तापमानावर लक्ष ठेवून हिवाळ्यात जनावराच्या आहारात बदल करावा.
वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास घातक ठरतात. त्यामुळे वातावरणातील बदलांप्रमाणे आहार, निवारा व आरोग्य व्यवस्थापनामध्ये बदल करून जनावरांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. हवामानातील बदलानुसार जनावरांचा आहार, आरोग्य व निवारा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करावे. निवाऱ्याच्या प्रकाराप्रमाणे आवश्यक बदल करावेत. जेणेकरून थंड हवेपासून जनावरांचे संरक्षण करता येईल. जनावरे जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहतील याकडे लक्ष द्यावे. मुक्त संचार गोठ्यांमध्ये तसेच विनाभिंतीच्या गोठ्यांना बाहेरील बाजूने गोणपाट किंवा टारपोलीनचे आच्छादन लावावे. त्यामुळे थंड हवा गोठ्यात येणार नाही.
नवजात वासरे, शेळीची पिले रात्रीच्या वेळी उबदार खोलीत ठेवावीत. रात्रीच्या वेळी खोली गरम राहावी यासाठी जास्त वॉटचे बल्ब लावावेत.निवाऱ्याच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.वासरांना उबदार ठिकाणी ठेवावे किंवा गोणपाट, कपड्याचे अंगावर आच्छादन घालावे. गोठ्यात बसायच्या ठिकाणी २ ते ४ इंच जाडीचा भुसा टाकावा.निवाऱ्याच्या ठिकाणाची दिवसातून गरजेप्रमाणे १ ते २ वेळा स्वच्छता करावी.हिवाळ्यात जनावरांना थंड पाण्याने अंघोळ घालणे टाळावे.थंडीच्या दिवसांत म्हशींचे केस कापणे टाळावे जेणेकरून थंडीपासून संरक्षण मिळेल.गोठ्यातील निवाऱ्याची जागा थंड व ओलसर राहणार नाही याची काळजी घ्यावी. ओलसर व थंड जागेमुळे जनावरांना विविध संसर्गजन्य आजार (फुफ्फुसदाह, जुलाब, कॉक्सिडीओंसिस) होतात.गोठ्यामध्ये सिमेंट काँक्रीट केले असेल, तर हिवाळ्याच्या दिवसांत ४ ते ६ इंच जाडीचे भुसा किंवा शेतातील टाकावू घटकांचे कोरडे आवरण (भुसा, गुळी, कुट्टी) तयार करावे जेणेकरून थंड जमिनीपासून जनावरांचे संरक्षण करता येईल.हिवाळ्यात जनावरांना संतुलित ऊर्जासंपन्न आहार द्यावा. जेणेकरून शरीरात भरपूर ऊर्जा निर्माण होईल. वाळलेला चारा, हिरवा चारा तसेच खुराक पुरविण्यात यावा.हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे जनावरांना त्यांच्या शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे नेहमीपेक्षा आहारात ऊर्जा पुरविणारे घटक जास्त प्रमाणत देण्यात यावेत.नवजात वासरे ही थंड वातावरणात जास्त वेळ तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आहारात पोटभर दूध पाजावे व थंड वातावरणापासून संरक्षण करावे.आहारात नियमितपणे किमान ५० ग्रॅम खनिज क्षार मिश्रण पुरवठा करण्यात यावा. पिण्यासाठी स्वच्छ व कोमट पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.अतिथंड वातावरणात जनावरांचे २१ दिवसांच्या अंतराने किमान २ वेळा जंतनाशन करून घ्यावे.हिवाळ्यात म्हशींमध्ये उवा, लिखांचा प्रादुर्भाव वाढतो त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. गोठा आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी. गरजेप्रमाणे गोठ्यामध्ये गोचीडनाशकांची फवारणी करून घ्यावी.हिवाळ्याच्या दिवसात गाई, म्हशी वितात. दुग्ध उत्पादन सुरुवातीच्या टप्प्यात असते. विण्याच्या किंवा दुग्ध उत्पादनाच्या सुरुवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मायांग बाहेर येणे, दुग्धज्वर यांसारखे (कॅल्शिअम कमतरता) आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जनावरांच्या आहारात कॅल्शिअमचा (कॅल्शिअम जेल किंवा द्रावण) पुरवठा योग्य मात्रेत करावा. आजारी जनावरे कायम निरीक्षणाखाली ठेवावीत, जेणेकरून तात्काळ उपचार करता येतील.हिवाळ्यात दुभत्या जनावरांना ग्लुकोज द्रावण गरजेप्रमाणे पाजावे.हिवाळ्यामध्ये शेळ्या-मेंढ्यामध्ये पी.पी.आर., घटसर्प तसेच देवी यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. संपर्क ः डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३ डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३ (चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर