Broiler Chicks  Agrowon
ॲनिमल केअर

Broiler Chicks : ब्रॉयलर पिलांचे ब्रूडिंग अन् व्यवस्थापन

टीम ॲग्रोवन

डॉ. आर. सी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. देशपांडे

व्यावसायिक ब्रॉयलर कोंबड्यांची (Broiler Chicken) वाढ अगदी झपाट्याने होत असते. या कोंबड्या अगदी कमी कालावधीत (३५-४२ दिवस) विक्रीस तयार होतात. दरवर्षी कोंबडी विक्रीसाठी तयार होण्याच्या कालावधीत घट होत आहे, त्यामुळे कमी कालावधीत सुयोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. व्यवस्थापन (Poultry Management) करत असताना त्याचे सुयोग्य नियोजन आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते. यासाठी व्यावसायिक मांसल पिलांची (Broiler Chicks) निवड, त्यासाठी लागणारी जागा, ब्रूडिंग (Broiler Chicks Brooding ) व गादी व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

ब्रॉयलर पिलांची निवड

ब्रॉयलर पिलांची खरेदी ही उच्च दर्जाच्या अंडी उबवणूक केंद्रातूनच करावी.

पिलांची निवड करण्यापूर्वी अंडी उबवणूक केंद्रास प्रत्यक्ष भेट द्यावी. तेथील केंद्राबद्दल सविस्तर माहिती घ्यावी.

भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या ब्रॉयलर जातीची (स्ट्रेन्स) पिले उपलब्ध आहेत. विशेषतः जलद वाढ, उत्तम रोग-प्रतिकारक क्षमता, मांसल व पुष्ट स्नायू, खाद्याचे मांसात जास्त व लवकर रूपांतर क्षमता, कमी मरतुकीचे प्रमाण इत्यादी गुण असलेली पिले निवडावी.

निवड करताना स्थानिक हवामानात तग धरेल अशा जातींच्या पिलांची निवड सर्वांत योग्य असते.

जागा व्यवस्थापन

ब्रॉयलर कोंबड्यांना त्यांच्या वयोमानानुसार जागा पुरवावी.

कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी गादी पद्धतीत लागणारी जागा ः

१ आठवडा ०.३ चौ. फूट

२ आठवडे ०.४ चौ. फूट

३ आठवडे ०.५ चौ. फूट

४ आठवडे १.० चौ. फूट

५-६ आठवडे १.२ चौ. फूट

कोंबड्यांना कमी किंवा अधिकची जागा दिल्यास त्यांचा वाढीवर विपरीत परिणाम होतो.

कोंबड्यांना योग्य प्रमाणात जागा दिल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते, रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहते.

जागेमध्ये ऋतुमानानुसार बदल करावा, अन्यथा कोंबड्या विविध आजारांना बळी पडतात.

उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना १०-१५ टक्के अधिकची जागा द्यावी. त्यामुळे त्यांचा उष्माघातापासून बचाव होईल.

ब्रूडिंग व्यवस्थापन

कृत्रिमरीत्या ऊब देऊन त्याची शारीरिक वाढ व जोपासना करण्याच्या प्रक्रियेस ‘ब्रूडिंग’ म्हणतात.

ज्या उपकरणांचा वापर पिलांना ऊब देण्यासाठी केला जातो त्यास ‘ब्रूडर’ म्हणतात.

शारीरिक अवयव आणि पंखांच्या वाढीस विलंब लागत असल्याकारणाने लहान पिले वातावरणातील तापमान बदलाला तेवढी तयार नसतात, त्यामुळे त्यांना सुरुवातीस काही दिवस ऊब द्यावी.

सुरुवातीस १४ ते २१ दिवस ब्रूडिंग व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे, कारण त्यावरच त्यांची पुढील वाढ अवलंबून असते.

ऋतुमानानुसार ऊब देण्याच्या कालावधीत बदल करावा.

ब्रूडर हे जमिनीपासून २ ते ३ फूट उंचीवर असावे.

आवश्यकतेनुसार ब्रूडरची उंची कमी अथवा जास्त करावी. परंतु ब्रूडर पिलांना स्पर्श होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

ब्रूडिंग करतेवेळी ब्रूडरचे तापमान

पहिला आठवडा : ९५ अंश फॅरनाहाइट (३५ अंश सेल्सिअस)

दुसरा आठवडा : ९० अंश फॅरनाहाइट (३२.३ अंश सेल्सिअस)

तिसरा आठवडा : ८५ अंश फॅरनाहाइट (२९.६ अंश सेल्सिअस)

दर सात दिवसांनी साधारणतः ५ अंश फॅरनाहाइट (२.७ अंश सेल्सिअस) तापमान कमी करावे.

कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी शेडचे तापमान १८ ते २५ अंश से. इतके असावे.

कृत्रिम ऊब देताना पिलांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे. योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

पिलांच्या वर्तणुकीचा अंदाज खालील बाबींवरून बांधता येईल.

दिलेल्या जागेमध्ये पिले ही समप्रमाणात विखुरलेली असतील तर ऊब योग्य आहे.

पिले ब्रूडरपासून दूरवर जात असतील, तर ऊब ही जास्तीची होत आहे हे लक्षात घ्यावे. त्यानुसार एखादा बल्ब कमी करावा किंवा ब्रूडरची उंची वाढवावी.

पिले ब्रूडरखाली एकत्रित जमा होत असतील, तर त्यांना आणखी ऊब देणे गरजेचे आहे. त्यासाठी आणखी एखादा बल्ब वाढवावा अथवा जास्त वॉटचे बल्ब वापरावेत किंवा ब्रूडरची उंची घटवावी.

वीज वापरून ब्रूडिंग करत असाल तर सर्व साधारणपणे एका पिलास २ वॉट एवढी उष्णता द्यावी.

ब्रूडिंगमुळे वाढीसाठी आवश्यक असणारे स्राव पिलांच्या शरीरात तयार होण्यास चालना मिळते. पिलांच्या वाढीस मदत होते.

लिटर व्यवस्थापन

साळीचे तूस (धान), लाकडाचा भुसा, भुईमुगाची टरफले, नारळ काथ्याचा भुसा यांचा वापर लिटरसाठी होतो.

साळीच्या तुसाचा लिटर म्हणून वापर हा अधिक फायदेशीर ठरतो.

लिटरवर ३ ते ४ दिवस वर्तमानपत्राचा कागद पसरावा. त्यामुळे पिले तूस खाणार नाहीत.

ऋतुमानानुसार लिटरच्या जाडीमध्ये बदल करावा.

वेळोवेळी लिटरमध्ये ओलावा निर्मिती थांबविण्यासाठी दाताळ्याच्या मदतीने उकरी करावी.

हिवाळ्यात लिटरची जाडी ३ ते ४ इंचांपर्यंत ठेवावी. त्यामुळे कोंबड्यांना ऊब मिळते. थंडीपासून बचाव होण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात लिटरची जाडी १ किंवा २ इंच कमी करावी, त्यामुळे कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षण होण्यास मदत होईल.

चांगल्या तुसाचे गुणधर्म

वजनास हलके असावे. स्थानिक बाजारात सहज उपलब्ध व्हावे.

किंमत कमी असावी. आकाराने मध्यम असावे.

तुसामध्ये कोणतेही विषारी पदार्थ नसावेत.

तुसामध्ये विष्ठेतील ओलावा लवकर शोषून घेण्याची व लवकर कोरडा करण्याची क्षमता असावी. तुसात खवले होण्याचे प्रमाण नसावे.

तूस हे जैविकदृष्ट्या विघटनशील असावे. त्याचा उपयोग शेतीसाठी खत म्हणून करावा. तुसामध्ये कोणत्याही प्रकारची बुरशी नसावी.

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००

(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

डॉ. के. वाय. देशपांडे, ८००७८६०६७२

(सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख, पशुपोषण विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT