतली. प्रतितास ८५० रुपये दराने त्यांनी २० तास जेसीबी चालवून दहा एकर शेताचे पाणी विहिरीकडे वळवले. सात परसाच्या विहिरीला त्यांनी १८० फुटांचे आडवे बोअर मारले. यामुळे विहिरीतून चार दिवस सात फुटांपर्यंत पाणी मिळते. विहीर पुनर्भरणामुळे पाण्याची शाश्वती आल्याने मी दीड एकर अद्रक, दीड एकर टोमॅटो, सहा एकर कपाशी याशिवाय एक एकर मूग, उडीद अशी पिके घेतली आहेत. आतापर्यंत तरी दुष्काळ जाणवला नाही. आमच्या गावात ३० शेतकऱ्यांनी विहिरीचे पुनर्भरण केले असून, प्रत्येक शेतकऱ्याने हाच प्रयोग करण्याचा सल्ला श्री. सुसर देतात. याच सुभानपूरमधील काही शेतकरी अक्षरशः टॅंकरच्या जोरावर शेती करीत आहेत. “पाणी नाही म्हणून आम्ही पिके सोडून दिली नाहीत. जिद्दीने थेंबभर पाण्यात पिके जगविली. ऐन दुष्काळात जादा नसला, तरी गरजेपुरते उत्पन्न मिळवत असल्याचे येथील शेतकरी सांगतात. पांडुरंग देवराम गाडे हे त्यापैकीच एक. ते म्हणाले, “२७ जूनला एक एकरवर टरबूज लावला होता. ७० दिवसांचे पीक पाणी नसल्याने वाया जाऊ लागले. मग ७०० रुपये प्रतिखेप प्रमाणे ५० खेपा टॅंकरने पाणी दिले. या जिद्दीमुळे टरबुजातून मला ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांच्याप्रमाणेच सुभान किसन गाडे यांनीही ४० हजार रुपये खर्चून टॅंकर आणि ठिबकवर अद्रक पिकवले. त्यांनाही दीड लाख रुपये नफा झाला.`` जालना जिल्ह्यातील शिंदे वडगाव (ता. घनसांगवी) येथील श्रीधर विश्वनाथ भुतेकरही दुष्काळाशी जबरदस्त संघर्ष करीत आहेत. ९ परस खोल विहिरीच्या आधारे ते दहा एकर शेती कसत आहेत. विहिरीवर दोन तास मोटर चालते. पाण्याचा साठा हाच धनाचा साठा समजून त्यांनी तीन कोटी लिटर्सचे शेततळे बनवले आहे. यशस्वी पाणी नियोजनामुळे ते ऐन दुष्काळातही १५० टन केळी आणि १०० टन ऊस उत्पादन मिळू शकेल, असा अंदाज आहे. “पाण्याचे नियोजन केल्यास हवे ते साध्य होते. आपली पिके आणि आपल्याला वाचवण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. लढल्याशिवाय शेती आणि शेतकरी देखील वाचणार नाही,`` असा स्पष्ट संदेश श्री. भुतेकर देतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT