Poultry Farming  Agrowon
कृषी पूरक

Poultry Farming : शेतीला दिली कुक्कुटपालनाची जोड

मिरवणे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील मेघना मंगेश गुढेकर यांनी शेतीला पूरक उद्योग म्हणून लेअर कोंबडीपालनाची जोड दिली. मिरवणेतील अष्टविनायक महिला स्वयंसाह्यता समूहाच्या अध्यक्षा असलेल्या मेघनाताईंनी गावातील अकरा महिला गटातील सदस्यांना आर्थिक विकासाची दिशा दिली आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शिवण काम, प्रक्रिया उद्योग, भाजीपाला लागवडीतून गटातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

राजेश कळंबटे

कोकणामध्ये घरोघरी परसबागेत गावठी कोंबड्यांचे संगोपन (Backyard Poultry) करणारी कुटुंब आहेत. त्यातील काही लोक गावठी कोंबडी (Desi Chicken), तसेच अंड्यांची देखील विक्री करतात. परंतु व्यावसायिक तत्त्वावर अंडी विक्री करणारे कमी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांतील बाजारपेठेत कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणात अंडी येतात.

या व्यापारातील संधी आणि अंड्यांची दैनंदिन मागणी लक्षात घेऊन मिरवणे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील मेघना ताई आणि त्यांचे पती मंगेश गुढेकर यांनी एक वर्षांपूर्वी लेअर कोंबडीपालनास सुरुवात केली. बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य वेळेत पुरवठा याचे गणित बसवून गुढेकरांनी अंडी विक्रीतून स्वतंत्रपणे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे.

प्रशिक्षणातून उद्योगाची पायाभरणी

मिरवणे येथील मेघना गुढेकर या अष्टविनायक महिला स्वयंसाह्यता समूहाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या गटामध्ये दहा महिला सदस्या आहेत. त्याचबरोबरीने गावातील अकरा महिला बचत गटांना विविध योजना तसेच शेतीपूरक उद्योगाबाबत त्या मार्गदर्शन देखील करतात. मेघनाताईंच्या कुटुंबाची चार एकर भात शेती आहे. परंतु केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी पूरक उद्योगाच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत केले.

पहिल्यांदा विविध प्रकारच्या घरगुती पिठांची निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय सुरु केला. दरम्यान त्यांचे पती मंगेश यांनी २०१६ मध्ये पंचायत समितीमार्फत आयोजित कुक्कुटपालन, शेळीपालन प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये लेअर कोंबडीपालनाबाबत सखोल माहिती देण्यात आली होती. पुढे शेतकरी सहलीच्या निमित्ताने दोघांनी पुणे, सातारा परिसरात दौरे झाले. यामध्ये विविध पूरक उद्योग पाहता आले. नियमित व्यवसायापेक्षा वेगळे काहीतरी करायचे असे गुढेकर पती-पत्नीने ठरवले होते.

त्यामधूनच त्यांनी लेअर कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला. गुढेकर यांनी लेअर कोंबडीपालनाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे मेघना यांना घरातच तज्ज्ञ माणूस व्यवसाय उभारणीसाठी उपलब्ध झाला होता. मात्र प्रत्यक्ष बाजारपेठेतील अंडी विक्री व्यवसायाचा अनुभव हवा असल्याने गुढेकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील काही लेअर कुक्कुटपालक आणि अंडी व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेतल्या. पुरेशी माहिती मिळाल्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यात त्यांनी लेअर पोल्ट्री शेड उभारली. या प्रकल्पासाठी त्यांना एक लाख रुपये अष्टविनायक महिला स्वयंसाह्यता समूहातून कर्जाच्या स्वरूपात मिळाले. उर्वरित सहा लाखांची जुळणी त्यांनी विविध माध्यमांतून केली.

कोंबडीपालनास सुरुवात

कोकणातील वातावरण दमट आहे. या वातावरणातही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल अशी लेअर कोंबडीची जात गुढेकर यांनी निवडली. त्यापूर्वी तज्ज्ञ तसेच प्रयोगशील कुक्कुटपालकांसोबत त्यांनी चर्चा केली. लेअर कोंबड्यांसाठी त्यांनी योग्य आकाराची शेड उभी केली. पहिल्या वर्षी गुढेकर यांनी ९६० लेअर कोंबड्यांची खरेदी केली. त्यांना ठेवण्यासाठी नवीन प्रकारचे पिंजरे तयार केले. कोंबडीची विष्ठा पिंजऱ्यात राहणार नाही अशी त्याची रचना केली आहे.

जमिनीपासून हे पिंजरे अडीच फूट उंचावर आहेत. अंडी बाहेर काढण्यासाठी व्यवस्था केली आहे. दिवसातून एकदा म्हणजेच सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान कोंबड्यांना खाद्य दिले जाते. एका कोंबडीला दररोज ११० ग्रॅम खाद्य देण्यात येते. साधारणपणे दुपारी ३ वाजता अंडी गोळा केली जातात. दररोज सरासरी ९०० अंडी गोळा होतात. कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी शिफारशीनुसार लसीकरण केले जाते.

वेळोवेळी पोल्ट्री शेडची योग्य पद्धतीने स्वच्छता ठेवली जाते. दर चार दिवसांनी पिंजऱ्यांची स्वच्छता केली जाते. यामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. पोल्ट्री शेडमध्ये मेघना आणि मंगेश हे दोघे व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे मजूर ठेवण्याची गरज भासलेली नाही. कोंबड्यांची विष्ठा शेतीसाठी खत म्हणून वापरली जाते.

अंडी विक्रीचे गणित

पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यानंतर दैनंदिन व्यवस्थापन मेघनाताई पहातात. अंडी विक्रीची जबाबदारी मंगेश यांनी घेतली आहे. आजूबाजूच्या गावातील दुकानदारांना भेटून त्यांनी अंडी विक्रीचे नियोजन केले. परजिल्ह्यांतून येणारी अंडी ही तेथील पोल्ट्री फार्ममधून एक दिवस उशिरा येत असल्याने व्यावसायिकांनी गुढेकर यांच्याकडून थेट अंडी खरेदीस सुरुवात केली. सध्या गुढेकर यांच्याकडे अंड्याची मागणी अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती आहे.

प्रामुख्याने मिरवणे, रामपूर, घोणसरे, मार्गताम्हाणे या गावांतील पंधरा दुकानदारांकडे अंडी विक्रीसाठी पोहोचविली जातात. उत्पादन खर्च लक्षात घेऊन विक्रीदर ठरतात. तसेच दररोज ऑनलाइन अंड्याचे दर पाहून विक्रीचा दर ठरतो. साधारणपणे एप्रिल, मे आणि श्रावण महिन्यात दर कमी असतात. उर्वरित कालावधीत दर चढे असतात. उन्हाळ्यामध्ये गुढेकर यांना सरासरी प्रति अंडी दर ३ रुपये ८५ पैसे मिळतो.

काही वेळा दर अचानक उतरल्याने तोटा सहन करावा लागतो. सर्वाधिक दर ५ रुपये ९० पैशांपर्यंत मिळालेला आहे. दरातील चढ-उतारानुसार अंडी विक्रीमागील फायद्याचे गणित ठरते. काही वेळा एखाद्या महिन्यात तोटाही सहन करावा लागतो. तर काही वेळी अधिकचा फायदादेखील होतो. दरमहा या कुक्कुटपालनातून सरासरी १५ ते २० हजारांची उलाढाल होते. अंड्यांना मागणी वाढत असल्यामुळे जिल्हा उद्योग केंद्र, उमेद अभियान यांच्या सहकार्याने मोठा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात प्राथमिक बैठकही झाली आहे, असे मेघनाताई सांगतात.

मेघना गुढेकर ८६६९४७५१९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT