Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराकडे नको दुर्लक्ष

Lumpy Virus : ‘लम्पी स्कीन’ हा गोवर्गीय जनावरांतील देवीवर्गीय विषाणूजन्य आजार आहे. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता अधिक आहे. आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.

Team Agrowon

डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. बी. बी. दरंदले, डॉ. प्रवीण झिने
Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ हा गोवर्गीय जनावरांतील देवीवर्गीय विषाणूजन्य आजार आहे. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता अधिक आहे. आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. आजारी जनावरांतील लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना करावी.

लम्पी स्कीन हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण जरी कमी असले, तरी दूध उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि नियंत्रण वेळेवर करणे आवश्यक आहे. लम्पी स्कीन हा गोवर्गीय जनावरांतील देवीवर्गीय विषाणूजन्य आजार आहे. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता आणि मृत्युदर अधिक असतो.

तुलनेने देशी जनावरांमध्ये याची तीव्रता आणि मृत्युदर कमी असल्याचे दिसून आले आहे. कॅप्रीपॉक्स या देवीवर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो. वाहतुकीमुळेसुद्धा या आजारास कारणीभूत विषाणू लांब अंतरापर्यंत संक्रमित होतो. आजाराचे विषाणू बाधित जनावरांच्या रक्तात किमान पाच दिवस ते दोन आठवडेपर्यंत राहतात.

एडीस प्रजातीच्या कीटकाव्यतिरिक्त स्टोमॉक्सिस माश्‍या आणि रिफिसेफॅलस गोचिडाद्वारे या आजाराचा प्रसार होतो. अशा जनावरांचे रक्त शोषण करणारे कीटक प्रसाराचे कार्य करतात. तसेच डास, चिलटे, दूषित पाणी, चारा आणि बाधित जनावरांपासून आजाराचा प्रसार होतो.
हा आजार दमट आणि उष्ण वातावरणात जास्त प्रमाणात दिसून येतो. सूर्यप्रकाशात हा विषाणू निष्क्रिय होतो. मात्र ढगाळ वातावरण, अंधाऱ्या ठिकाणी आणि बाधित गोठ्यात काही महिने सक्रिय राहतो.

लक्षणे दाखवीत असलेल्या जनावरांच्या त्वचा, अश्रू, लाळ आणि तोडावाटे १८ ते २० दिवसांपर्यंत विषाणूचे उत्सर्जन होते. बाधित वळूच्या वीर्यात विषाणू उत्सर्जित होतात. त्यामुळे विषाणू प्रदूषित वीर्यातून प्रसार होण्याची शक्यता असते. बाधित जनावराच्या दुधात सुद्धा विषाणू उत्सर्जन होते. दुधावाटे वासरांत आजाराचा प्रसार होतो. माणसात या आजाराचा प्रसार होत नाही. त्यामुळे दूध उकळून प्यावे.

लक्षणे ः
१) आजाराने बाधित जनावरे चारा खाणे कमी करतात, पाणी कमी प्रमाणात पितात. दूध उत्पादन अचानक कमी होते.
२) संक्रमण झाल्यानंतर विषाणू साधारणपणे दोन आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये वास्तव्य करतात. शरीराच्या विविध भागांत विषाणू संसर्गाने वेदनादायी दाह निर्माण होतो. जनावरे साधरणत एक ते पाच आठवड्यांनंतर लक्षणे दाखविण्यास सुरुवात करतात. सर्वप्रथम डोळ्यांतून अश्रू आणि नाकातून शेंबूड वाहण्यास सुरुवात होते. डोळ्यांवर चिपाड येतात. खांदा आणि मांडीतील लसिका ग्रंथी सुजतात.
३) ताप १०४ ते १०६ अंश फॅरनहाइट दरम्यान असतो. ताप एक आठवड्यापर्यंत राहू शकतो. ताप आल्यानंतर ४८ तासांत त्वचेवर १० ते ५० मिलिमीटर परिघाच्या गाठी येतात. अशाच गाठी पचनसंस्था, श्‍वसनसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या विविध अवयवांत दिसतात. त्यामध्ये पूसारखे द्रव्य साठते. त्या ठिकाणी व्रण तयार होतात. व्रणाच्या सभोवताली खपल्या तयार होतात. तोंड आणि नाकाच्या श्‍लेष्म त्वचेवर व्रण दिसतात. पू-मिश्रित शेंबूड दिसून येतो. लाळ जास्त प्रमाणात गळते.
४) बाधित जनावरांत फुफ्फुसाचा दाह, कासेचा दाह आणि पायांवर सूज दिसून येते. जनावरे लंगडतात, वैरण कमी खातात, रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.
५) वळू काही काळ किंवा नेहमीसाठी नपुंसक बनू शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. बाधित गायी कित्येक महिने फळत नाहीत.
६) बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यांत बरी होतात. मात्र बरी झालेली जनावरे पुढील ४० ते ४५ दिवसांपर्यंत विविध स्रावांत विषाणू उत्सर्जन सुरूच ठेवतात.

प्राथमिक काळजी, नियंत्रण आणि उपचार ः
१) आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. सध्या आपल्या देशात या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शेळ्यांच्या देवीची लस वापरली जाते. सामान्यतः या आजारावर लस उपलब्ध नसल्यामुळे शेळ्यांमध्ये देवी आजारासाठी वापरण्यात येणारी लस टोचली जाते. लसीची मात्रा प्रति जनावर १ मिलि त्वचेखाली अशी आहे.
२) लम्पी स्कीन आजाराच्या नियंत्रणासाठी हिसार येथील राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राने ‘लम्पी- प्रोव्हॅकइण्ड’ ही लस विकसित करण्यात येत आहे. 
३) बाधित जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. जनावरांवर कीटक, माश्‍या आणि गोचिडींचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) गोठ्याजवळ सांडपाणी, पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या गोठ्यातील भेटी शक्यतो टाळाव्यात. मृत जनावरांना खड्ड्यात मीठ टाकून पुरावे.
------------------
संपर्क ः डॉ. बी. बी. दरंदले, ९८२२७७६७५९
(पशुधन विकास अधिकारी, सोनई, ता. नेवासा, जि. नगर)
डॉ. प्रवीण झिने, ८५५०९०२६६०
(सहायक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यलय, सोनई, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Disease : उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव

Paddy Pest Control : भातावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण

Crop Compensation : राज्यात ३८ लाख एकर पिकांना अतिवृष्टीचा फटका; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत

Vegetable Pest Management : भाजीपाला पिकांवरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन

CP Radhakrishnan oath : सी. पी. राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ, जगदीप धनखड यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT