पूर्वार्ध
राज्यात दररोज अनेक पशुबाजारातून (Animal Market) जनावरांची खरेदी-विक्री होत असते. अनेक कारणांसाठी ही खरेदी-विक्री होताना दिसते. घेणारा हा आपापल्या बजेटनुसार, आवडीनुसार व गरजेनुसार जनावर खरेदी करत असतो.
देणारा सुद्धा अनेक कारणांसाठी किंवा एक व्यवसाय म्हणून पशुधन विक्री (Livestock sale) करत असतो. यामध्ये बाजार समिती, खरेदी विक्री करणारे पशुपालक, दलाल, काही वेळेला पशुवैद्यक व इतर मग शिंगे घोळणारे, पायाचे खूर कापणारे दोरखंड विकणारे आणि आनुषंगिक सेवा देणाऱ्यांचा सहभाग असतो.
त्यात आपापल्या परीने प्रत्येक जण आपापला सहभाग नोंदवत असतो. यामध्ये माध्यमातून आपण फसवणुकीच्या बातम्या, बाजारातील चढ-उतार, पशुधन बाजारभाव काही वेळा पशुधन वाहतूक करताना होणारे अपघात वगैरे संबंधी बातम्यासुद्धा वाचायला मिळत असतात.
राज्यातील एकूण दुग्ध व्यवसायाची परिस्थिती, पशुधन खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर उत्पन्नाची सोय, वाढलेल्या सिंचन सुविधांमुळे उपलब्ध शेती उत्पादनातील कमाई, शेतीला खताची आवश्यकता आणि सोबत दुग्ध व्यवसायासाठी असणारे पूरक वातावरण याचा विचार करून अनेक पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार, नव पशुपालक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी या व्यवसायाकडे वळताना दिसतात.
जे पहिल्यापासून या व्यवसायात आहेत ते नवनवीन पशुधन खरेदी करून आपला मूळ व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी लागणाऱ्या चांगल्या प्रतीच्या जातिवंत जनावरांच्या खरेदीसाठी भरमसाट गुंतवणूक करण्याची तयारीही ठेवतात.
राज्यातील मोठ-मोठी पशुप्रदर्शने, जनावरांचे बाजार, हातातील अँड्रॉइड मोबाईल त्याचबरोबर फेसबुक, व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमांतून संपर्क, व्हिडिओ संपर्कातून प्रत्यक्ष पशुधन पाहणी, त्यावरील जाहिराती, उपलब्ध चांगल्या दळणवळण सुविधेमुळे आज काल पशुधन खरेदी-विक्री सुलभ झाली आहे, असं म्हणायला बराच वाव आहे.
स्थानिक खरेदी-विक्री बरोबरच राज्यात परराज्यांतून देखील पशुधन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. अनेक पशुपालक गुजरात, पंजाब, हरियाना, कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात पशुधन खरेदी करताना दिसतात.
पण त्याची ना नोंद, ना माहिती कुठे उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीसह अनेक तांत्रिक बाबीचे उल्लंघन होताना दिसते. त्याच्या होणाऱ्या दूरगामी परिणामाबाबत कोणालाही सोयरसूतक नाही, असे खेदाने नमूद करावे लागते.
अगदी सुरुवातीच्या काळात सत्तरच्या दशकात राज्यात नुकतेच ऑपरेशन फ्लडसारख्या योजनांमुळे त्याचबरोबर दूध संस्थांचे जाळे, पायाभूत सुविधा, अनुदानित शासकीय योजना, बँका विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये केलेला पतपुरवठा यामुळे तुलनेने आपल्या पूर्वी दुग्ध व्यवसायात उतरलेल्या पंजाब, गुजरात, कर्नाटक राज्यांतून मोठ्या प्रमाणात गायी- म्हशी खरेदी केल्या गेल्या.
परंतु आता जवळपास पन्नास वर्षांचा काळ लोटला तरी देखील आपण पशुधन खरेदीसाठी परराज्यांत जातो हे कुठेतरी निश्चितपणे आत्मचिंतन करावे लावणारे आहे.
राज्यात तुलनेने कमी दूध देणाऱ्या म्हशींच्या जाती, आनुवंशिक सुधारणेच्या माध्यमातून जादा दूध देणाऱ्या गाई-म्हशींची निर्मिती करण्यात आलेलं अपयश, सोबत वासरं-रेडकं संगोपन, त्यांना आपल्या गोठ्यातील उद्याची गाय-म्हैस आहे असे समजून जे व्यवस्थापन हवे त्याकडे होणारे दुर्लक्ष, सोबत वासरू- रेडकु हे दुधात येईपर्यंत लागणारा अनुक्रमे अडीच ते चार वर्षांचा कालावधी, त्यासाठी धीर धरण्याची तयारी, त्याबाबतची मानसिकता नसल्यामुळे अनेक पशुपालक परराज्यांतून पशुधन खरेदीकडे वळताना दिसतात.
नुकतेच विदर्भ-मराठवाड्यात ११ हजार दुधाळ जनावरांचे वाटप करण्याचे व त्यासाठी ३०० कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे देखील आपण माध्यमातून वाचले आहे.
‘एनडीडीबी’च्या माध्यमातून या ११ हजार दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात येणार आहे. अनेक इतर शासकीय योजनांमधून देखील अशी दुधाळ जनावरे नजीकच्या परराज्यांतून खरेदी करण्याविषयी अटी घालण्यात आलेल्या आहेत.
त्याप्रमाणे या योजनादेखील राबवल्या जात असतात. एकूण परिस्थिती आणि गरज ओळखून परराज्यांतून अजून काही दिवस खरेदी करायचा निश्चित हरकत नाही. या विषयाकडे प्रत्येक जण कसं पाहतो त्यावर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत.
पण हा आंतरराज्य गाई-म्हशीचा व्यापार करत असताना, परराज्यांतून जनावरे आणताना त्याबाबत जी काळजी घेणे अपेक्षित आहे ती आपल्या सर्वांना घ्यावीच लागेल, अन्यथा फार मोठा धोका यातून निर्माण होऊ शकतो.
परराज्यांतून गाई-म्हशींची वाहतूक करताना देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये पशुधन जखमी होणार नाही, वाहतुकीच्या दरम्यान त्यांना योग्य आहार आणि विश्रांती सोबत योग्य ठिकाणी पाण्याची सोय करणे अत्यंत आवश्यक आहे.
लांबच्या प्रवासात जनावरे तणावाखाली येतात आणि त्यानंतर सुप्त अवस्थेमध्ये असणारे इतर आजार डोके वर काढतात याचा खूप मोठा फटका पशुपालकांना बसू शकतो. म्हणून शासकीय नियमाप्रमाणे वाहनांमध्ये जितकी जनावरे बसू शकतात तितकीच जनावरे लोड करणे त्यांना योग्य निवाऱ्याची सोय करणे आवश्यक ठरते.
पुष्कळ वेळेला वेगवेगळ्या गोठ्यातील आपण जनावरे खरेदी केलेली असतात ती एकमेकांस अपरिचित असल्यामुळे एकत्र ठेवल्याने चकमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवासापूर्वी त्यांना एखादा दिवस एकत्र ठेवणं केव्हाही चांगलं. त्याचबरोबर शिंगे असणाऱ्या जनावरांमुळे इजा होऊ शकतात, त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रवासात जनावरांची हाताळणी करत असताना कोणत्याही परिस्थितीत जनावरांना ताण येणार नाही, याची काळजी संबंधितांनी घेणे आवश्यक आहे. सोबत आपल्या मार्गावरील सर्व पशुवैद्यकीय संस्था यांचे नाव, पत्ते, संबंधित अधिकारी यांचे संपर्क क्रमांक जर आपल्याला उपलब्ध झाले तर त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला वाहतूक करताना होऊ शकतो.
अनेक वेळेला जनावरे ही गाभण खरेदी केली जातात. त्यामुळे अशा जनावरांची विशेष काळजी घ्यावी. जनावरे वाहनांमध्ये चढवत असताना व उतरवत असताना देखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
अनेक वेळेला लांबच्या प्रवासानंतर पशुधन ज्या वेळी घरी येते त्या वेळेला आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकांना आपण येण्याची कल्पना दिल्यास पुढे होणारे नुकसान आपल्याला निश्चित टाळता येईल.
महत्त्वाचे म्हणजे ‘प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा - १९६०’ अंतर्गत पशुधन वाहतूक २००१ मधील नियम क्रमांक ९६ न्वये जनावरे ही संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असायला हवीत.
(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.