Animal feed Agrowom
काळजी पशुधनाची

Animal Feed : दुधाळ जनावरांच्या आहारात खनिजद्रव्यांचे काय आहे महत्त्व?

Balanced Feeding of Animals : आपल्याकडील जमिनीमध्ये स्फुरद व तांबे या खनिजद्रव्यांची अधिक कमतरता आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या आहारात आणि दुधात येणाऱ्या खनिजद्रव्यांचा समतोल ढासळून जनावरांना खनिजद्रव्यांचा कमतरतेमुळे आजार होतात. हे लक्षात घेऊन जनावरांना समतोल आहार द्यावा.

Team Agrowon

डॉ. अभिषेक सोनटक्के, डॉ. जी. एम. गादेगावकर

Animal Care : दुधाळ जनावरांचे उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी चाऱ्यातून मिळणारे अन्नघटक आणि दुधामध्ये तयार केले जाणारे अन्नघटक या दोन्हीमध्ये समतोल राखणे खूप महत्त्वाचे असते.

या अन्नघटकांमध्ये ऊर्जा, प्रथिने, चरबी, खनिजक्षार आणि जीवनसत्त्वे हे महत्त्वाचे घटक आहेत. जनावरांच्या आहारामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे खनिजक्षार. शरीराच्या गरजेनुसार खनिजांचे विभाजन केले जाते.

- मुख्य / प्रमुख खनिज क्षार (मॅक्रो मिनरल्स)

- दुय्यम /सूक्ष्म खनिज क्षार (मायक्रो मिनरल्स/ ट्रेस मिनरल्स)

मुख्य खनिजद्रव्ये ही प्रामुख्याने दूध उत्पादनात वृद्धी व शरीराची वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. यामध्ये येणारे कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, सोडिअम क्लोराइड, सल्फर या खनिजद्रव्यांचा अवलंब होतो.

याउलट सूक्ष्म खनिजद्रव्ये ही अतिशय कमी प्रमाणात शरीरातील विविध प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये तांबे, लोह, कोबाल्ट, सेलेनियम, आयोडीन, मँगेनीज, जस्त आणि मॉलिब्डेनम इत्यादींचा अवलंब होतो. जनावरांची रोग प्रतिकार शक्ती, प्रजनन, वाढ व दूध उत्पादनासाठी या दोन्ही प्रकारच्या खनिज क्षारांची शरीरास आवश्यकता असते.

जनावरांच्या खाद्यात पुरविण्यात येणारा हिरवा, वाळलेला चारा आणि खुराक मिश्रण हे खनिज द्रव्यांचे स्रोत आहेत. चाऱ्यामधील खनिज द्रव्यांचे प्रमाण हे तेथील भौगोलिक परिस्थिती, वापरली जाणारी चारा लागवडीची पद्धत, मातीमधील खनिजांचे प्रमाण आणि वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर अवलंबून असते.

आपल्याकडील जमिनीमध्ये स्फुरद व तांबे या खनिजद्रव्यांची अधिक कमतरता आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या आहारात आणि दुधात येणाऱ्या खनिजद्रव्यांचा समतोल ढासळून जनावरांना खनिजद्रव्यांचा कमतरतेमुळे आजार होतात. त्यामुळे उपचारावर अधिक खर्च होतो. दूध उत्पादनात घट होऊन मोठे आर्थिक नुकसान होते, यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची ठरते.

मुख्य खनिजांच्या अभावामुळे आढळणारे आजार

दुग्ध ज्वर

- कॅल्शिअम कमतरतेमुळे हा आजार प्रामुख्याने उच्च दूध देणाऱ्या गायींमध्ये १ ते २ दिवस विण्यापूर्वी आणि २४ ते ४८ तास व्यायल्यानंतर दिसतो.

- देशी गायी व म्हशींमध्ये हा आजार काही प्रमाणात आढळतो. दुभत्या जनावरांमध्ये कॅल्शिअम घटकाचे चीक आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात विमोचन होऊन रक्तातील कॅल्शिअम कमी होते. अशा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात.

- रक्तातील कॅल्शिअम कमी झाल्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा वाढतो. आजाराचे विविध टप्पे व त्याची लक्षणे आजारी जनावरांमध्ये दिसून येतात.

लक्षणे

पहिला टप्पा - सर्वप्रथम भूक मंदावणे, दूध उत्पादनात घट होते, अतिसंवेदनशीलता वाढते.

दुसरा टप्पा - जनावर पोटांवर बसून राहतात व मान पोटावर वळवून बसतात.

तिसरा टप्पा - पीडित जनावर पोटाच्या बाजूंवर पडून राहतात. तत्काळ उपचार न मिळाल्यास दगावू शकतात.

उपचार पद्धती

- आजारी जनावरांना वेळेत पशुवैद्यकाकडून कॅल्शिअमचे सलाइन द्यावे. जनावरांच्या आहारात कॅल्शिअम योग्य प्रमाणात पुरवावे.

- अतिसंवेदनशील काळात उच्च दूध देणाऱ्या जनावरांच्या आहारात कॅल्शिअम, जीवनसत्त्व-ड यांचा पशुवैदकाच्या सल्ल्याने नियमित पुरवठा करावा.

- गाभण काळातील शेवटच्या २ ते ३ आठवड्यांमध्ये आहारात कॅल्शिअमची मात्रा द्यावी. जेणेकरून पॅराथारॉइड ग्रंथी जनावर प्रस्तुत झाल्यानंतर आणि त्याच्या काळात कार्यरत होतील. या काळात लसूण, बरसीम, चवळी यांसारख्या द्विदल वनस्पतीचा चारा टाळावा.

लाल लघवी

- स्फुरद खनिजद्रव्यांच्या कमतरतेमुळे गाभण काळाच्या शेवटच्या २ ते ३ महिने या कालावधीत प्रामुख्याने म्हशींमध्ये हा आजार आढळून येतो.

- दूध उत्पादनासाठी, गर्भवाढीसाठी स्फुरदाची मात्रा आणि आहारातून उपलब्ध होणारी स्फुरदाची मात्रा यात असमतोल आढळल्यास हा आजार होतो.

लक्षणे

- भूक मंदावणे, दूध उत्पादनात घट्ट होणे

- प्लॅस्टिक, दोरी खायला लागणे (पायका)

- लघवीला लाल रंग येतो.

- लाल पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यास असे जनावर रक्तक्षय होऊन दगावू शकतात.

उपाययोजना

- आजारी जनावरांना पशुवैद्यकामार्फत तत्काळ योग्य उपचार करावेत.

- रक्तक्षय तीव्र असल्यास रक्त संक्रमण करावे लागते.

- आजार टाळण्यासाठी जनावरांच्या आहारात विशेषतः गाभण काळातील शेवटचे २ ते ३ महिने या काळात खाद्यामध्ये खनिजद्रव्यांचा पुरवठा केल्यास हा आजार टाळता येतो.

हायपोमॅग्नेशिअम टिटॅनी

- मॅग्नेशिअम खनिजांच्या आहारातील कमतरतेमुळे लहान वासरे व दुभती जनावरे यांच्यात हा आजार दिसतो. या आजारांमध्ये रक्तातील मॅग्नेशिअमचे प्रमाण कमी होते. मेंदूतील चेतासंस्था उत्तेजित होते.

- आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते.

- हिरव्या व कोवळ्या चाऱ्यांमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण कमी असते. फक्त अशा प्रकारचा चारा जनावरांना खावयास दिल्यास ते आजारी पडते.

- प्रादुर्भाव टाळण्यासाठी आहारात नियमितपणे मॅग्नेशिअम खनिजद्रव्यांचा पुरवठा करावा.

- खनिजद्रव्यांचा पुरवठा केल्यास कमतरतेमुळे होणारे विविध आजार टाळता येतील. त्यांच्या उपचारावर येणारा खर्च, दूध उत्पादनात होणारी घट व आर्थिक नुकसान टाळता येते.

संपर्क - डॉ. अभिषेक सोनटक्के, ७०२०२११४७० -डॉ. जी. एम. गादेगावकर, ९८६९१५८७६० (पशुपोषण आहार विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT