Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed management : जनावरांचा आहार, आरोग्याकडे लक्ष द्या...

Team Agrowon

डॉ.भगतसिंग कदम

राज्यात यंदा काही जिल्ह्यात अल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे कडक उन्हाळा जाणवण्याची शक्यता आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरावर ताण येतो. जनावरांना त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करणेसाठी पुरेसे स्वच्छ पाणी आणि चांगल्या निवारा असावा चांगल्या निवाऱ्यामुळे जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण होते.

त्यांचे शरीर थंड राहते. बंदिस्त गोठा असेल तर उत्तमच, परंतु पक्का निवारा नसेल तर गवत, पाचट, बांबू, पाल्यापासून पारंपरिक पद्धतीने बनविलेले झाप वापरावेत. गोठ्यावर पत्रे असतील तर त्यांना पांढरा रंग द्यावा. जनावरांसाठी झाडांची सावली अत्यंत आरामदायी असते, कारण झाडांच्या पानातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असल्याने तेथील परिसर थंड राहतो.

१) उष्णतेमुळे जनावरांची पाण्याची गरज वाढलेली असते. जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी देण्याची गरज असते. सुमारे चारशे किलो वजनाच्या जनावरास साठ लिटर पाण्याची आवश्यकता असते. जास्त दूध देणाऱ्या जनावरांना जास्त पाणी लागते.

२) दूषित पाण्यामुळे जनावरांना अपचन, हगवण, पोटदुखी यांसारखे आजार होतात. काही वेळा विषबाधा होते. काही वेळा जनावरे प्रमाणापेक्षा जास्त पाणी पितात, यामुळे त्यांची लघवी लाल होते. जास्त प्यायलेले पाणी पटकन लघवीवाटे निघून जात असल्याने थोडे थोडे पाणी वरचेवर देत राहावे.

३) उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बैलाकडून शेतीचे कामे सकाळी किंवा संध्याकाळी करून घ्यावीत. उन्हामध्ये जास्त वेळ जनावरांना उभे केल्यास उष्माघात होतो.

४) उष्माघात झालेले जनावर अस्वस्थ होते. त्यांचा श्‍वसनाचा वेग वाढलेला असतो. शरीराचे तापमान कमी करण्याचा हा एक प्रयत्न असतो. श्‍वसन करताना शरीरातील गरम हवा बाहेर फेकली जाते, बाहेरील तुलनात्मक थंड हवा शरीरात घेतली जाते.

जनावरे सावलीच्या शोधात झाडाखाली थांबतात, चारा खाणे, रवंथ बंद होते. वासरू, रेडकू यांच्यावर उष्णतेचा परिणाम जास्त जाणवतो. गडद रंगाच्या जनावरांच्या शरीरात जास्त उष्णता शोधली जात असल्याने त्यांचे शरीर पटकन गरम होते.

५) जनावरांना यापूर्वी लाळ्या खुरकूत, फुफ्फुस दाह, गोचीड ताप यांसारखे आजार झाले असतील तर अशा जनावरांना जास्त त्रास होतो. म्हशींमध्ये गायीपेक्षा जास्त त्रास जाणवतो कारण म्हशीच्या त्वचेमध्ये घामाच्या ग्रंथी अत्यंत कमी असतात.

त्यांचा रंग काळा असल्याने जास्त उष्णता शरीरात शोषली जाते. देशी जातीच्या जनावरांपेक्षा विदेशी जातीच्या जनावरांना त्रास जास्त होतो. गाभण असलेल्या व जास्त दूध देणाऱ्या आणि जास्त वजन असलेल्या जनावरांना उष्णतेचा त्रास जास्त होतो. शेळ्या, मेंढ्यांना गायीपेक्षा कमी त्रास होतो.

उष्माघातावर उपाय ः

१) ज्या ठिकाणी कातडीवरील केस कमी आहेत अशा ठिकाणी अतिनील किरणांचा परिणाम होतो. त्यांना ॲलर्जी होते. लोकर कापलेल्या मेंढ्या, अंगावर कमी केस असलेली कुत्री, मांजरे, वराह यांना त्रास जास्त होतो. अशा प्राण्यांना उन्हात बांधू नये. केस विरळ असलेल्या ठिकाणी झिंक ऑक्साइडचे मलम लावावे. या प्रथमोपचारानंतरही त्रास जाणवल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

२) उष्माघात झालेले जनावर सर्वप्रथम सावलीत न्यावे. त्या ठिकाणी वाऱ्याचा झोत असावा. जनावर जास्त अशक्त असेल, ते जागचे हलू शकत नसेल अथवा आडवे पडले असेल तर त्या ठिकाणी शेड नेट, पत्रा यांचा वापर करून निवारा करावा. जनावरास पुरेसे थंड पाणी पिण्यास द्यावे. अंगावर थंड पाणी मारावे, ओले कापड अंगावर टाकावेत. डोक्याभोवती कपड्याची पट्टी गुंडाळून थंड पाण्याने भिजवावी.

३) कुत्रा, मांजर ,करडे, इत्यादी लहान जनावरांना पाण्याच्या हौदात ठेवावे. कोंबड्यांना मात्र पुरेसा वारा असेल तरच पाण्यात बुडवावेत. घोड्यांना भरपूर घाम येतो. त्यांच्या अंगावर पाणी फवारावे. पाणी मारताना पायाकडून सुरुवात करावी, त्यानंतर अंगावर पाणी फवारावे. वारा वाहत नसेल तर टॉवेलने घोड्याचे अंग पुसून घ्यावे.

आजारी जनावरांवर उपचार ः

१) दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांना साथीचे आजार, विषबाधा, अखाद्य वस्तू खाणे, चयापचय आजार होतात. दूध उत्पादनात घट होते. प्रजनन क्षमता कमी होते.

२) कुपोषणामुळे जनावरांची प्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे अशी जनावरे आजारास बळी पडतात. घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत तसेच शेळ्या- मेंढ्यांना पीपीआर, आंत्रविषार, देवी आजार होतो.

३) जनावरांचा अचानक मृत्यू झाल्यास किंवा जनावर आजारी दिसल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. आजाराचे निदान आणि प्रतिबंधक उपाययोजना राबवावी.

४) आजारी जनावरांना तत्काळ कळपातून बाजूला ठेवावे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करावेत. आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शक्यतो वेगळ्या व्यक्तीकडून त्यांची देखभाल करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. बाधित, चारा, पाणी, देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कपडे यातून संसर्गजन्य आजार पसरतात, म्हणून विशेष काळजी घ्यावी.

चयापचयाचे आजार ः

१) दुष्काळात साथीच्या आजाराबरोबर चयापचय विषयक आजार होतात. पौष्टिक चारा कमी मिळत असल्याने प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. जीवनसत्त्वे आणि क्षार यांची कमतरता आढळते. या वेळी शरीरातील क्षारांची गरज भागविण्यासाठी जनावरे कागद, लोखंड, चप्पल, कपडे, माती, प्लॅस्टिक या अखाद्य वस्तू खातात.

या अखाद्य वस्तू जनावरांच्या जठरातील रुमेन आणि रेटीकुलम कप्प्यात साठत जातात. यामुळे पचनात अडथळे येऊन जनावरांचे पोट वारंवार फुगू लागते. काही वेळा धातूच्या टोकदार वस्तू पोटात जातात. त्या ठिकाणी जखमा होतात. काही वेळा सुई, तारांसारख्या वस्तू हृदय, फुफ्फुस, यकृताकडे सरकतात. यामुळे जनावरांचा मृत्यू होतो. हे लक्षात घेऊन तातडीने उपचार करावेत.

आजारांवर नियंत्रण ः

१) विविध आजारांच्या नियंत्रणासाठीची लस शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहे. साथीचा आजार येण्यापूर्वी लसीकरण करावे. कारण लस टोचल्यानंतर प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी आवश्यक असतो.

२) पावसाळ्यापूर्वी घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार आणि पावसाळ्यानंतर लाळ्या खुरकूत, शेळ्या-मेंढ्यातील पीपीआर लसीकरण आवश्यक आहे.

३) लसीकरण करण्यापूर्वी जनावरांना जंतनाशक घ्यावे. जेणेकरून रोग प्रतिकारशक्ती वाढते. लसीकरण सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी करावे. लस गोठ्यावर पोहोचेपर्यंत शीत साखळी असावी. उत्पादकाच्या निर्देशानुसार लस मात्रा आणि लस देण्याचा मार्ग अवलंबून असतो, त्याचे पालन करावे.

४) लस टोचल्यानंतर जनावरांना थोडासा ताप येत असतो, अशावेळी घाबरून जाऊ नये. दूध उत्पादनात घट येते पण ती तात्पुरती असते.

५) गाभण जनावरांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. यामुळे जनावरांच्या पोटात असणाऱ्या पिलास आयती रोगप्रतिकारक शक्ती मिळते.

६) ज्या वेळी जनावरे छावणीमध्ये दाखल होतात, त्या वेळी लसीकरण कार्यक्रम राबविला जातो. या वेळी जनावरे एकमेकांच्या सतत संपर्कात असतात, त्यामुळे संसर्गजन्य आजार वेगाने पसरू शकतात.

विषारी वनस्पतींचे परिणाम ः

१) जनावरांची वैरणीची गरज भागत नसेल तर बऱ्याच ठिकाणी जनावरांना चरण्यासाठी सोडले जाते. पडीक जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या असतात. यामध्ये काही वनस्पती विषारी असतात. खाण्याच्या घाईमध्ये जनावरे विषारी वनस्पती खातात. यामुळे त्यांना विषबाधा होते.

२) विषबाधेमुळे जनावरांचे पोट फुगते, जनावर थरथर कापते, तोंडातून लाळ गळू लागते, डोळे मिचकवते, काही प्रसंगी आडवे पडते. नव्याने सोडलेल्या जनावरांमध्ये यांचा जास्त दुष्परिणाम दिसतो. अशावेळी पोटातील विषाचे प्रमाण कमी करण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

३) पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारी, बाजरी या सारख्या वनस्पतीची वाढ खुंटते. तसेच नवीन पेरणी झाली असेल आणि ते पीक एक फुटांपर्यंत असेल तर त्यामध्ये हायड्रोसायनिक अॅसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अती तीव्र प्रमाणात विषबाधा होऊन जनावरांचा मृत्यू होतो.

४) विषबाधेची लक्षणे दिसताच तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

संपर्क ः डॉ. भगतसिंग कदम, ८२७५१७८००१

(सहायक आयुक्त, रोग अन्वेषण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT