Milk Production
Milk Production Agrowon
काळजी पशुधनाची

Milk Fat : दुधातील स्निग्धांशावर परिणाम करणारे घटक

Team Agrowon

डॉ. जी. एम. गादेगावकर, डॉ. एस. ए. ढेंगे, डॉ. एम. एम. वैद्य

Dairy Business News : शासनाच्या नियमावलीनुसार गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये अनुक्रमे ३.५ आणि ६ टक्के फॅटचे प्रमाण असणे आवश्‍यक असते. यापेक्षा फॅटचे प्रमाण जर अधिक असेल तर दुधास जास्त दर मिळतो, याउलट फॅटचे प्रमाण यापेक्षा कमी असल्यास असे दूध स्वीकारले जात नाही. फॅटप्रमाणेच दुधास आवश्‍यकतेपेक्षा कमी डिग्री लागल्यास असे दूध नाकारले जाते.

जनावरांचा वंश, जात ः

- दूध उत्पादन क्षमता आणि फॅटचे प्रमाण हे गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जाते. जनावरांच्या वंशानुसार त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण बदलते.

- संकरित गायींचे दूध देण्याचे प्रमाण अधिक असते. अशा गाईंच्या दुधामध्ये फॅट व डिग्रीचे प्रमाण कमी लागते. तर कमी दुग्धोत्पादन असणाऱ्या गाईंच्या दुधामध्ये फॅट व डिग्रीचे प्रमाण जास्त असते.

- गाईच्या वेताच्या सुरुवातीच्या काळात दुग्धोत्पादन वाढत जाते. फॅट व डिग्रीचे प्रमाण कमी लागते. वेताच्या शेवटच्या काळात दुग्धोत्पादन कमी होत जाते. फॅट व डिग्रीचे प्रमाण जास्त लागते. अशा प्रकारे दुग्धोत्पादन आणि फॅट व डिग्रीचे यांचे परस्परास व्यस्त प्रमाण आढळून येते.

- म्हशीच्या दुधात फॅट ६ टक्क्यांपेक्षा जास्त असते. देशी गाईच्या दुधात ५ टक्के फॅट आणि होल्स्टिन फ्रिजियन या संकरित गाईच्या दुधात ३.५ टक्के फॅट असते.

- विशिष्ट जातीतील वेगवेगळ्या जनावरांच्या दुधातील फॅटचे प्रमाण ही वेगवेगळे असते. ते त्यांच्या आनुवंशिकतेनुसार बदलते.

दुभत्या जनावरांची आनुवंशिकता ः

- जनावरांमध्ये आनुवंशिकतेनुसार माता आणि पिता यांचे प्रत्येकी पन्नास टक्के गुण येतात. आनुवंशिकतेनुसार गाईच्या दुधातील फॅटचे प्रमाण तिच्या आईच्या दुधातील फॅटच्या प्रमाणावर अवलंबून असते.

म्हणून दूध उत्पादन आणि त्यातील फॅटचे प्रमाण याबाबत उत्तम आनुवंशिकता असणाऱ्या गाई- म्हशी पाळणे आणि त्यांच्या पैदाशीकरिता त्यासारखीच उत्तम आनुवंशिकता असणाऱ्या वळूचा वापर करणे आवश्‍यक असते.

- बऱ्याच वेळा गाय जास्त दूध देते. दुधातील फॅटचे प्रमाणही चांगले असते. तिची कालवड तिच्यापेक्षा जास्त दूध देते. मात्र फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. सर्व उपाययोजना करूनही तिच्या दुधातील फॅटचे प्रमाण वाढत नाही.

अशा परिस्थितीत या कालवडीचा जन्म होण्यासाठी योग्य वळूची निवड झाली नव्हती, असे म्हणता येईल. म्हणून पैदाशीकरिता वळूची निवड अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी सिद्ध वळूच्या रेतमात्रांचा वापर करावा.

जेणेकरून त्यासोबत येणाऱ्या वळूच्या आनुवंशिक माहितीचा आधार घेऊन योग्य त्या वळूची निवड पैदाशीसाठी करता येईल. अशा रेतमात्रा वापरणे सर्वसामान्य रेतमात्रांपेत्रा महाग पडेल; परंतु त्यापासून जन्माला येणारी कालवड उत्तमच गुणांची असेल.

- जर एखाद्या गाईची आनुवंशिक क्षमता ४ टक्के फॅटचे दूध देण्याची असेल, तर कोणतीही उपाययोजना करून तिच्यापासून त्यापेक्षा जास्त फॅट असणारे दूध मिळणार नाही. मात्र विविध कारणांनी तिच्या दुधातील फॅटचे प्रमाण त्यापेक्षा कमी होते.

म्हणूनच उत्तम आनुवंशिकता असणारी जनावरे जोपासणे आणि त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण त्यांच्या आनुवंशिक क्षमतेपेक्षा कमी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.

वासरू कासेला पाजणे ः

- जास्तीत जास्त पशुपालक वासरू दूध पिण्याकरिता गाई, म्हशींकडे सोडतात. त्यानंतर दूध काढतात. परंतु यामुळे दुधातील फॅट कमी होते. परंतु ज्या पशुपालकांना याचे परिणाम माहीत आहेत, असे पशुपालक दूध काढल्यानंतरच वासराला पाजतात.

- महत्त्वाची बाब अशी आहे, की दूधनिर्मिती कासेत सतत कार्यान्वित असते. फॅट हा घटक हलका असल्याने कासेच्या वरील भागातील दुधात जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे दूध काढताना सुरुवातीला दुधामध्ये फॅट कमी प्रमाणात असते, शेवटी दुधात फॅट जास्त असते.

परंतु बरेच पशुपालक दूध काढण्याच्या सुरुवातीस आणि शेवटी वासरास दूध पिण्यास सोडतात. सुरुवातीस पान्हा सुटण्यासाठी ही क्रिया योग्य आहे, कारण या वेळच्या दुधात फॅट कमी असते.

परंतु जसे जसे दूध काढण्यास चालू होते, तसतसे फॅट वाढत जाते. शेवटी १० टक्क्यांपर्यंत जाते; परंतु पशुपालक थोडे दूध कासेत शिल्लक असताना पुन्हा वासरास दूध पिण्यास सोडतो आणि नेमका फॅट वाढीचा फायदा मिळत नाही व तो वासरास मिळतो ज्याची त्यास गरज नसते, परिणाम दुधात फॅट लागत नाही.

हे टाळण्यासाठी वासरास सुरुवातीस पाजावे. ज्यामुळे पान्हाही सुटेल व वासरू ही भुकेले राहणार नाही किंवा वासरास कासेला दूध न पाजता भांड्यातून दूध पाजल्याने इतर अनेक फायदे होतात.

- दूध अपूर्ण काढल्यास दूधनिर्मिती प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊन दुधातील घटकाचे प्रमाण कमी होते. दूध पूर्णपणे ६ ते ७ मिनिटांच्या कालावधीत काढावे. गाई, म्हशींची धार काढताना पूर्ण दूध काढले, तर दुधातील फॅटवर परिणाम होत नाही. परंतु पूर्ण धार काढली नाही आणि कासेत दूध राहिले तर फॅट कमी होते.

दुभत्या जनावराचे आरोग्य ः

- दुधाळ जनावर आजारी पडल्यास दूध उत्पादन, फॅट आणि डिग्री यात घट होते. उदा. दुधाळ जनावरांना कासदाह आजार झाल्यास दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

- बऱ्याच वेळा दुधाळ जनावरांना सुप्तकासेचा आजार होतो. यात आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या आजारामध्ये फॅट आणि डिग्री यांच्या प्रमाणात काहीशी घट होते आणि ही घट कायम राहते. हे टाळण्यासाठी दुधाची सीएमटी टेस्ट करून घ्यावी. त्यावर उपाय करावेत. पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

- धार काढल्यानंतर जनावराचे चारही सड जंतुनाशक पाण्याने धुवावेत. धार काढल्यानंतर जनावर एक तासापर्यंत जमिनीवर बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

- गाय, म्हैस आटवत असताना तज्ज्ञ पशु वैद्यकाच्या सल्ल्याने चारही सडांत योग्य औषधे सोडावीत. वेत सुरू झाल्यानंतर नियमितपणे स्ट्रीप कप टेस्ट पद्धतीने कासदाह आजारासाठी तपासणी करावी. दुधाळ जनावरांना कडुनिंबाचा पाला अधून मधून खाऊ घातल्यास कासदाह होत नाही.

दुभत्या जनावराचे व्यवस्थापन ः

- दुभत्या जनावरांच्या व्यवस्थापनाचा परिणाम दुधातील फॅट आणि डिग्रीच्या प्रमाणावर होतो. दोन वेळा धार काढण्यामधील कालावधी वाढल्यास दूध जास्त मिळते, परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. कालावधी कमी झाल्यास दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण वाढते. यासाठी दूध काढण्याच्या वेळात समान अंतर ठेवावे.

- कासेतील दूध संपूर्ण काढल्यास फॅट जास्त निघते, अपूर्ण काढल्यास फॅट कमी लागते. वेतामध्ये दूध वाढते तसतसे फॅट कमी होते आणि जसजसे दुधाचे उत्पादन कमी होते तसे फॅटचे प्रमाण वाढते.

- विण्याच्या वेळी जनावराची तब्येत उत्तम असल्यास भरपूर दूध व जास्त फॅट मिळते. दूध काढतेवेळी कोणत्याही कारणाने जनावर घाबरल्यास दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण घटते.

- पावसाळा आणि हिवाळ्यात दूध उत्पादन जास्त, फॅटचे प्रमाण कमी आणि उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण जास्त मिळते.

उष्ण तापमानाचा परिणाम ः

- संकरित गायींना २० ते २७ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते, परंतु जेव्हा तापमान २७ अंश सेल्सिअसच्या वर जाऊ लागते तेव्हा दुधातील फॅट कमी होऊ शकते. हे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत असू शकते.

साधारणतः २७ अंश सेल्सिअसवर दर ५ अंश सेल्सिअस वाढीने ०.२ टक्का फॅट कमी होऊ शकते, म्हणून गोठ्यातील तापमान अनुकूल ठेवण्याची सोय करावी. यासाठी गोठ्यात पडदे लावून पाणी मारावे.

- गोठ्याच्या पत्र्यावर कडबा ठेवून पत्रे उष्ण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

वेतातील दिवस ः

- गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिले दहा दिवस दुधातील फॅट चांगले असते. जसजसे दूध वाढत जाते तसे फॅट अल्प प्रमाणात कमी होत जाते.

- व्यायल्यानंतर दोन ते चार महिन्यांपर्यंत दुग्धोत्पादन थोडे थोडे वाढू लागते. त्यानंतर वाढून स्थिर राहते.

- ज्या वेळी जनावर आटण्यास येते त्याचा अगोदर काही आठवडे दूध उत्पादन कमी झाले असते तर त्यातील फॅटचे प्रमाण वाढलेले असते.

- गाई-म्हशींच्या सहा वेतांनंतर फॅट आणि डिग्री घटकांचे प्रमाण कमी होते. वृद्ध दुधाळ जनावरांच्या दुधातील फॅटचे प्रमाण बरेच कमी होते.

- विताना गाय म्हैस अशक्त असल्यास अशा जनावरांपासून येणाऱ्या दुधात फॅटचे प्रमाण कमी आढळते.

- गाई- म्हशींचे वेत जसे वाढत जाते, तसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत जाते.

दूध वाहतूक ः

- बहुतांश वेळा दूरवरच्या वाहतुकीत दूध हिंदकळले जाते. दुधातील फॅटचे कण किटलीच्या झाकणास चिटकून वाया जातात, त्यामुळे दुधातील फॅट कमी होते.

व्यवस्थापनातील त्रुटी ः

- व्यवस्थापनातील काही त्रुटीमुळे देखील दुधातील फॅट कमी होते. उदा. काही वेळा दुधात कचरा असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी दूध कापडाच्या साह्याने गाळण्यात येते; परंतु असे केल्याने दुधातील फॅट वाया जाते.

म्हणून दूध नेहमी कापडाऐवजी गाळणीच्या साह्याने गाळावे कारण गाळणीची छिद्रे कापडाच्या छिद्राच्या तुलनेत आकाराने मोठी असतात. त्यामुळे फॅटचे गोलकण गाळणीवर न राहता दुधासोबत जातात.

गाई, म्हशींचा आहार ः

- आहारात तंतुमय पदार्थ (क्रूड फायबर) कमी असल्यास दुधातील फॅटचे प्रमाण घटते. गाई, म्हशींचा आहारात योग्य प्रमाणात सुका चाऱ्याचा अवलंब केल्यास दुधातील फॅटचे प्रमाण वाढते.

- आहारात आंबोण किंवा खुराकाचे प्रमाण जास्त असल्यास दुग्धोत्पादन वाढते, फॅट कमी लागते.

- रवंथ करणाऱ्या जनावरांच्या कोठी पोटात सुक्या चाऱ्याचा पचनामुळे ॲलिटिक आम्ल तयार होते, जे दुधातील फॅट वाढविण्यास मदत करते. आहारात खुराकाची मात्र वाढवल्यास कोठी पोटात प्रोपीओनिक आम्लाची मात्रा वाढते आणि ॲसिटिक आम्लाची मात्रा कमी होते. परिणामी, दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते, परंतु दुग्धोत्पादन वाढते. हे लक्षात घेता जनावरांच्या आहारात चारा आणि खुराकाचा योग्य प्रमाणात अवलंब करावा.

- दुधाळ जनावराच्या आहारात तेल बियाची पेंड उदा. सरकी ढेप, सरकी, शेंगदाणे, सोयाबीन पेंड, खाण्याचा सोडा, तेल, तूप आणि बायपास फॅट असणारे खाद्य घटक दिल्यास त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण तात्पुरते वाढते.

अंबाडीचा भरडा, तिळाचे तेल ५० मिलि, गूळ १५० ग्रॅम दिल्यास फॅटचे तसेच डिग्रीचे प्रमाण तर वाढतेच, परंतु दुध देण्याचे प्रमाणही वाढते. दूध देण्याच्या तक्रारी उदा. पान्हा चोरणे, वासरू दगावल्यावर दूध न देणे या गोष्टी कमी होऊन जनावरे दुधावर येतात.

- जनावरांच्या आहारात अचानक बदल केल्याने त्यांच्या उत्पादनावर आणि फॅटवर मोठा फरक होऊ शकतो. आहारात अचानक बदल केल्याने जनावरांचे खाद्य ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, दूध उत्पादन, फॅट, डिग्री कमी लागते. हे टाळण्यासाठी खाद्यातील बदल टप्प्याटप्प्याने करावा.

- दुधाळ जनावराच्या आहारात उसाचे प्रमाण जास्त ठेवल्यास दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते, तसेच जनावराच्या आहारात प्रथिनाचे प्रमाण वाढल्यास दुधातील फॅट कमी होते.

दुधाळ जनावरांना दिलेल्या खाद्यपूरकांचा फॅटवर होणारा परिणाम :

- दुधाळ जनावरांना खाद्यपूरके दिल्यास त्यांचे दूध उत्पादन आणि फॅटवर अनुकूल परिणाम होतो. आहारात यीस्ट कल्चर, असिडीफायर, बफर, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक, एन्झायम्स, चिलेटेड खनिज मिश्रण इत्यादी विविध खाद्यपूरकांचा आहारात अवलंब केल्यास दुधातील फॅटवर अनुकूल परिणाम दिसतो.

- आहारातील पुरकांचा समावेशामुळे दुधातील फॅटचे प्रमाण आणि दुधाचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी वाढते.

संपर्क ः डॉ. जी. एम. गादेगावकर,९८६९१५८७६०

(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT