Milch Animal Diet Agrowon
काळजी पशुधनाची

Milch Animal Management : दुभत्या जनावरांच्या रोमांथिकेतील पचन तंत्र

Team Agrowon


डॉ. महेश जावळे, डॉ. शीतल चोपडे, डॉ. अतुल ढोक
भाग ः १

Milch Animal Diet : रवंथ करणाऱ्या जनावरांची पचनसंस्था ही उपलब्ध तंतुमय पदार्थ, तसेच निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांपासून ऊर्जा निर्मितीसाठी सक्षम करते. ही प्रक्रिया समजून घेऊन आणि आहाराच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करून, पशुपालक जनावरांची उत्पादकता, आरोग्य निश्‍चितपणे सुधारू शकतात.

जनावरांच्या शरीरातील नेहमी सुरू असणाऱ्या विविध शारीरिक क्रिया, शरीर वाढ, उत्पादन इ.करिता आवश्यक असलेली पोषक द्रव्ये त्यांना आहारातून मिळतात. विविध खाद्यांतील पोषकद्रव्ये ही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतात. यापैकी फारच थोडी पोषकद्रव्ये जशीच्या तशी उपयोगात आणली जातात.

बहुतांश पोषकद्रव्यांचे रासायनिक प्रक्रियेद्वारे विघटन होऊन ते अन्न मार्गातून रक्तात शोषल्या जाण्यायोग्य बनतात, या क्रियेला पचन असे म्हणतात. पचन झालेली पोषकद्रव्ये नंतर रक्तात शोषली जातात, यास अवशोषण म्हणतात. रक्तातील पोषकद्रव्ये पेशींद्वारे घेतल्यावर त्यातील निरुपयोगी भागाचे उत्सर्जन होते, यास चयापचय म्हणतात.

१) रवंथ करणारी जनावरे (रूमिनंट) जटिल पचनसंस्थेमुळे इतर सस्तन पशूंपेक्षा वेगळी ठरतात. या पचनतंत्र प्रणालीद्वारे ज्या पद्धतीने ते अन्नावर प्रक्रिया करतात, पोषक द्रव्ये शोषून घेतात, ऊर्जा मिळवतात ते इतर शाकाहारी प्राण्यांपेक्षा निश्‍चितच वेगळे आहे.
२) गाईच्या पचनसंस्थेतील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या पोटात चार वेगळे कप्पे असतात. प्रत्येकाचे कार्य वेगळे असते. इतर प्राण्यांमध्ये (श्‍वान, वराह, माकड, मनुष्य इ.) केवळ एकच पोट असते.
३) रवंथ करणारे पशू खाल्लेले गवत किंवा चारा पूर्णपणे चर्वण न करता केवळ अंशतः चघळतात, नंतर रवंथ करून त्याचे पूर्ण चर्वण करतात. पोटाच्या रुमेन भागातील सूक्ष्मजीव नंतर खाद्याचे उर्वरित विघटन करतात. पोटाचे एकेरी कप्पे असलेल्या प्राण्यांमध्ये (ज्याला मोनोगॅस्ट्रिक पाचन तंत्र म्हणतात) अशाप्रकारे जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असलेल्या चाऱ्याचे पचन करण्याची क्षमता नसते.
४) काही निवडक पशूंमध्ये अशी पाचक प्रणाली (चार कप्प्यांचे पोट) असते. त्यात काही पशूंचा समावेश करता येईल, जसे गाई, म्हशी, शेळी, मेंढी, हरिण, जिराफ, उंट इत्यादी हे प्राणी जास्त तंतुमय पदार्थ असलेला चारा किंवा खाद्याचे विघटन इतर शाकाहारी प्राण्यांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने करून त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करतात.
५) दुभत्या गाई, म्हशींमध्ये पचनसंस्थेचा विकास आणि त्याच्याशी निगडित सामू संतुलन, मित्र जिवाणूंची संख्या, त्यांची कार्यक्षमता इत्यादी बाबी, त्यांचे एकंदरीत आरोग्य राखण्यासाठी आणि अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचनसंस्थेचे भाग ः
रवंथ करणाऱ्या पशूंमधील पचनसंस्था एक पोट असणाऱ्या प्राण्यांच्या पचनप्रणालीपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करते, परंतु या दोन्ही प्रणालींमध्ये सहा मूलभूत घटक समान असतात.
तोंड ः
- जनावरे त्यांची जीभ चाऱ्याभोवती गुंडाळून खेचतात. नंतर खालच्या जबड्यातील तीक्ष्ण दात, दाढांच्या आणि वरच्या टाळूवरील कठोर दंत पॅडच्या साह्याने हा चारा बारीक होईपर्यंत चावला जातो.
- चघळल्याने लाळ उत्पादनाला चालना मिळते. त्याच वेळी चर्वण केलेल्या खाद्यामध्ये भरपूर प्रमाणात लाळ मिसळली जाते.
- लाळेमध्ये स्निग्ध पदार्थ आणि स्टार्च घटकांचे विघटन करण्यास सक्षम विकरे (एन्झाइम्स) असतात. लाळेमध्ये सोडिअम, फॉस्फेट आणि बायकार्बोनेट भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पोटाच्या रेटीकुलम आणि रूमेन भागातील सामूची पातळी योग्य राखण्यात लाळ महत्त्वाची भूमिका पार पाडते.

- प्रौढ जनावरे दररोज सुमारे ५० ते ८० लिटर लाळ गिळतात, तसेच खाद्य किती वेळ चघळतात यावर लाळनिर्मिती अवलंबून असते.
- आहार व्यवस्थापन पद्धती, आहाराचे स्वरूप तंतुमय पदार्थयुक्त चाऱ्याचे प्रमाण यावर रवंथ कालावधी अवलंबून असतो. ज्या क्रमाने
आहारातील घटक खायला दिले जातात, खाद्याच्या कणांचा आकार, दिवसभरात किती वेळा जनावरांना चारा दिला जातो आणि खाल्लेल्या खाद्याचा प्रकार या सर्वांचा थेट लाळ उत्पादनावर परिणाम होतो.

अन्ननलिका ः - जेव्हा जनावर खाद्य आणि लाळ यांचे मिश्रण गिळते, तेव्हा ते अन्ननलिकेतून रूमेनपर्यंत जाते. अन्ननलिकेतील स्नायूंच्या आकुंचनाद्वारे अन्न गिळण्याची क्रिया केली जाते आणि खाद्य पुढे ढकलले जाते. ही नलिका अन्न, तोंडातून पोटात किंवा पुन्हा पोटातून तोंडात नेण्यास सक्षम असते. - पोटभर चारा खाल्ल्यानंतर जेव्हा जनावर विश्रांती घेते, त्या वेळेस रोमंथिकेतील चर्वण करून मऊ झालेल्या खाद्याचे गोळे, जनावर पुन्हा थोड्या प्रमाणात तोंडात ओढून घेते, यालाच रवंथ करणे म्हणतात. - चघळणे संपले, की ते पदार्थ पुन्हा पोटात गिळले जातात. सामान्यतः गाय, म्हैस दिवसातून आठ तास रवंथ करते. पुरेशा प्रमाणात रवंथ करणे हे निरोगी जनावराचे लक्षण समजले जाते.

पोट ः - पोटाचे कार्य म्हणजे खाल्लेल्या पदार्थाचे विघटन करणे. गिळलेला चारा आणि खाद्य रूमेनमध्ये जमा होते. पोटाचे रूमेन, रेटीकुलम, ओमेझम आणि अॅबोमॅझम हे चार भाग असतात. - पोटाच्या प्रत्येक भागाद्वारे विशिष्ट कार्य केले जाते. या भागाद्वारे खाल्लेला चारा आणि खाद्याची साठवणूक केली जाते, तसेच पोषक द्रव्ये व जीवनसत्त्वे शोषून घेणे, प्रथिनांचे विघटन आणि पचनास आवश्यक मदत केली जाते. लहान आतडे ः - लहान आतड्यात ड्युओडेनम, जेजुनम आणि इलियम हे मुख्य भाग असतात. हे तिन्ही भाग पचन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकत्र कार्य करतात. - ड्युओडेनम हा भाग पोटाशी जोडलेला असतो. या भागात पित्ताशय आणि स्वादुपिंडातून स्रवलेला स्राव अंशतः पचलेल्या पदार्थात मिसळला जातो. ही प्रक्रिया आतड्यांतील सामू संतुलित करते, तसेच पाचक एन्झाइम योग्यरीत्या कार्य करतात की नाही याची खात्री करते.

- जेजुनम भागामध्ये विलाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान, बोटांसारख्या आकाराचे प्रक्षेपण असतात, जे आतड्यांसंबंधी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवतात आणि पोषक द्रव्ये शोषून घेतात. - इलियम, जीवनसत्त्व बी १२, पित्त क्षार आणि जेजूनममधून जाणारे कोणतेही पोषक द्रव्ये शोषून घेते. - इलियमच्या शेवटी एक झडप असते, जी खाद्याच्या मागील प्रवाहास प्रतिबंधित करते. - संपूर्ण लहान आतड्यात, स्नायूंच्या आकुंचनामुळे पचन झालेले खाद्य पुढे सरकते. पूर्ण प्रौढ गायीमध्ये, लहान आतडे सुमारे १५० फूट लांब असते आणि त्याची क्षमता ७० ते ८० लिटर असते. सेकम ः - लहान आणि मोठ्या आतड्यांमध्ये एक तीन फूट लांब पिशवी असते, ज्याला सेकम म्हणतात. - खाद्याची साठवणूक आणि दोन आतड्यांमधील खाद्याचे संक्रमण प्रदान करण्याव्यतिरिक्त, सेकम खाद्य पदार्थांचे विघटन अखंडितपणे करण्यास मदत करते. सेकमची सुमारे ७ ते ८ लिटर धारणक्षमता असते.

मोठे आतडे ः - मोठे आतडे, लांबीने लहान, परंतु लहान आतड्यापेक्षा व्यासाने मोठे असते. पाचन प्रक्रिया होऊ शकेल, असा हा शेवटचा भाग आहे. - या भागाद्वारे उरलेले पाणी शोषून घेतले जाते. यातील सूक्ष्मजंतू जिवाणू उर्वरित पचन प्रक्रिया पूर्ण करतात. जनावरांची वाढ आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे तयार करतात. - या भागाचे महत्त्वाचे काम म्हणजे पचलेले आणि शोषून न घेतलेले अन्न विष्ठा स्वरूपात शरीराबाहेर काढून टाकणे. गाई, म्हशींना संतुलित आहार दिला आणि योग्य व्यवस्थापन केले असता पाचन तंत्र सुरळीत सुरू राहते. ज्यामुळे जनावरे निरोगी राहतात, शरीरस्थिती निर्देशांक योग्य राहतो.

गाई, म्हशींमध्ये संपूर्ण पचन प्रक्रिया पूर्ण होण्यास एक ते तीन दिवस लागू शकतात. या प्रक्रियेत काही व्यत्यय आल्यास पाचन प्रणाली व्यवस्थित कार्य करू शकणार नाही, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन आजार उद्‍भवतात. पशुपालकांनी गोठ्यामध्ये वावरताना शेणाचे नियमितपणे निरीक्षण करावे. गाईच्या शेणाचा रंग, ढिगाऱ्याची सुसंगतता यामध्ये लक्षणीय फरक दिसल्यास जनावर आरोग्य किंवा व्यवस्थापन समस्यांनी ग्रस्त असल्याचे लक्षात येते. शेणाच्या मूल्यमापनावरून जनावराच्या आहाराचे सेवन, पचनक्रिया, आरोग्य इत्यादीची प्राथमिक पडताळणी करू शकतात. आवश्यकतेनुसार पशुवैद्यकांची मदत घेऊन जनावरांच्या समस्या वेळीच सोडविल्यास भविष्यातील नुकसान टाळता येईल.

संपर्क ः डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५ (पशुपोषण शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT