Gram Go Kalyan Samiti : भारतीय प्राचीन साहित्यामध्ये जसे की, महाभारत अनुशासन पर्व, पद्म पुराण, ऋग्वेद, अथर्ववेद, शुक्ल यजुर्वेद आदि साहित्यात भारतीय गोवंशाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. गाय केवळ मानवाचेच पोषण करत नाही तर सर्व पशू, पक्षी, नदी, तलाव, शेती, पाणी, आकाश या सर्व पंचतत्त्वांचे पोषण करते.
भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही केवळ एक पशू नसून ती एक पवित्रतेचे प्रतीक आणि मातृसमान मानली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही धर्म, अर्थ, आरोग्य आणि पर्यावरण या सर्वांशी निगडित आहे.
ती केवळ एक प्राणी नसून समृद्धी, पवित्रता आणि जीवनाचा आधारस्तंभ आहे. गाईचे दूध, दही, तूप, मूत्र आणि शेण यांना पवित्र मानले जाते आणि ते विविध धार्मिक विधींमध्ये वापरले जाते. गायीचे शेण हे बायोगॅस तयार करण्यासाठी वापरले जाते. गोमूत्र हे कीटकनाशक म्हणून नैसर्गिक पर्याय आहे.
नुकत्याच झालेल्या पशुगणनेमध्ये गोवंशाची विशेषत: देशी गोवंशाच्या संख्येमध्ये कमालीची घट झाल्याचे लक्षात येते. पूर्वीची पशुगणना आणि सध्याची पशुगणना यांची तुलना केली असता एकूणच देशी गोवंशात सुमारे ९.६ टक्के घट झालेली आहे. पैदासक्षम देशी जनावरात सुमारे १३.८५ टक्के घट आहे. शेतीतील बैलांचा वापर सुमारे ३० टक्के इतका कमी झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये सुमारे तीनशे सात लाख हेक्टर जमिनीपैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. हीच जमीन आपल्याला अन्न आणि पोषण देते. या जमिनीची सुपीकता राखणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्था, देशातील विविध कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे, की जमिनीची ढासळती सुपीकता ही चिंताजनक बाब आहे.
माती वाहून जाण्यामुळे जलस्रोत गाळाने भरले आहेत. या जलस्रोतांची जलधारण क्षमता सुमारे ६० टक्के कमी झाल्याचे अहवालात नमूद केलेले आहे. नदी, नाले, ओहोळ, ओढे यांच्यातही गाळ साचल्यामुळे त्यांची वहनक्षमता कमालीची घटली आहे. परिणामी ज्या शेतातून ही माती वाहून आलेली आहे, त्या शेताची उत्पादकता देखील घटत आहे. त्यामुळे पीक उत्पादन आणि उत्पन्नामध्ये संतुलन राखण्यासाठी शेतकरी अधिक रासायनिक खतांचा वापर करत असल्याचे चित्र आहे.
आज देशी गोवंशाचे संवर्धन, रक्षण आणि कल्याणाची गरज अधोरेखित होते. महाराष्ट्रामध्ये २०२३ मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन करण्यात आला. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये आणि उद्दिष्टांमध्ये गो संवर्धन आणि गो कल्याण या बाबींना महत्त्व दिलेले आहे. तथापि गोसेवा आयोगाची कार्यमर्यादा केवळ पशुसंवर्धन विभाग विभागापुरती मर्यादित न ठेवता ती व्यापकपणे सर्व विभागांमध्ये जाणे गरजेचे आहेत. ग्राम पंचायत हा घटक म्हणून ग्रामीण भागामध्ये गोसेवा आयोगाचे कार्य विस्तारीत होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुमारे २८,००० ग्रामपंचायती असून ४४,००० महसुली गावे आहेत. गोसेवा आयोगाचे कार्य प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत आणि गो पालकांपर्यंत निश्चितपणे नेता येऊ शकेल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ अन्वये प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत निरनिराळ्या समित्या स्थापन करता येतात.
ग्रामविकास विभागाने कायद्यातील या कलमाचा आधार घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला गो सुधार आणि कल्याण समिती स्थापन करण्याबाबत परिपत्रकाद्वारे कळविल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारच्या समितीची स्थापन होऊ शकते. या समित्यांमध्ये कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्य संख्या असते. समितीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या मुदत एवढीच असते. या समितीचे कार्य हे निश्चित करून देता येते.
दर महिन्याच्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ही समिती आपल्या कार्याचा मासिक अहवाल ग्रामपंचायतीमध्ये सादर करू शकते. ग्रामपंचायत विकास आराखड्यात या समितीच्या कार्याचा समावेश करता येईल. आवश्यक वाटल्यास निधीची उपलब्धता देखील करून देता येवू शकते.
एका शासन परिपत्रकाद्वारे गोसेवा आयोगाचे कार्य हे सर्व ग्रामपंचायतीमध्ये सहजगत्या पोहोचेल. यांच्या कार्यांमध्ये विचार मंथन करून त्याची कार्यप्रणाली निश्चित करता येते. ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या गोवंशाच्या संवर्धनाबाबत गो कल्याणाबाबत माहिती त्यांना नियमितपणे देता येऊ शकते. त्यांना सहकार्य आणि मदत देखील करणे सहज शक्य आहे.
प्रशिक्षण शिबिरातून तंत्रज्ञान प्रसार
गोमूत्र, शेण दुधापासून जैविक खते, कीटकनाशके, बायोगॅस निर्मिती प्रशिक्षण.
‘एका गाईचे वार्षिक उत्पन्न’ यावर आधारित आकडेवारी सादर करणे.
ज्या शेतकऱ्यांना गोपालनामुळे आर्थिक फायदा मिळवला, त्यांच्या प्रात्यक्षिक भेटीचे आयोजन करणे.
देशात नवीन शैक्षणिक प्रणालीमध्ये खूप व्यापकतेने शिक्षणाची व्याख्या केलेली असून, अनेक विभागांना एकत्र घेऊन विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीमध्ये वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. याचा वापर करून आपल्याला देशी गाय आणि गोवंशाचे धार्मिक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहेत आणि यासाठी काय करता येऊ शकेल अशी कार्यपुस्तिका अथवा माहिती पुस्तिका अथवा पूरक पुस्तिका तयार करावी.
आपल्या देशातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत ठेवावयाचे असल्यास त्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे अन्न देणे ही आपली जबाबदारी आहे. उत्कृष्ट आणि निरोगी प्रकारचे अन्न देण्यासाठी निरोगी माती असणे गरजेचे आहे आणि निरोगी मातीसाठी गोआधारित शेती करणे गरजेचे आहे. सध्या शेतकऱ्यांसमोर शेती व्यवस्थापनाच्या समस्या आहेत. याच बरोबरीने अनियंत्रित पद्धतीने रासायनिक खते, कीडनाशके आणि पाण्याचा वापर होत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता आणि पीक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी देशी गोवंश संवर्धनाच्या बरोबरीने चांगल्या प्रकारे शेती करत आहेत. सेंद्रिय खत, सेंद्रिय कीडनाशकांच्या उपलब्धतेसाठी देशी गोवंशाचे संवर्धन महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी गोसेवा आयोग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विद्यापीठ आणि विविध शिक्षण संस्थांनी एकत्रितपणे बौद्धिक मंथन करून निश्चित दिशा देणे गरजेचे आहे.
९७६४००६६८३, (माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.