Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : दीडशे जनावरांना टोचली ‘लम्पी’ ऐवजी भलतीच लस

जनावरांमधील ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या नियंत्रणासाठी द्यावयाच्या लसीऐवजी एका पशुवैद्यकाने तब्बल १५० जनावरांना भलतीच लस टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : जनावरांमधील ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या (Lumpy Skin Disease) नियंत्रणासाठी द्यावयाच्या लसीऐवजी (Lumpy skin vaccine) एका पशुवैद्यकाने तब्बल १५० जनावरांना भलतीच लस टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पडा यांनी या पशुवैद्यकाला तडकाफडकी निलंबित (Veterinarian Suspended) केले असून, निलंबन काळात त्याचा सेवा कालावधी चिखलदरा येथे राहणार आहे.

चांदूरबाजार पंचायत समितीअंतर्गत असलेल्या आसेगाव पूर्णा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सदाशिव रंगराव सातव हे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या दवाखान्याच्या हद्दीतील टाकरखेडापूर्णा या गावात ‘लम्पी’ या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने व काही जनावरांना त्याची लागण झाल्याने लसीकरण करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार सदाशिव सातव यांनी गावात जात जवळपास १५० गाय, बैल, म्हैस यांना लस दिली.

मात्र गोट पॉक्स ही लस देण्याऐवजी त्यांनी ब्रुसेला अबॉर्स ही भलतीच लस दिल्याचे समोर आले. ब्रुसेला अबॉर्स ही लस आठ ते नऊ महिन्यांच्या कालवडींना देण्यात येते. भविष्यात त्यांचा गर्भपात होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक स्वरूपात ही लस देण्याचे नियोजन आहे. मात्र सदाशिव सातव यांनी कोणतीही खातरजामा न करता लम्पी नियंत्रणाच्या नावाखाली बैलासहित सर्वच जनावरांना हीच लस टोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. विशेष म्हणजे ही लस टोचण्यापूर्वी ती शीतपेटीत आणावी लागते. परंतु तसे न करता या लसीचा बॉक्स सदाशिव सातव यांनी थेट गाडीच्या डिक्कीत आणला होता, असेही पशुपालक सांगतात. या प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर त्याची दखल घेत चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने पंचनामा करण्यात आला. त्या वेळी पशुवैद्यक सदाशिव सातव यांनी चुकीने ही लस देल्याचे मान्य केले. ११० ते १५० जनावरांना ही लस दिल्याचे त्यांनी चौकशी समितीसमोर कबूल केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी ही बाब गंभीरतेने घेत सदाशिव सातव यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबन काळात त्यांचे चिखलदरा मुख्यालय राहील.

जनावरांमध्ये साथरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पशुसंवर्धन विभागाचा गलथान कारभार देखील या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. पंधरवड्यापूर्वीच रविकिरण पाटील या पशुपालकाकडे मेंढीचे रक्त नमुने घेत चक्क शेळीच्या रक्ताचा अहवाल देण्यात आला होता. या प्रकरणात वेळीच उपचार न मिळाल्याने मेंढी दगावल्याने पशुपालकाचे नुकसान झाले होते. या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाची अनागोंदी समोर आली असतानाच, आता या नव्या प्रकारामुळे या खात्याची पुन्हा नाचक्की झाली आहे.

सध्या जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यामुळे पशुपालक आधीच हतबल झाले असताना त्यांच्या अडचणीत भर टाकण्याचे काम पशुसंवर्धन खात्याने केले आहे. जनावरांना भलतीच लस दिल्यामुळे खात्याच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून ‘पशुसंवर्धन विभागापासून सावधान’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
रविकिरण पाटील, पशुपालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT