Sheep Rearing
Sheep Rearing Agrowon
काळजी पशुधनाची

Sheep Rearing : मेंढीपालनातून मिळवला शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत

सुदर्शन सुतार

सोलापूर- बार्शी महामार्गावर खेडपासून आत दहा किलोमीटरवर मार्डी हे तीर्थक्षेत्र श्री यमाईदेवीचे गाव आहे. येथे युवा शेतकरी बिरुदेव गिरे यांच्या कुटुंबाची केवळ दोन एकर शेती आहे. आई नीलाबाई, वडील शिवाजी आणि भाऊ बलभीम असे त्यांचे कुटुंब आहे. वडील ३५-४० वर्षांपासून मेंढीपालन व्यवसायात (Sheep Rearing) आहेत. त्यामुळे बिरुदेव यांनाही लहानपणापासून मेंढीपालनाची (Sheep Farming) आवड होतीच. त्यामुळे मेंढी संगोपनचा दीर्घ अनुभव सोबत घेताना त्यातील बारकावेही माहीत करून घेतले.

वडील मुख्यतः गावरान मेंढीपालन करायचे. शेतीचे क्षेत्र जेमतेम त्यातच पुढे शिकण्यासाठी आर्थिक परिस्थितीही बळकट नव्हती. साहजिकच नोकरीचीही शाश्‍वती नसल्याने बिरुदेव यांनीही २०१४ मध्ये बारावी झाल्यानंतर वडिलांचा मेंढीपालन व्यवसाय पुढे नेण्याचे ठरविले. सुरुवातीला घरच्यांनी थोडासा विरोध केला. पण नंतर पाठिंबा मिळाला. आज कुटुंबाच्या साथीमुळेच व्यवसायात वाढ करण्यास वाव मिळाला आहे.

व्यवसायाचे रूप दिले

आपल्या हाती व्यवसाय आल्यानंतर बिरुदेव यांनी बाजारपेठा, ग्राहक यांचा अभ्यास केला. त्यातून माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना अधिक मागणी असल्याचे समजले. या जातीचे संगोपन करणाऱ्या काही मेंढपाळांकडे जाऊन अधिक माहिती घेतली. त्यानंतर इंडी (कर्नाटक) येथील मेंढी बाजारात जाऊन तीन हजार रुपयांना दोन महिन्यांचा नर मेंढा खरेदी केला. त्यानंतर घरी मेंढ्यांची पैदास सुरू केली. सुरुवातीला काही अडचणी आल्या. पण नंतर गोठा (वाडा) वाढत गेला. विक्री होत गेली. तसा व्यवसायात चांगला जम बसू लागला.

४२ मेंढ्यांचा वाडा

आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसायातून बिरुदेव यांना बरंच काही शिकता आलेय त्यातून व्यवसायाची चांगली तयारी झाली. आता गावाशेजारीच खुली जागा घेऊन मेंढ्यांसाठी चांगला वाडा तयार केला आहे. सुरवातीच्या दहा- वीसपासून निव्वळ माडग्याळ जातीच्या जातिवंत अशा सुमारे ७० पर्यंत मेंढ्यांची पैदास झाली. त्यातील विक्रीतून आजमितीला संख्या ४२ पर्यंत आहे. त्यात ४० मेंढ्या आणि दोन नर मेंढे आहेत.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

-दररोज सकाळी सहा वाजता मेंढ्यांना वाड्यातून बाहेर काढले जाते.

-त्यानंतर वाड्याची संपूर्ण स्वच्छता होते.

-लेंड्या स्वतंत्रपणे साठवल्या जातात.

- पिलांना म्हशीच्या दुधात शेंगा पेंड घालून दिली जाते. यामुळे वजनात चांगली वाढ होते.

- दहाच्या सुमारास मुक्तपणे माळरानावर चरायला नेले जाते. दिवसभर फिरून ती चारा खातात.

-मुक्त भटकंतीतून चांगल्या पद्धतीने व्यायामही होतो.

-सायंकाळी सहाला मेंढ्या पुन्हा वाड्यात परततात.

-त्यानंतर मका, ज्वारीचे दाणे खाद्य म्हणून प्रति मेंढी एक किलो प्रमाणात दिले जाते.

