Animal health should be checked with the advice of a veterinarian.
योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत प्रतिजैविकांचा वापर केला तर तो फायदेशीर ठरतो. अन्यथा जनावरांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्रतिजैविकांचा वापर करावा. प्रतिजैविके रोगकारक जिवाणूंचे नियंत्रण करतात. १९२८ मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलीनचा शोध लावला. प्रतिजैविके मूलत: बुरशीपासून किंवा जिवाणूंपासून निर्माण केली जातात. काही प्रतिजैविके ही प्रयोगशाळेत संयोग क्रियेने तयार केली जातात. पेनिसिलीनच्या शोधानंतर लगेच पाठोपाठ अनेक प्रतिजैविकांचा शोध लावला गेला आणि त्यांचा विविध रोगांवर वापर होऊ लागला. प्राणी आणि मानवातील रोगाच्या उपचारासाठी लागणारी प्रतिजैविके ही एकच असतात. परंतु त्यांची मात्रा वेगवेगळी असते. अनेक आदिजीवी रोगांवर प्रतिजैविकांचा यशस्वी वापर होऊ लागला. परंतु विषाणूजन्य आजारांवर प्रतिजैविकांचा काहीही परिणाम होत नाही.
आपल्याकडे भाकड जनावरे आणि कमी दूध देणाऱ्या जनावरांची संख्या खूप असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन आणि आजार नियंत्रण पशुपालकांना अवघड जाते. जनावरांतील आजारांचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आजारी पडलेल्या जनावरांवर वेळेवर उपचार न करणे. बहुतांश दवाखान्यात प्रतिजैविके निवडीसाठी करण्यात येणारी प्रतिजैविक संवेदनाक्षम चाचणी उपलब्ध नसते किंवा वेळेअभावी ती केली जात नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे रोग जंतूंना नियंत्रित करणारी प्रतिजैविके जनावरांना टोचली जातात. बरेच पशुपालक त्यांच्या जनावरांना पशूतज्ज्ञांनी सांगितलेल्या मात्रेत आणि योग्य वेळेत प्रतिजैविके देत नाहीत. यामुळे जनावरांतील आजाराचे प्रमाण वाढते. जनावरास एकच प्रतिजैविक जास्त कालावधीपर्यंत दिले असता त्या प्रतिजैविकाचा जिवाणूवर काहीही परिणाम होत नाही, आजार तसाच राहतो. जेव्हा जिवाणू एखाद्या प्रतिजैविकास प्रतिकार करतात आणि शरीरात तसेच राहतात. या प्रक्रियेला प्रतिजैविकाविरोधक शक्ती म्हणतात. बरेच जिवाणू एकापेक्षा जास्त प्रतिजैविके देऊन ही त्यास प्रतिसाद देत नाहीत, नियंत्रित होत नाहीत यालाच बहू प्रतिजैविकरोध असे म्हणतात.जनावरांच्या आहारामध्ये त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक म्हणून प्रतिजैविकांचा वापर करतात. काही आजारात उदा. कासदाह, क्षय रोग, फुफ्फुसांचा दाह इत्यादी आजारावर एकापेक्षा जास्त अर्थातच तीन ते चार प्रतिजैविके वापरतात. अशा जनावरांमध्ये प्रतिजैविकाची मात्रा त्यांच्या प्रमाणित मात्रेपेक्षा कमी प्रमाणात आणि दीर्घ काळ दिली असता त्यांचा जिवाणूवर काहीही परिणाम होत नाही. आजार तसाच राहतो. प्रतिजैविकास विरोध करणारे जिवाणू जनावरांच्या शरीरात तयार होतात. दर २० ते ३० मिनिटाने एका जिवाणूचे दोन, दोनाचे चार अशी गुणाकार पद्धतीने वाढ होते. म्हणजेच प्रतिजैविकास विरोध करणाऱ्या जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. जिवाणू सान्निध्याच्या माध्यमातून आणि संयोगाने हा गुणधर्म एका जिवाणू पासून दुसऱ्या जिवाणूस संक्रमित होतो आणि प्रतिजैविकास प्रतिकार करणारे जिवाणू झपाट्याने वाढतात. हे प्रतिजैविक विरोधक जिवाणू हवा, पाणी, दूध, मांस इत्यादी प्रदूषित करतात. यामुळे बहू प्रतिजैविक विरोधक जिवाणूंचा प्रसार होतो.काही प्रतिजैविकांचे शरीरावर दुष्परिणाम होतात जसे की, संडास लागणे, चक्कर येणे, तोंडातील बुरशीजन्य आजार होणे. अशा प्रकारचे दुष्परिणाम प्रतिजैविके देणे टाळल्यास कमी होतात. बऱ्याचदा प्रतिजैविके तोंडातून दिल्यास पोटातील पाचक जंतू नष्ट होतात. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो. काही प्रतिजैविके विशिष्ट अवयवात दुष्परिणाम करतात. प्रतिजैविके जास्त मात्रेत दिल्यास त्यांचा घातक परिणाम शरीरात होतो जसे की, मूत्र पिंडाचे विकार, रक्ताचे विकार. कधी कधी जनावरांचा मृत्यू होतो.प्रतिजैविकांचे दुष्परिणाम व घातक परिणाम टाळण्यासाठी योग्य प्रतिजैविकाची निवड, त्यांची पूर्ण मात्रा योग्य कालावधीपर्यंत द्यावी. यासाठी पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. जनावरास एखाद्या प्रतिजैविकाची ॲलर्जी असेल तर पशुपालकाने उपचार करून घेण्याअगोदर पशुतज्ज्ञांना सांगावे. पशुपालाकाने स्वतः निर्णय घेऊन प्रतिजैविकांचा वापर करू नये. पुरेसे ज्ञान नसताना वापर टाळावा.पशुतज्ज्ञांनी पूर्वी दिलेली प्रतिजैविके सल्याशिवाय स्वत: जनावरास देऊ नयेत. - डॉ. बी. सी. घुमरे, ९४२१९८४६८१ - डॉ. व्ही. व्ही. कारंडे, ९४२००८०३२३ (औषधीशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)