पावसाळा सुरु झाला की, जनावरांना विविध आजारांची (animal disease) बाधा होत असते. वातावरणातील ओलावा वाढल्याने जीवाणूंची संख्याही मोठ्या संख्येने वाढत असते. पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या विविध आजारांमधील एक आजार म्हणजे कासदाह (Mastitis) होय.
आपण दुधाळ जनावरे दूध उत्पादनासाठी पाळत असतो. कासदाह या आजारात जनावरांचे दूध देणेच बंद होते. जनावरांच्या दूध देणाऱ्या अवयवाला म्हणजे कासेलाच (udder) या आजारामध्ये संसर्ग होत असतो. कासेला जंतू संसर्ग झाल्याने, त्याचा दूध उत्पादनावर (milk production) विपरीत परिणाम होतो. जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते.
कासदाह या आजारात जनावरांची कास दगडासारखी टणक होते, म्हणून तिला आपण 'दगडी' असेही म्हणतो. कासदाह या आजारात पशुपालकांचे आर्थिक नुकसान जास्त होत असते.
पशुपालकांच्या व्यवस्थापकीय चुकांमुळे कासदाह हा आजार होतो. साधारणपणे दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास अर्धा ते एक तासाचा वेळ लागत असतो. सडाच्या उघड्या छिद्रातून कासदाहचे जीवाणू कासेत प्रवेश करत असतात.
कासेला संसर्ग झालेल्या जनावरांच्या कासेतून दुधाच्या स्वरुपात गाठी यायला सुरुवात होते. दुधाच्या रंगामध्ये फरक जाणवतो. लालसर दूध बाहेर येते. कासेला सूज येते, कासेचे आकारमान वाढते. कासेला रक्तपुरवठा जास्त प्रमाणात होतो. हेच रक्त किंवा त्याच्या गाठी सडावाटे बाहेर येत असतात. जनावरांना ताप येतो. चालता येत नाही. या आजारात दूध तयार करणाऱ्या पेशी फुटून, त्याच सडावाटे बाहेर येत असतात.
आपल्या जनावराला कासदाह या आजाराची बाधा होऊ नये म्हणून, खालील प्रमाणे प्रतीबंधात्मक उपाय करावेत.
- जनावरांची, गोठ्याची नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
- दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर आणि काढण्यापूर्वी कास स्वच्छ धुऊन, कोरडी करणे गरजेचं आहे.
- सध्या बाजारात टीट डीप उपलब्ध आहे, धार काढल्यानंतर सड टीट डीपमध्ये बुडवून घ्यावी.
- गायीला आटविताना कासेतून दूध पूर्णपणे काढून घ्यावे. गायीला आटवताना सडातून इंट्राम्यॅमरी ट्युब पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सोडावी.
- धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यानंतर सड पोटाशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्यावेत.
जनावरे बसण्याची जागा ओलसर, अस्वछ् असल्यास कासदाहचे जीवाणू आत प्रवेश करतात. काही वेळेस कासेला जखम झालेली असल्यास, जखमेद्वारेही जीवाणू आत प्रवेश करत असतात. पावसाळ्यात जमिनी ओलसर राहिल्याने, पावसाळ्यात कासदाह होण्याचे प्रमाण वाढते. यावर उपाय म्हणून कासेची स्वच्छता महत्त्वाची आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.