- आजार आणि उपचारासाठी डॉ. सुधीर गावडे यांचा सल्ला घेण्यात येतो. आजारी मेंढ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यांना फिरायला न नेता वाड्यातच ठेवले जाते.

वजनावर दर, व्यापारी थेट जागेवर

वर्षातून दर पाच महिन्याला वेत होते. दोन्ही वेतांमधून वर्षाकाठी सुमारे ४० ते ५० पिलांची विक्री होते. विक्री साधारणपणे वय आणि वजनावर अवलंबून असते. कमी वय असणाऱ्या मेंढ्यांना अधिक पसंती असते. देखणे शरीर, चपळपणा हे गुण माडग्याळ जातीत ठासून भरलेली असल्याने त्यांचा चांगला दर मिळण्यात अडचणी येत नाहीत. सुमारे तीन महिने वयाच्या पिलाला सात ते आठ हजार रुपये तर १० ते १२ किलो वजनाच्या मेंढ्याला १० ते १५ हजारांपर्यंत दर मिळतो. मादीची विक्री शक्यतो करीत नाहीत.

विक्रीसाठी सहसा बाजारपेठेत जाण्याची गरज भासत नाही. सोलापूरसह अनगर (मोहोळ), मुरुड (लातूर), जेऊर (करमाळा) सह दुरून व्यापारी येऊन जागेवर खरेदी करतात. वर्षभरात तीन ते चार लाख रुपये वा त्याहून अधिक उत्पन्न मिळण्याची शाश्‍वती बिरुदेव यांनी या व्यवसायातून तयार केली आहे. मेंढ्या शक्यतो मेंढीपालनासाठी, तर अनेक वेळा मटणासाठीही खरेदी केल्या जातात. शेळीच्या मटणापेक्षा मेंढीच्या मटणाला अधिक मागणी आहे. शिवाय दरही १०० ते २०० रुपयांच्या फरकाने जास्त आहेत.

माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये (इन्फो १)

-माडग्याळ जातिवंत मेंढ्या सर्वच एकसारख्या दिसत नाहीत.

-पण उंच्यापुऱ्या, पांढऱ्या, तांबूस, तपकिरी रंगाच्या, वजनदार, नाक, कान आणि तोंड काहीसे लंबकार, रुबाबदार असते. आपल्या वैशिष्ट्यांनी लक्ष वेधून घेतात.

-पांढरा रंग, त्यावर तपकिरी रंगाचे चट्टे आणि नाक पोपटाच्या चोचीसारखे. त्यांचीच खरेदी-विक्री जास्त होते. त्यामुले त्याच सर्वाधिक पाळल्या जातात.

भटकंतीतून उत्पन्न (इन्फो २)

थंडीच्या महिन्यांमध्ये जानेवारी ते मेपर्यंत साधारण पाच महिने व पावसाळ्याच्या आधीपर्यंत मेंढ्यांसह परिसरातील गावात भटकंतीही केली जाते. त्या गावातील शेतकरी लेंडीखतासाठी या मेंढ्या आपल्या शेतात बसवून घेतात. त्यासाठी मोबदला म्हणून प्रति दिवसाला चार किलो प्रमाणे किंवा वीस मेंढरांमागे दीड किलो ज्वारी वा मका देण्यात येतो. या संपूर्ण काळात सहा ते साडेसहा क्विंटल धान्य जमा होते. त्यातून वर्षभराच्या धान्याची चिंता मिटते. शिवाय मेंढ्या रानोमाळ चरत असल्याने चारा-पाण्याचा खर्चही वाचतो. भटकंतीदरम्यान मेंढ्यांची खरेदी-विक्री देखील सुकर होते.

लेंडीखताला मागणी

अलीकडील काळात सेंद्रिय खतांमध्ये शेळी व मेंढीच्या लेंडीखताला अधिक मागणी येऊ लागली आहे. बिरुदेव यांच्याकडील लेंडीखतालाही परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होते. दरवर्षी पाच ते सहा ट्रॉली लेंडीखत उपलब्ध होते. प्रति ट्रॅाली पाच ते सहा हजार रुपये दराने विक्री होते. त्यातून उत्पन्नाचा आणखी एक स्रोत तयार झाला आहे.

संपर्क ः बिरुदेव गिरे, ९६२३१७७३१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT