मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावरांच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात.
मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावरांच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. 
कृषी पूरक

...असा बांधा मुक्त संचार गोठा आणि जपा जनावरांचे आरोग्य

डॉ. के. डब्लू. सरप, डॉ. एस. यू. नेमाडे

बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या टाळण्याकरिता मुक्त हवेशीर गोठा हा चांगला पर्याय आहे. गोठ्यामध्ये सोयीनुसार फेरबदल करता येतात. असे गोठे बहुउद्देशीय असतात. किरकोळ बदलासह सर्व प्रकारच्या जनावरांसाठी सर्व हंगामांत उपयोगी येतात. विस्तार करण्यास सुलभ असतात.   पारंपरिक बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये जनावरे रात्रंदिवस गोठ्यामध्ये एकाच जागेवर ठेवली जातात. चारा, पाणी व औषधोपचार गोठ्यातच केला जातो. बंदिस्त गोठा बांधण्याकरिता मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असते. गोठा व्यवस्थापन, औषधोपचार व मजूर यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. याउलट संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडीचा वाढीचा दर, वाढीच्या काळात जोपसण्याचा खर्च, दुभत्या गाई, म्हशींचे दूध उत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा दिसून आली आहे. मुक्त हवेशीर गोठ्यांची उभारणी

  • जमिनीच्या पातळीपासून थोडासा (०.३ – ०.५ मीटर) उंचवटा आणि पुरेसा आडोसा तयार करून जनावरांना निवाऱ्याची सोय करावी.
  • गोठ्याच्या बाहेरील (लांबीला समांतर) १/३ भाग छताने झाकलेला आणि मध्यभागी २/३ भाग उघडा ठेवला जातो.
  • थंडी, सूर्यप्रकाश, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी जनावरे छताने झाकलेल्या भागाखाली येऊन थांबतात. इतर वेळी जनावरे मोकळ्या जागेवर विश्रांती घेतात.
  • लांबीला समांतर, बाहेरील दोन्ही बाजूला छताखाली चारा टाकण्यासाठी जागा व गव्हाण करावी. रुंदीला समांतर दोन्ही बाजूला छताखाली निम्म्या उंचीची भिंत (१.५ मीटर उंच) लोखंडी पाइप किंवा तारेच्या साह्याने कुंपण करावे. अशा गोठ्यात जनावरे दोर, साखळीने बांधली जात नाहीत. रात्रंदिवस मुक्त असतात.
  • जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि खनिजयुक्त चाटण विटा ठेवण्यासाठी गोठ्यामध्ये वेगळी सोय केलेली असते.
  • दोहनगृहामध्ये गाई, म्हशीचे दूध काढले जाते.
  • फायदे

  • गाई, म्हशी गोठ्यामध्ये मुक्तपणे संचार करत असल्यामुळे मानसिक ताणाखाली राहत नाहीत.
  • गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी व क्षार मिश्रण खातात, त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात.
  • मुक्त संचारामुळे जनावरांना व्यायाम मिळतो, प्रकृती निरोगी राहते, भूक आणि आहार क्षमता वाढते.
  • जनावरांचा स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते.
  • मजावरील गाय, म्हैस लवकर ओळखता येते.
  • थंडीच्या वेळी गाई, म्हशी अधिक वेळ चारा खातात, अधिक वेळ बसून विश्रांती घेतात, रवंथ करतात, त्यामुळे अन्नद्रव्याची पाचकता वाढते.
  • दूध उत्पादनासाठी अन्नद्रव्ये कार्यक्षमतेने वापरली जातात. वासरांची जलद वाढ होते.
  • मजूर व चारा व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो. निर्जंतुकीकरण, साफसफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो.
  • क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक जनावरे ठराविक कालावधीकरिता सामावू शकतात.
  • बांधकामासाठी खर्च कमी लागतो.
  • नुकसानीचा धोका कमी असतो.
  • या गोठा पद्धतीमध्ये जनावरांच्या शरीरातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. गायी अधिक पाणी पितात.
  • रचना

  • गोठ्याची लांबी, रुंदी पूर्व-पश्चिम असावी. त्यामुळे गोठ्यात दिवसभर सावली राहते. परंतु पश्चिम बाजूला उंच झाडे असतील तर लांबीची दिशा दक्षिण – उत्तर ठेवण्यास हरकत नाही.
  • गोठ्याच्या लांबी-रुंदीचे प्रमाण ३:२ किंवा ५:४ असे असावे.
  • गोठ्यामध्ये जनावरांना उभे राहण्यासाठी लागणाऱ्या जागेपेक्षा हालचाल करण्यासाठी दुप्पट जागा लागते. म्हशीच्या शिंगाचा आकार पसरट असल्यामुळे गोठ्यात प्रत्येक गाईपेक्षा (४० चौ.फूट / ३ – ५ चौ. मीटर) म्हशीला (४५ चौ .फूट / ४ चौ. मीटर) अधिक जागा लागते. उघडी जागा त्यापेक्षा दुप्पट लागते, परंतु मुक्त व्यवस्थापनामध्ये गाई, म्हशी दिवसभर चारवयास जात असतील तर मुक्त हवेशीर गोठ्याची आवश्यकता भासत नाही. परंतु बंदिस्त व्यवस्थापनामध्ये २० x ३० मीटर आकाराचा दुतर्फी गोठा ४० म्हशी किंवा ५० गाईंना पुरेसा होतो.
  • गोठ्यातील जमीन टणक, सपाट, खडबडीत स्वच्छता करण्यास सुलभ असावी. जमीन गुळगुळीत, निसरडी नसावी. दगडी शहाबादी फरशीचा वापर करू नये. मुरूम टाकून तयार केलेली तळजमीन उष्णतेचा मंद वाहक आहे, ही जमीन पाणीदेखील शोषून घेते.
  • गोठ्यामध्ये लांबीला समांतर प्रत्येक ३ मीटर अंतरावर उभे लोखंडी पाइप, लाकडी खांब (१० से.मी. व्यास) किंवा विटांचे बांधकाम सिमेंट कॉंक्रीटचे खांब व खांबावर लोखंडी ॲंगलचा आधार द्यावा. लोखंडी ॲंगलवर नटबोल्टच्या साह्याने छत बसवावे.
  • छत सर्व हंगामात आरामदायक व आर्थिक दृष्टीने परवडण्यासारखे असावे. छताची उंची आतल्या बाजूला ३ मीटर व बाहेरच्या बाजूला (गव्हाणीची बाजू) २ मीटर ठेवावी. छताला २५ ते ३५ अंशाचा बाहेरच्या बाजूला उतार द्यावा. त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्यात किंवा गव्हाणीमध्ये येणार नाही.
  • पत्र्याचे छत असल्यास पत्र्याच्या आतील बाजूस काळा रंग लावावा किंवा बारदान, ताडपत्रीचे अस्तर लावावे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून संरक्षण होते. उन्हाळ्यात छतावर वाळलेली वैरण पसरावी. पाण्याचे फवारे मारावे किंवा पांढरा रंग लावावा, त्यामुळे सूर्यकिरण परावर्तीत होऊन पत्र्याचे छत गरम होणार नाही.
  • गव्हाण लांबीला समांतर बाहेरच्या बाजूला असावी. गव्हाणीची उंची ०.६ मीटर, रुंदी ०.७५ मीटर व खोली ०.५ मीटर ठेवावी.
  • गोठ्याच्या लांबीला समांतर, जनावरांच्या मागच्या बाजूला ०.३ मीटर रुंद व ५ ते १० से.मी. खोल गटार बांधावे. गटाराला २.५ ते ३ टक्के उतार द्यावा.
  • गव्हाणीच्या बाहेरील बाजूस लांबीला समांतर ०.७५ ते १ मीटर रुंद छताने झाकलेली जागा चारा टाकण्याची असावी.
  • संपर्क ः डॉ. के. डब्लू. सरप, ९०९६८७०५५० (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT