Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry : म्हशींच्या संगोपनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

कृष्णा जोमेगावकर

Animal Health Management :

शेतकरी नियोजन दुग्ध व्यवसाय

शेतकरी : आनंद रुस्तुम मुंगल

गाव : इजळी, ता. मुदखेड, जि. नांदेड

एकूण शेती : पाच एकर

एकूण म्हशी : १२

नांदेडपासून वीस किलोमीटरवर असलेले इजळी (ता. मुदखेड) येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा मुंगल यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. सुरवातीच्या काळात शेतीला पूरक म्हणून दोन म्हशींचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय केला जात असे. या दुधाची गावातच विक्री होत असे. मात्र व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नव्हता. गावाजवळच मुदखेड येथे केंद्रीय रिझर्व पोलिस दलाचे प्रशिक्षण (सीआरपीएफ) केंद्र आहे.

तेथे दर्जेदार दुधाची चांगली मागणी होती. ही बाब लक्षात घेऊन गोठ्यातील जनावरांची संख्या वाढविल्यास दुग्ध व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न हाती येईल, अशी शाश्वती वाटली. त्यातूनच दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्यावर भर दिल्याचे आनंदा यांनी सांगितले. प्रारंभी दोन म्हशींपासून सुरू केलेला व्यवसाय आज १२ म्हशींच्या संगोपनापर्यंत पोचला आहे.

दुग्ध व्यवसायाचा विस्तार

सुरवातीच्या काळात घरच्या दोन म्हशींपासून मिळणाऱ्या दुधाची गावामध्येच विक्री केली जायची. पुढे दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २०११ मध्ये नांदेड तसेच परभणी येथील बाजारातून पाच जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. त्यावेळी प्रतिदिन साधारण ५० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळत असे.

उत्पादित दुधाची मुदखेड येथे घरगुती स्वरूपात दूध विक्री केली जायची. पुढे २०१४ मध्ये एका स्थानिक खासगी डेअरीला दूध देण्यास सुरवात केली. त्यानंतर आंध्र प्रदेशातील खासगी डेअरी प्रकल्पाच्या दूध संकलन केंद्राला दूध देणे सुरू केले. या दूध संकलन केंद्राचा बांधीव दर होता. सध्या

म्हशीच्या दुधाची प्रति लिटर ६० रुपये दराने विक्री होते. सध्या आनंद मुंगल यांच्या गोठ्यात १९ जनावरे आहेत. त्यात १२ म्हशी असून त्यातील ११ जाफराबादी, एक मुऱ्हा म्हैस आहे. गोठ्यामध्येच म्हशींची पैदास करण्यासाठी जाफराबादी रेड्याचे संगोपन केले आहे.

व्यवस्थापनातील बाबी

दुधाळ जनावरांसाठी २५ बाय ६० आणि २१ बाय ५० फूट आकाराचे शेड उभारले आहे.

दररोज पहाटे चार ते सकाळी

सहा या वेळेत दूध काढले जाते. सध्या प्रतिदिन सहा म्हशींपासून

दोन वेळा ४५ लिटर दूध उत्पादन मिळते.

म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर इतका दर मिळत आहे. उत्पादित दूध मुदखेड येथील दूध डेअरी प्रकल्पाच्या दूध संकलन केंद्राला दिले जाते.

जनावरांचे मलमूत्र जमा करण्यासाठी १० बाय १५ फूट आकाराचा प्लॅस्टिक आच्छादित खड्डा केला आहे. त्यावर मोटार बसवून पाण्यासोबत मिसळून शेतीला दिले जाते. यासोबतच दरवर्षी २५ ट्रॉली शेणखत या जनावरांपासून उपलब्ध होते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली असल्याचे आनंद यांनी सांगितले.

आरोग्याची काळजी

गोठ्यातील जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी वेळोवेळी घेतली जाते. प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच प्राथमिक तपासणीसह आवश्यकतेनुसार औषधोपचारावर भर दिला जातो. मुदखेड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. बी. बुचलवार, डॉ. राठोड तसेच डॉ. मंगेश हेमके यांच्यामार्फत जनावरांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते.

आहार व्यवस्थापन

बंदिस्त गोठ्यामध्येच गव्हाण तयार करून त्या माध्यमातून दैनंदिन खाद्य दिले जाते.

दूध उत्पादनानुसार जनावरांना दररोज सरकी पेंड, भरडलेला मका दिला जातो. याशिवाय पशुखाद्याची मात्रा दिली जाते.

गोठ्यामध्येच स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध केले जाते.

हिरवा व सुका चारा दिवसातून दोन वेळा दिला जातो.

जनावरांना सकस हिरवा चारा देण्यावर अधिक भर असतो. त्यासाठी दीड एकरमध्ये चारा पिकांची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने यशवंत, नेपियर गवताची लागवड केली आहे.

सुक्या चाऱ्यामध्ये कडबा, गहू, सोयाबीन, हरभऱ्याचे काड जमा करून दिले जाते.

जनावरांच्या वजनानुसार साधारण ३० टक्के सुका चारा, तर ७० टक्के हिरवा चारा याप्रमाणे देण्याचे नियोजन असते.

आनंद मुंगल, ९५५२९१०९६२,

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहणार ? पावसासाठी काही वातावरणीय प्रणाल्या पोषक ठरत असल्याचा अंदाज

Bitter Gourd : कारले लागवडीत खत, कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Agriculture Spentwash : स्पेंटवॉश : प्रदूषणातून मुक्ती, सुपीकतेची युक्ती

Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

Nilesh Lanke : दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खा. लंकेंचा मोर्चा; कार्यकर्ते व पोलिस भिडले!

SCROLL FOR NEXT