Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed : पशू आहारातील पोषक तत्त्वांचे महत्त्व

डॉ. पराग घोगळे

दुभत्या गाई, म्हशींना (Milch Animal) रोज लागणाऱ्या हिरवा चारा (Green Fodder), कोरडा चारा (Dry Fodder), मुरघास (Silage), पशू खाद्य (Animal Feed) इत्यादी मधून विविध प्रकारची पोषक तत्त्वे मिळत असतात. त्यांचे पचन मुख्यत्वे रुमेन किंवा किण्वन पोटात होते.

लहान वासरू, कालवड, दुभती गाय/ म्हैस, गाभण जनावरे व बैल इत्यादींना त्यांचे वजन आणि उत्पादनाप्रमाणे आहाराची गरज असते. यामध्ये नवजात वासरांना काफ स्टार्टर, हिफर फीड, दुभत्या गाई, म्हशींना बायपास प्रोटीन, बायपास फॅटयुक्त पशुआहार, गाभण गाईंचा आहाराचा समावेश होतो.

या सर्व चारा, खाद्य इत्यादी मधून जनावरांना जे पोषक घटक मिळतात त्याबद्दल प्रत्येक पशुपालकाला माहिती असणे आवश्यक आहे. पशू आहारामध्ये दोन गोष्टी आपल्याला मिळतात. त्या म्हणजे चारा खाद्य इत्यादी मधले पाणी (आर्द्रता)आणि ड्राय मटर (पाणी विरहित कोरडा पदार्थ).

पाणी

पाणी हे जनावरांच्या जीवनावश्यक गटात मोडते. जर शरीरातील एक दशांश पाणी कमी झाले तरी जनावर दगावू शकते. इतर सर्व आवश्यक पोषक घटकांमध्ये पाण्याचे स्थान हे खूप वरचे आहे.

पाणी हे पोषक तत्त्वे विरघळवण्याचे एक मध्यम आहे, ज्यायोगे ही तत्त्वे शरीराच्या विविध भागात पोहोचू शकतात. शरीरात तयार झालेली ऊर्जा शोषून घेऊन तापमान वाढू न देणे, विविध जीवनसत्वे व पोषक तत्त्वे यांचे पोटात पचन, वहन आणि शोषण करणे तसेच अपचनीय घटक शरीरातून काढून टाकण्यासाठी पाणी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पाण्याचे अनेक उपयोग आहेत.

पशू आहारामध्ये पाणी मिसळून दिल्याने तो जनावरांना खाण्यासाठी सुखकर होतो. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त चारा खाद्य व विविध चयापचय प्रक्रियेद्वारे शरीरात तयार होणारे पाणी इत्यादी द्वारे प्राप्त होते.

ड्राय मटर

सेंद्रिय पदार्थांमधून गाई, म्हशींना प्रथिने, ऊर्जा मिळते आणि असेंद्रिय पदार्थांमधून विविध प्रकारची खनिजे जनावरांना उपलब्ध होतात.

नायट्रोजनयुक्त प्रथिने

ज्या कच्या मालामध्ये पशू आहारामध्ये नायट्रोजन उपलब्ध असतो अशा पदार्थांपासून जनावरांच्या शरीराला चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात. प्रथिने या एका घटकांमध्ये सुमारे २७ प्रकारची अमिनो आम्ले येतात. यामधील ९ अमिनो आम्ले अत्यावश्यक गटात मोडतात जसे की, मीथीओनीन, लायसीन इत्यादी. बाकी मध्यम आवश्यक व अनावश्यक घटकात मोडतात.

प्रथिनांचे पचन हे रुमेन किंवा किण्वन पोट यामध्ये उपलब्ध असणाऱ्या जिवाणू व एकपेशीय आदिजीव व त्यांच्या कडून होणाऱ्या नत्र किंवा नायट्रोजनच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.

प्रथिनांचे पचन हे आहारातील ऊर्जेवर अवलंबून असते. सर्व पचलेली प्रथिने छोट्या आतड्यातून शरीरात शोषली जातात.

फॅट किंवा मेदवर्गीय पदार्थ

तेलवर्गीय पदार्थांपासून जनावरांना ऊर्जा मिळते. तेल हे सामान्य तापमानाला द्रवरुपात असते तसेच त्यात संतृप्त व असंतृप्त मेदाम्ले असतात. संतृप्त मेदाम्ले जसे की, ब्यूटारिक आम्ल, पाल्मिटिक आम्ल, स्टिंअरिक आम्ल, लौरिक आम्ल इत्यादी. असंतृप्त मेदाम्ले जसे की, ओलेईक आम्ल, लीनोलेईक आम्ल, लीनोलेनिक आम्ल इत्यादी.

बायपास फॅट हे पाम या स्रोतापासून बनवले जाते. म्हैस वर्गीय जनावरांना मोहरीचे तेल देणे प्रचलित आहे. तेल किंवा मेदवर्गीय पदार्थांमधून प्रथिने आणि कर्बोदके यांच्यापेक्षा २.२५ पटीने ऊर्जा जनावरांना मिळते.

कर्बोदके ( कार्बोहायड्रेट्‌स)

ऊर्जारूपी कर्बोदकांचे सूक्ष्मजिवांद्वारे पचन होते. यामध्ये सेल्युलोज, हेमी सेल्युलोज, पेक्टीन व स्टार्च यांचे विघटन होते. रुमेन म्हणजेच किण्वन पोट यामध्ये कर्बोदकांच्या विघटनानंतर अस्थिर स्वरूपाची मेदाम्ले तयार होतात.

यामध्ये अॅसिटिक सुमारे ६५ ते ७० टक्के, प्रोपिऑनिक २० ते २५ टक्के आणि ब्यूटायरिक ९ ते १० टक्के, आयसोब्यूटायरिक ४ ते ५ टक्के आणि व्हॅलेरिक ०.५ ते १ टक्के असे प्रमाण असते. या प्रमाणामध्ये पशू आहारात धान्य घटक वाढले की बदल होतो.

दिवसभरामध्ये गाई, म्हशींच्या पोटात सुमारे ४ किलो इतके आम्ल (अॅसिड) तयार होते. तसेच या अस्थिर स्वरूपाच्या मेदाम्लापासून यकृतामध्ये (लिव्हर) सुमारे ८० ते ८५ टक्के ग्लुकोज बनते. १५ ते २० टक्के मूत्रपिंड (किडनी) मध्ये तयार होते.

फेनोलिक संयुगे

चाऱ्यामध्ये असणारे लीग्निन व टॅनिन सारखे घटक, लीग्निन हा पूर्णपणे अपचनीय असून तो शेणावाटे शरीराबाहेर फेकला जातो.

जीवनसत्वे

जीवनसत्वे ही विविध जीवनावश्यक बाबींसाठी उपयोगी पडतात. यामध्ये पाण्यात विरघळणारी ब जीवनसत्वे तसेच मेद किंवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्व अ ,ड, ई व जीवनसत्त्व क यांचा समावेश होतो.

वरील सर्व पोषणतत्त्वे सेंद्रिय तत्वात मोडतात आणि असेंद्रिय तत्वात सर्व खनिजद्रव्ये येतात. जनावरांच्या शरीराला दोन प्रकारच्या खनिजांची गरज असते.

प्रयोगशाळेत पशुखाद्याची तपासणी

पशुआहारातील विविध घटक जसे की कच्चा माल, तयार पशुखाद्य, हिरवा चारा, कोरडा चारा, मुरघास इत्यादी तपासणी करताना त्यात असणारी आर्द्रता म्हणजेच पाण्याचे प्रमाण तसेच प्रथिने, तेल किंवा स्निग्ध पदार्थ, तंतूमय घटक, सँड सिलिका, नायट्रोजनमुक्त पदार्थ, ऊर्जा (किलो कॅलरी ) आणि एकूण पचनीय पदार्थ इत्यादींची तपासणी करावी.

पृथक्करण अहवालावरून आपल्या नजीकच्या पशुवैद्यकाकडून योग्य चारा व खाद्य यांचे प्रमाण यांची खातरजमा करावी.

विविध खाद्य घटकांतून जनावरांना मिळणारे पोषक घटक योग्य प्रमाणात जनावरांच्या शरीरात गेल्यास त्यांचे पचनही व्यवस्थित होते. दूध उत्पादन व शरीर स्वास्थ्य उत्तम राहते.

जनावरांच्या वाढीसाठी खनिजे महत्त्वाची

मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे (मॅक्रो खनिजे) : कॅल्शिअम, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशिअम, सोडियम, पोटॅशिअम.

सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे (मायक्रो खनिजे): झिंक, कोबाल्ट, मँगेनीज, तांबे, लोह, आयोडीन, सेलेनिअम इत्यादी.

जनावरे वेळेवर माजावर येणे व गाभण राहाणे, वासराची योग्य वाढ होणे, विताना वार न अडकणे, खुरांची काळजी घेणे, कासदाहाला प्रतिकार करणे, खाद्य व चाऱ्याचे योग्य पचन करण्यासाठी खनिजे महत्त्वाची आहेत.

चारा इत्यादींपासून जनावरांना तंतूमय घटक मिळतात. यामध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलेज व लीग्निन असे तीन घटक असतात. यातील पहिले दोन घटक पूर्णतः किंवा अंशतः जनावरे पचवू शकतात. लीग्निन न पचता शरीराबाहेर पडते.

चारा कमी पडला तर जनावरांना अॅसिडिटी होते आणि चारा जास्त झाला तर खाण्याचा वेग मंदावतो. जितके रवंथ चांगले होईल तितका चारा चांगला पचला जातो. गहू, मका, ज्वारी,बाजरी, सातू, ओटस इत्यादींपासून जी ऊर्जा मिळते ती पोटातील जिवाणू, आदिजीव इत्यादींना वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते.

तेल असणारे किंवा बायपास फॅट इत्यादी घटक पशू आहारातील ऊर्जेची घनता वाढवतात. म्हणजेच कमी वजनात जास्त ऊर्जा सामावलेली असते.

पशू आहारात किण्वन पोटात पचणारे व बायपास प्रोटीन अशा दोन्हीची आवश्यकता असते तरी जास्त बायपास प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास किण्वन पोटाची आम्लता वाढणार नाही.

- डॉ. पराग घोगळे,

९८९२०९९९६९

(लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : शिर्डीतल्या तिरंगी लढतीकडे लागले राज्याचे लक्ष

Unauthorized Seed Stock : एक लाख रुपयांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Pre Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण

Millet Crop : भरडधान्याची पिके वाढून विकास होईल; नांदेड येथे मराठवाड्यातील भरडधान्य पिक परिषदेत तज्ज्ञांचा आशावाद

Fodder Production : चारा पिकांच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ

SCROLL FOR NEXT