पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन 
कृषी पूरक

पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या गोठ्यातील दैनंदिन व्यवस्थापनामध्ये वातावरणानुसार आवश्यक बदल करणे अपेक्षित आहे.

डॉ. शरद साळुंके

सततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला, तरी हवेतील गारवा, थंडी, आणि आद्रता यांचा ताणतणाव जनावरांवर येतो. हा ताणतणाव कमी करण्यासाठी जनावरांच्या शरीरातील ऊर्जा खर्च होते. त्यामुळे दूध उत्पादन व शरीरपोषण या क्रियांसाठी ऊर्जा कमी पडते. याचाच परिणाम म्हणून दूध उत्पादनात घट होते. हे लक्षात घेता पावसाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या गोठ्यातील दैनंदिन व्यवस्थापनामध्ये वातावरणानुसार आवश्यक बदल करणे अपेक्षित आहे. जनावरांचा गोठा : १) गोठे दुभत्या जनावरांसाठी आरामदायक आहे का याचा विचार करावा. छपरातून जनावरांच्या अंगावर गळणारे पावसाचे पाणी, गोठ्यात असणारी किचकिच, घाणीचे साम्राज्य, बसण्याच्या जागेवरील खाचखळगे, त्यात साचलेले मलमूत्र, तसेच पावसामुळे गोठे पूर्णतः बंदिस्त केले जातात. गोठ्यात हवा कोंडली जाते. स्वच्छ व मोकळी हवा गोठ्यामध्ये येत नाही. सकाळी गोठ्यात शिरताच मलमूत्रातून निघणाऱ्या अमोनियाचा उग्र वास येतो. या सर्वांचा जनावरांवर ताण येतो. २) गोठ्यातील ओलाव्यामुळे जनावरे खाली बसत नाहीत, उभ्यानेच रवंथ करतात. तासन् तास उभे राहतात. यामुळे ऊर्जेचा अपव्यय होतो. याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो. ३) गोठ्यात ओलावा जर जास्त काळ राहिला, तर अशा ठिकाणी विविध जिवाणू, विषाणू आणि परोपजीवींची वाढ होऊन जनावरे आजारी पडतात. उपाययोजना ः १) हे सर्व टाळण्यासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. गोठ्याचे छप्पर गळके असेल तर दुरुस्त करावे. २) पाऊस उघडल्यावर जनावरे सकाळी बाहेर सूर्यप्रकाशात बांधावीत. ३) मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. त्यानंतर सर्व गोठा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा. ४) गोठ्यातील बसण्याच्या जागेवरील सर्व खाचखळगे मुरमाने व्यवस्थित भरून घ्यावेत. ५) गोठ्यातील अमोनिया बाहेर जाऊन हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे. पिण्याचे पाणी : १) हवेतील गारव्यामुळे जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी झालेले असते. दूध उत्पादनासाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. जनावराने पाणी जर कमी प्यायले तर त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. उपाययोजना ः १) पावसाळ्यात स्वच्छ, उबदार पाणी दिवसातून कमीत कमी ३ ते ४ वेळा किंवा २४ तास उपलब्ध असणे गरजेचे असते. अस्वच्छ, गढूळ, डबक्यात साचलेले पाणी पाजणे कटाक्षाने टाळावे. अशा पाण्यामुळे हगवण लागणे, ताप येणे किंवा इतर साथीचे आजार फैलावण्याची शक्यता असते. २) जनावरांच्या आहारात थोड्या प्रमाणात मिठाचा समावेश केला तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढेल व दूध उत्पादनात घट येणार नाही. जनावरांचा आहार ः १) पावसाळ्यात विपुल प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो. जनावरांना फक्त हिरवी वैरण किंवा गवत दिले जाते. हिरवे व कोवळे गवत खाल्यामुळे जनावरात पोटदुखी, पोटफुगी, हगवण यांसारखे आजार उद्‍भवतात. उपाययोजना ः १) आजार आल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावा. २) जनावरांच्या आहारात हिरव्या वैरणीबरोबरच वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा. त्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित राहील, अन्नपचण्याच्या क्रियेत अडथळा येणार नाही. परिणामी दूध उत्पादन व फॅट वाढेल. ३) वास असलेला, बुरशीयुक्त चारा जनावरांना देऊ नये. ४) दररोज १५ ते २० ग्रॅम खाण्याचा सोडा दुभत्या जनावरांना द्यावा. त्यामुळे शेण पातळ होणार नाही व गोठाही जास्त ओला होणार नाही. ५) दुभत्या जनावरांच्या आहारात ५० ते १०० ग्रॅम खनिज मिश्रणाचा समावेश असावा. त्यामुळे पाण्याचे शरीरातील संतुलन तर राखले जाते. दुधातून जाणाऱ्या कॅल्शिअमची घट भरून निघते, जनावरे वेळेवर माजावर येतात. भरवल्यानंतर गाभण राहतात. उलटण्याचे प्रमाण कमी होते आणि खनिजांच्या अभावामुळे होणारे रोगही टाळता येतात. जनावरांचे आजार ः १) सूक्ष्म जंतू व परोपजीवींच्या वाढीसाठी पावसाळ्यात योग्य वातावरण असते. जनावरांत इतर ताणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव होतो. २) घटसर्प, फऱ्याचा प्रादुर्भाव या दिवसामध्ये होत असतो. त्यासाठी वेळीच रोगप्रतिबंधक लसी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने टोचून घ्याव्यात. ३) गोठ्यातील अस्वच्छतेमुळे कासेचे आजार होतात. अशा प्रकारचा आजार जनावरांना होऊ नये म्हणून गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच धार काढल्यानंतर कास पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने धुवावी किंवा सड जंतुनाशक द्रावणात (डीपकप) बुडवावेत. ४) गोचीड, गोमाश्‍या, चिलटे, डास यांचे प्रमाणही पावसाळ्यामध्ये वाढलेले असते. ते जनावरांच्या अंगावर बसून चावा घेतात, रक्त शोषण करतात. यामुळे जनावरे अस्वस्थ होतात. खाण्यावर व रवंथ करण्यावर लक्ष लागत नाही. याचबरोबर बबेसिओसिस, थायलेरियासिस, सरा यांसारखे प्राणघातक रोग ही गोचिडाच्या प्रादुर्भावामुळे होतात. यात जनावरे दगावू शकतात किंवा उपचारासाठी खूप खर्च होतो. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचीड, गोमाश्‍या, चिलटे, डास इ. परजीवींचा त्रास होऊ नये म्हणून १० मिलि निमतेल, १० मिलि करंज तेल आणि २० ग्रॅम अंगाचा साबण प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गोठा, गव्हाण, गोठ्यातील कपारी, भेगा व जनावरांच्या अंगावर फवारणी करावी. गोचीड नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझियम अॅनिसोपली बुरशी ५ ग्रॅम व ५ मिलि दूध प्रति एक लिटर पाण्यात मिसळून गोठ्यात, गव्हाणीत १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ५) जंताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वर्षातून किमान दोनदा (पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर) जंतनाशक पाजावे. संपर्क ः डॉ. शरद साळुंके, ९४०४९५७५१७ (कार्यक्रम सहाय्यक (पशू विज्ञान), मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT