Amgaon Jangli (Dist. Wardha): Babanrao Yeole while milking Jani buffalo.
Amgaon Jangli (Dist. Wardha): Babanrao Yeole while milking Jani buffalo. 
कृषी पूरक

संगोपन जानी म्हशीचे...

सजल कुलकर्णी

चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी म्हैस ही संकल्पना अवलंबली जाते. ही पद्धत फक्त नंदगवळी समाजातच नाही, तर इतर भटक्या पशुपालक समाजामध्ये पाहावयास मिळते. वर्धा जिल्ह्यातील गवळाऊ गाय ही दुधासाठी प्रसिद्ध आहे. या गाईला सांभाळणारे नंद गवळी समाजातील लोक आजही सांगतात, की पूर्वीसारखी गवळाऊ गाय आजकाल दिसत नाही. गवळाऊ गाय ही दूध कमी देते, गायीला फार काही खायला लागत नाही, रोगाचा फारसा प्रादुर्भावही होत नाही.असे नंद गवळी समाजातील लोक सांगतात. गायीला सहसा कालवड झाली, की पशुपालक खूष होतो, पण नंद गवळी समाजात गायीला गोऱ्हा झाला तरी ते खूष असतात कारण त्या गोऱ्हाची किंमत भविष्यात गाईपेक्षा जास्त मिळते. नागपुरी म्हशीचे संगोपन 

  • नंद गवळी समुदाय गवळाऊ गाईचे दूध विकूनच आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करतो. याचबरोबरीने हा समुदाय नागपुरी म्हशींचे देखील दुग्धोत्पादनासाठी संगोपन करतो. या म्हशीला गवळी लोक गवळाऊ म्हैस असे देखील म्हणतात. नागपुरी म्हशी या मुऱ्हा किंवा जाफराबादी म्हशी इतके दूध देत नाहीत. पण या म्हशींना त्यांच्याएवढे खाद्य लागत नाही. देखभालीचा खर्च फारच कमी असतो.
  • नंदगवळी समाज भटका असल्याने त्यांच्या अनेक चालीरीती सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या आहेत. समाजात अनेक वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यातले काही फक्त आणि फक्त नंदगवळी समाजामध्ये बघायला मिळतात. समाजात अनेक म्हशींना त्यांच्या शरीरावरील खुणांनुसार नावाने ओळखले जाते जसे भोंडी (डोक्यापासून नाकापर्यंत पांढरा रंग) शिंगरी (इतरांपेक्षा लांब शिंग) चांदी(कपाळावर पांढरा ठप्पा) इत्यादी. पण या सगळ्यांत एक विशिष्टपूर्ण म्हैस म्हणजे जानी म्हैस.
  • जानी म्हशीचे संगोपन  जानी म्हणजेच देवाच्या नावाने सोडलेली म्हैस. आपण देवाच्या नावाने सोडलेली गाय किंवा सोडलेला बैल नेहमी ऐकतो; पण देवाच्या नावाने सोडलेली म्हैस ऐकण्यात येत नाही. पण नंदगवळी समाजात ही प्रथा पूर्वीपासून आहे. नंद गवळी समाजात पूर्वी प्रत्येकाच्या घरी कमीत कमी २ खंडी (१ खंडी = २० म्हशी) म्हशी असायच्या. त्या बाराही महिने उघड्यावर राहायच्या. त्यातल्या अनेक म्हशी या पावसाळ्याच्या शेवटी व्यायच्या. पावसाळ्यात जन्माला आलेले अनेक बछडे लवकर आजारी पडत आणि दगावण्याचे प्रमाण पण अधिक असायचे. यात रेडे दगावले तर त्याचा फारसा फरक पडत नसे, पण जर वगारी दगावल्या, तर पशुपालकाचे फार मोठे नुकसान होत असे. या वगारीवर वेळीच सगळे उपाय केले जायचे. पण तरीही ती बऱ्या झाली नाहीत, तर त्यांना जानी सोडले जायचे. ही म्हैस घरातील सगळ्यांच्या लाडाची असायची. जर एका वेळेला ५ वगारी आजारी पडल्या, तर त्यापैकी कुठलीही एक वगार जानी म्हणून सोडली जायची. एकदा जानी सोडली, की त्यावर कुठलेही उपाय केले जात नसत, पण घरातील एक व्यक्ती ती बरी होईपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवून असतो. जानी सोडताना देवाला नवस केला जायचा, की जर ही वगार वाचली तर या तिला आणि तिच्या दुधाला आम्ही कधीच विकणार नाही. जानी म्हैस निवडण्याचे काही नियम आहेत. जसे की तिची शरीरयष्टी चांगली हवी, अंगावर चमक हवी, तिच्या आईचे दूध जास्त असावे. जानीचे दूध विकता येत नसल्याने तिचे दूध तिच्या वासराला हवे तेवढे पिऊ देत असत आणि मग उरलेले घरच्यासाठी वापरले जायचे किंवा कोणी मागितल्यास त्यांना ते फुकटात दिले जायचे, पण ते कधीही विकत नसत. म्हशीच्या बच्च्याला जास्त दूध प्यायला मिळत असल्याने तो बच्चा बाकीपेक्षा चपळ व शरीराने चांगला होत असे. जानी म्हशीला होणारे बच्चे विकू शकत नाही, पण तिच्या वागरीचे दूध हे विकू शकतो किंवा रेड्याला कुणाला फुकटात देऊ शकतो. पूर्वी एक समज होता की जानी म्हशीला होणाऱ्या वगारीला दूध जास्त असते. त्यामुळे ती वगार मुलीला लग्नात दिली जायची. चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून कदाचित ही पद्धती अवलंबली असावी. ही पद्धत फक्त नंदगवळी समाजातच नाही तर इतर भटक्या पशुपालक समाजात पण बघायला मिळते. मेळघाटमधील नंदगवळी याला ‘जाना’, उमरखेड मधील मथुरा लमाण याला ‘जानी’ आणि गुजरात मधील ‘भरवाड’ (गीर गोपालक) याला ‘जानडी’ म्हणतात. - सजल कुलकर्णी, ९८८१४७९२३९ (लेखक पशू अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT