Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : नवजात करडांच्या वजनावर कसं ठेवणार लक्ष?

गाभण शेळीस गाभणकाळाच्या ९० दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळाच्या शेवटच्या ३ ते ४ आठवड्यांमध्ये गर्भाशयातील पिलांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्यावा.

Team Agrowon

डॉ. संजय भालेराव, डॉ. समाधान गरंडे, डॉ. सारण्या ए.

Goat Farming : शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर अवलंबून असते. करडांच्या (Kid) वाढीच्या वयाचे जन्मापासून दोन महिने वय, दोन ते चार महिने वय आणि चार ते सहा महिने वय असे साधारण तीन टप्पे असतात.

जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. चांगल्या वजनाची, सशक्त करडं जन्मण्यासाठी शेळीच्या गाभणकाळात योग्य व्यवस्थापन करावे.

गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा, योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. या आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भाच्या वाढीसाठी; तसेच शेळीच्या शरीरातील पोषणूल्यांचा साठा वाढविण्यासाठी होतो.

जसजसे विण्याची तारीख जवळजवळ येईल तसतसे चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराकाचा पुरवठा करावा. गाभण शेळीस गाभणकाळाच्या ९० दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते.

गाभणकाळाच्या शेवटच्या ३ ते ४ आठवड्यांमध्ये गर्भाशयातील पिलांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्यावा. विशेषतः जुळे किंवा तिळे देणाऱ्या शेळीची गाभणकाळात जास्तीची काळजी घ्यावी.

शेळीच्या गाभणकाळातच योग्य ती काळजी घेतल्यामुळे जन्मणारी करडं ही सशक्त, वजनदार, चपळ जन्मतात. या करडांची वाढही झपाट्याने होते.

नवजात करडांची जन्मानंतर तत्काळ घ्यावयाची काळजी

१) जन्मानंतर पहिल्या २४ तासांत करडांची विशेष काळजी घ्यावी लागते. यावेळी करडांना जास्त ऊर्जेची गरज असते. नवीन वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते.

२) सर्वसाधारणपणे शेळी व्यायल्यानंतर तिच्या पिलास चाटून स्वच्छ व कोरडे करते. जन्मानंतर पहिल्या २० मिनिटांत करडे उभे राहून दूध पिण्यासाठी प्रयत्न करतात.

करडांची नाळ २ ते ३ इंच अंतरावर निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापून त्यास टिंक्‍चर आयोडीन किंवा जंतुनाशक लावावे. म्हणजे नाळेमधून जंतुसंसर्ग होणार नाही, करडू आजारी पडून दगावणार नाही.

३) नवजात करडास जन्मल्यानंतर अर्धा ते एक तासामध्ये चीक पाजावा. करडास स्वतःहून व्यवस्थित पिता येत नसल्यास चीक बाटलीत काढून निपल असणाऱ्या बाटलीने थोडा थोडा ठसका न लागता पाजावा. चीक पाजून झाल्यानंतर त्या करडाचे तोंड कापडाने पुसून घ्यावे किंवा पाण्याने धुऊन घ्यावे. कारण चिकटपणामुळे माश्‍या बसतात, मुंग्यांचा प्रादुर्भाव होतो.

४) नवजात करडाचे पोट लहान असल्यामुळे त्यांना थोड्या थोड्या अंतराने सतत दूध देणे गरजेचे असते. शेळीचे दूध उत्पादन कमी असेल तर करडाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

त्यांची तीव्रता जुळ्या-तिळ्या करडांच्या बाबतीत अधिक जाणवते. अशावेळी उच्चप्रतीचे प्रथिने (२० ते २२ टक्के) असलेला खुराक करडांना द्यावा.

करडांचा आहार:

१) करडांचा जन्म झाल्यावर मातेचा चीक हाच सर्वोत्तम खुराक आहे. जन्माच्या पहिल्या ४ ते ५ दिवसांत वजनाच्या १० टक्के चीक करडांना देणे गरजेचे असते.

दिवसातून ३ ते ४ वेळा विभागून पिण्यास द्यावा. या चिकातून करडाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारशक्ती तसेच मोठ्या प्रमाणात जलद वाढीसाठी आवश्यकता असणारी प्रथिने, जीवनसत्त्व, लोह इ. घटक मुबलक प्रमाणात मिळतात.

२) चीक योग्य प्रमाणात दिल्यास करडे-कोकरे सशक्त आणि निरोगी बनतात.

३) करडांच्या आईस चीक नसेल तर दुसऱ्या शेळीचा चीक उपलब्ध असल्यास पाजावा किंवा पाणी २६४ मि.लि.+ दूध ५७५ मि.लि. + एरंडी तेल २. ५ मि.लि. + १ अंडे + १०,००० आय यु जीवनसत्त्व ""अ'' + ऍरोमायसीन ८० मि. ग्रॅम यांचे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा विभागून द्यावे.

४) नवजात करडास पाच दिवसांनंतर करडाच्या वजनाच्या १०० टक्के इतके दूध पाजावे किंवा करडास व्यवस्थित पचन होऊन त्या प्रमाणात दूध पाजावे. दूध पिण्यासाठी सोडल्यास थोडा वेळ करडांना त्यांच्या आईजवळ खेळू द्यावे. यामुळे करडांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते.

५) करडे वयाच्या १ ते २ आठवड्यांपासून चारा चघळण्यास सुरवात करतात. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण (लसूणघास, शेवरी, सुबाभूळ) द्यावी.

६) लहान करडांना एकदम जास्त प्रमाणात हिरवा चारा आणि कोवळे गवत खाण्यास देऊ नये. यामुळे हगवण लागेलच परंतु करडांना आंत्रविषार होण्याची भीती असते.

७) करडू २५ दिवसांचे असल्यापासून थोडा (५० ग्रॅम) खुराक द्यावा. खुराकातील प्रथिने मिळाल्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होईल.

८) करडांना चांगल्या प्रतीचा चारा आहारात दिल्यास (लसूणघास, बरसीम) करडांची वाढ झपाट्याने होते. खुराकावरील खर्च कमी करता येतो.

९) करडांच्या वाढीचा वेग पहिल्या दोन महिन्यांत शेळीच्या दूध उत्पादनाच्या समप्रमाणात असतो. त्यानंतरच्या काळात करडांचे दूध हळूहळू बंद करून खुराक व वैरणीवर जोपासना करावी.

१०) पहिल्या तीन महिन्यांतील करडांची वाढ पूर्णपणे आहारावर अवलंबून असते. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट करण्यासाठी व जलद वाढीसाठी आहार व्यवस्थापनाची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

साधारणतः करडे २ ते २.५ महिन्यांचे होईपर्यंत शेळीचे दूध पाजावे. नंतर त्याला हळूहळू दुधापासून तोडावे.

करडांची वजनवाढ महत्त्वाची

१) करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण्यासाठी करडांचे आठवड्यातून एकदा तरी वजन करावे. वाढीच्या प्रमाणावर आहारात योग्य तो बदल करावा.

२) शेळीच्या करडांसाठी प्रथिनयुक्त खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १८ टक्के इतके व एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण ७५ टक्के असावे.

३) शेळीपासून वेगळे केलेल्या पिलास उत्तम वाढीसाठी अधिक पोषणतत्त्वांची गरज असते. प्रथिनयुक्त खाद्य देताना उत्पादन खर्च व वजनवाढ या बाबींचा विचार करून प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. जेणेकरून नफा वाढेल. खाद्य व वजनवाढ यांचे प्रमाण ५:१ असे असावे.

४) बाजारपेठेत करडाच्या किती किमान वजनाला मागणी आहे, याचा विचार करून करडांचे व्यवस्थापन करावे. सर्वसाधारणपणे दोन महिन्यांपर्यंत करडाचे ८ किलो किंवा मूळ वजनाच्या चारपट वजन मिळू शकते. पौष्टिक आहार व व्यवस्थापनावर वयाच्या तीन महिन्यांपर्यंत करडाचे वजन १५ किलो अपेक्षित आहे.

५) वयाच्या एक वर्षापर्यंत अपेक्षित असलेल्या वजनापैकी ६५ टक्के वजन पहिल्या तीन महिन्यांत मिळते. त्यापैकी सर्वाधिक ४३ टक्के वजन पहिल्या, २८ टक्के दुसऱ्या, २९ टक्के तिसऱ्या महिन्यात मिळते. देशी करडांच्या प्रतिदिन वजन वाढीनुसार वर्गीकरण करतात.

दैनंदिन वजनवाढीचा तक्ता

अ. क्र.---वजनवाढ (ग्रॅम प्रति दिन)---शेरा

१---४० ग्रॅम पेक्षा कमी---असमाधानकारक

२---४० ग्रॅम ते ६० ग्रॅम---समाधानकारक

३---६० ग्रॅम ते ८० ग्रॅम---चांगली

४---८० ग्रॅम ते १०० ग्रॅम---उत्कृष्ट

५---१०० ग्रॅमपेक्षा जास्त---अत्यंत उत्कृष्ट

संपर्क : डॉ.संजय भालेराव,९०९६३२४०४५, (सहाय्यक प्राध्यापक, पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT