diseases cycle
diseases cycle 
कृषी पूरक

काळपुळी आजाराबाबत दक्ष राहा...

डॉ. सुधाकर आवंडकर, 

साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या जनावरांमध्ये अचानक काळपुळी आजाराच्या प्रादुर्भावामुळे मरतुक दिसते.हा आजार बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूमुळे होतो. हा आजार गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, श्वान, अश्व, वराह तसेच माणसात होऊ शकतो. काळपुळी हा सस्तन प्राण्यांमध्ये होणारा संसर्गजन्य आणि अत्यंत घातक आजार आहे. हा आजार बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूमुळे  होतो. हा आजार गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, श्वान, अश्व, वराह तसेच माणसात होऊ शकतो. या आजारात जिवाणू अत्यंत घातक विष तयार  करतात. त्यामुळे जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आणि अचानक मरतुक दिसून येते.  प्रसार 

  •  बॅसिलस अँथ्रॅसिस हा जिवाणू बाधित प्राण्यांचे केस, लोकर, हाडे, मांस यांमधून प्रसार पावतो. मरतुक सडल्यानंतर हे जिवाणू बीज तयार करतात. हे बीज अत्यंत रोधी असतात. मातीमध्ये सुमारे साठ वर्षांपर्यंत टिकून राहू शकतात. 
  • दूषित मातीच्या संपर्कातून हे जिवाणू बीज खाण्यावाटे किंवा जखमेवाटे प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. 
  • आजाराचा प्रसार शक्यतो बाधित प्राणी किंवा मनुष्यापासून निरोगी प्राणी अथवा मनुष्यात होत नाही. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो. या आजारात मृत्यू येण्याचे प्रमाण अतिशय जास्त असते. 
  • संवेदनाक्षम  प्राण्यांमध्ये मृत्युदर ९० ते १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. प्राण्यांमध्ये प्रतिकारशक्ती असल्यास मृत्युदर कमी आढळतो. आजाराच्या सौम्य आणि तीव्र प्रकारानुसार मृत्युदरात बदल जाणवतात.
  • आजाराचा स्थिती 

  • आजाराचा पूर्व काळ ३ ते ७ दिवसांचा असतो. 
  • जिवाणू श्वसन, वैरण किंवा जखमेतून शरीरात प्रवेश करतात. 
  • त्या ठिकाणाहून ते मॅक्रोफेज या पांढऱ्या रक्तपेशींच्या मार्फत लसिका ग्रंथींमध्ये जातात. 
  • लसिका ग्रंथींमध्ये त्यांची झपाट्याने वाढ होते. वाढ होत असताना ते लीथल आणि एडीमा नावाची अत्यंत घातक विष तयार करतात. 
  • एडीमा विषामुळे शरीर आणि अवयवांवर आत्यंतिक सूज येते. तीव्र विषबाधा होऊन बाधित जनावर मृत्यू पावते.
  • लक्षणे 

  •  साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या जनावरांमध्ये अचानक मरतुक होते.
  • फार कमी जनावरांमध्ये २४ तासांच्या आत कधी कधी थरथरणे, ताप येणे, श्वसनास त्रास होणे, जमिनीवर आडवे पडणे, झटके येणे आणि मृत्यू होणे असा क्रम दिसून येतो. 
  • बाधित जनावर चारा खाणे, रवंथ करणे व दूध देणे बंद करते. श्वासोच्छ्वास जलद चालतो. प्राणी मूर्छित होतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. डोळे लाल होतात. काही जनावरांच्या मानेवर, पाठीवर किंवा जांघेत सूज येते. 
  • बाधित मेंढ्या गरगर फिरू लागतात आणि अचानक मरतात. 
  • घोड्याच्या पोटात कळा येतात. ऊठबस करतात, जमिनीवर पडून पाय झाडतात, घाम येतो, मान, मांड्या वगैरे मांसल भागांवर गरम व दुखरी सूज येते. मात्र ती थोड्याच अवधीत थंड पडते. 
  • आजारी जनावर दोन-तीन दिवसांत अशक्त होऊन मृत्यू पावते. 
  • मेलेल्या बाधित जनावराचे मांस खाऊन डुकरांनाही हा आजार जडतो. त्यांच्यात ताप, गळ्यावर सूज येणे, तोंडातून फेस येणे, नरडे बंद होऊन गुदमरणे अशी लक्षणे दिसतात. एक ते दीड दिवसात मृत्यू येतो. मेलेल्या जनावराचे मांस खाऊन कुत्री, मांजरे व पक्षी यांच्यातही या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  • मृत्यू झालेल्या जनावराचे रक्त गोठत नाही. ते पातळ आणि काळपट पडते. काही जनावरांमध्ये हे रक्त नाक, तोंड, कान आणि गुदद्वारातून बाहेर आलेले दिसते.
  • मनुष्यांत त्वचा, फुफ्फुस आणि आतड्यांमध्ये लक्षणे दिसतात. त्वचेवर संपर्काचे ठिकाणी लहानशी पुरळ येऊन आजूबाजूला वाढत जाते. त्याभोवती सूज येते. रक्तात जिवाणू अथवा विष संसर्ग झाल्यास ताप येऊ शकतो.
  • फुफ्फुसात हा आजार जडण्याचे प्रमाण बहुधा लोकर व केस यांच्यापासून वस्तू तयार करण्याच्या कारखान्यातील कामगारांपर्यंत मर्यादित असते. यामध्ये फुफ्फुसावर सूज येते. श्वसनास त्रास होतो. 
  • बाधित दूध, मांस चांगले शिजवून न घेतल्यास आतड्यात जिवाणू संसर्ग होण्याची शक्यता असते. अशावेळी उलट्या, पोटदुखी आणि अतिसार ही लक्षणे दिसतात.
  • आजाराचे निदान 

  • सशक्त जनावर गोठ्यात किंवा कुरणात अचानक मृत झाल्याचे दिसून येते. त्यास फऱ्या, गळसुजी किंवा काही विषबाधा झाल्यासारखे वाटते. म्हणून या आजाराचे शीघ्र रोग निदान आवश्यक असते.
  • पूर्व-इतिहास आणि लक्षणांवरून प्राथमिक निदान करता येते.    
  • पक्क्या निदानासाठी जिवंत जनावराच्या कानाच्या पाळीतील शिरेतून रक्तबिंदू काढून त्याची काचपट्टी तयार करावी. ही काचपट्टी विशिष्ट रंगाने रंगवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघून निदान करता येते. 
  • जिवंत जनावराच्या रक्तरसावरील परीक्षण आणि आधुनिक जनुकीय पद्धती वापरून सुद्धा शीघ्र निदान करता येते.
  • आजाराचा संशय असल्यास मृत जनावरांचे शव विच्छेदन करू नये. पक्क्या निदानासाठी कान किंवा कानाचा तुकडा पूर्ण दक्षता घेऊन प्रयोग शाळेत पाठवावा.
  • चुकून शव विच्छेदन झाल्यास मृत्यूनंतर शरीराला येणारा ताठरपणा येत नाही. कातडीखालील भाग रक्ताळलेला दिसतो. प्लिहा फार सुजलेली, लिबलिबीत आणि काळसर रक्ताने माखलेली दिसते. फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि इतर ग्रंथी रक्ताळलेल्या व सुजलेल्या दिसतात.  शरीरातील पोकळ्यांमध्ये रक्त मिश्रित स्त्राव भरलेला दिसून येतो. सौम्य आजाराने प्राण्याचा बऱ्याच दिवसांनंतर मृत्यू झालेला असल्यास वरील अवयवांवर तांबडे डाग विखुरलेले दिसतात.
  • उपचार आणि प्रतिबंध

  • आजाराचा प्रकोप तीव्र असल्याने उपचार करण्यावर मर्यादा येतात.
  • पेनिसिलीन गटातील प्रतिजैविके अत्यंत उपयुक्त ठरतात. ही प्रतिजैविके बाधित जनावराचे वयोमान आणि वजनानुसार योग्य मात्रेत द्यावी लागतात. म्हणून उपचार पशुवैद्यकाकडूनच करून घ्यावा. 
  • आजारी जनावरांना विलग करून ठेवावे. त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत. 
  • आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील जनावरांना पशुवैद्यकाच्या सल्याने लसीकरण करून घ्यावे. अशा ठिकाणी लसीकरण खंडित केल्यास एक वर्षानंतर या आजाराचा प्रादुर्भाव जाणवू शकतो.  
  • मृत पशू, त्याची वैरण, शेण इत्यादी जाळून अथवा चुनखडी टाकून खोल पुरून टाकावे. गोठा आणि वाहन निर्जंतुक करून घ्यावे.
  • संपर्क ः डॉ. सुधाकर आवंडकर ९५०३३९७९२९,  डॉ. महेश कुलकर्णी ९४२२६५४४७० (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT