प्रा.व्ही.आर.पवार, प्रा.ए.व्ही.मोरे, डॉ.व्ही.जे.गिम्हवणेकर
Animal Care : जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत दीड ते दोन किलो ॲझोला दिला, तर दुधात वाढ होते. ॲझोला हे कोंबडीचेही खाद्य आहे. यामुळे अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते.
ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १० ते १५ टक्के खनिज आणि ७ ते १२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ल असतात. ॲझोलामध्ये पिष्टमय पदार्थ, तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे.
अ.क्र.---जनावरांचा प्रकार ---प्रमाण-प्रती जनावर प्रति दिवस
१. ---गाय व म्हैस---१.५ ते २ कि. ग्रॅ.
२.---शेळी व मेंढी ---३०० ते ४०० ग्रॅम
३.---कोंबडी---२० ते ३० ग्रॅम
ॲझोला निर्मिती
१) ॲझोला उत्पादनासाठी १८ फूट ×३.६ फूट ×१ फूट आकाराचा वाफा तयार करावा.
२) वाफ्यामध्ये प्लास्टिक कागद अंथरल्यानंतर त्यात नऊ किलो माती चाळून पसरून घ्यावी. ९ किलो शेण पहिल्यांदा एका ड्रममध्ये पाण्यात मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण वाफ्यातील पाण्यात ओतावे. वाफा पाण्याने भरून घ्यावा. त्यामध्ये ९० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळावे.
३) एक किलो ॲझोला धुऊन वाफ्यातील पाण्यावर पसरावा.
४) ॲझोलाची वाढ चांगली ठेवण्यासाठी दर आठ दिवसांनी एकदा १ ते १.५ किलो ताजे शेण, ५० ग्रॅम खनिज मिश्रण आणि ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव करून टाकत राहावे.
५) दर १५ दिवसांनी वाफ्यातील २५ टक्के पाणी बदलून स्वच्छ पाणी ओतावे. नंतर वरीलप्रमाणे मिश्रण पाण्यात मिसळावे. दर दोन महिन्यांनंतर वाफ्यातील ५० टक्के माती बदलून नवीन चांगली काळी माती टाकावी.
६) दर सहा महिन्यानंतर ॲझोलाचा वाफा स्वच्छ करावा. याप्रमाणे काळजी घेतली तर ॲझोलाचे चांगले उत्पादन मिळेल.
७) वाफ्यातील पाण्याची पातळी चार ते पाच इंच उंचीपर्यंत कायम ठेवावी.
८) वाफ्यातील ॲझोलाचे कल्चर दर सहा महिन्यातून बदलत राहावे.
९) वाफ्यातून ॲझोला दररोज काढणे आवश्यक आहे.
फायदे:
१. पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्यांची बचत.
२. जनावरांत रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारून आयुष्य वाढते.
३. ॲझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजनात वाढ.
४. ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांच्या वजनात वाढ होते. अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
५. ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.
पोषणमूल्ये:
१) नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून देखील याचा वापर होतो. परंतु नत्राबरोबरच या वनस्पतीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व (अ आणि ब) तसेच क्षारतत्त्वे (कॅल्शिअम, स्फुरद, पलाश, लोह, तांबे व मॅग्नेशिअम) मुबलक प्रमाणात आढळतात.
२) ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १० ते १५ टक्के खनिजे आणि ७ ते १२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ले असतात. याचप्रमाणे ॲझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे.
३) या वनस्पतीमधील प्रथिने व तंतुमय पदार्थ व लिग्नीनचे प्रमाण कमी असल्यामुळे ही वनस्पती बी- १२, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, तांबे, जस्त, बीटा कॅरोटीन या घटकांचे प्रमाणही चांगले असल्यामुळे दुधाच्या गुणवतेमध्ये वाढ होते.
संपर्क - व्ही.आर.पवार, ७७९८७२३७५५, ए.व्ही.मोरे, ७७५७८१६२१०, (कृषी महाविद्यालय, आचळोली, ता. महाड, जि. रायगड)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.