Animal Diet Agrowon
काळजी पशुधनाची

दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन

वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावरे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त वेळ खर्ची घालतात, त्यामुळे दूध उत्पादनामध्ये १० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होते. दुधामधील घटकांमध्ये कमतरता आढळून येते. हे लक्षात घेऊन संतुलित आहार व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

डॉ. अमित शर्मा

सर्वसाधारणपणे जनावरे एका विशिष्ट तापमानात सर्व कार्य पार पाडत असतात, जेव्हा हे एका विशिष्ट तापमानाच्या वर जातो तेव्हा त्याला उष्णतेचा ताण म्हणतात. या ताणापासून बचावासाठी जनावरे अन्न ग्रहण कमी करतात. जास्त पाणी पितात. एकाच ठिकाणी जास्त वेळ उभी राहतात. त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो.

पाण्याची गरज ः

दुधाळ जनावरांसाठी सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी टाक्या नेहमी स्वच्छ ठेवाव्यात. त्यामुळे जनावरे पुरेसे पाणी पितात. पुरेसा आहार घेतात. सर्वसाधारण वेळेस जनावरांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता खालील तक्त्यात दिले आहे, हीच गरज उन्हाळ्यात दुपटीने वाढते.

जनावर ---पाण्याची गरज/दिवस (लिटर)

गाय---३०-४०

म्हैस---४०-५०

वासरू ---४-६

शेळी ---४-६

मेंढी---४-६

टीप ः ३ ते ४ लिटर पाणी प्रत्येक एक लिटर दूध उत्पादनासाठी लागते.

फॅटचा वापर ः

ऊर्जेचा स्तर वाढवण्यासाठी पशू आहारामध्ये फॅट खूप महत्त्वाचे ठरते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा जनावराची आहार ग्रहण क्षमता कमी होते, तेव्हा जनावरांच्या ऊर्जेचा साठा पूर्ण होत नाही. परिणामी, दुग्ध उत्पादनात घट आढळून येते. कर्बोदकापेक्षा फॅट २.२५ पटीने जास्त ऊर्जा पुरवत असल्यामुळे जनावराला दैनंदिन कामासाठी आणि उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा पुरवता येते, सोबतच दुधामधील फॅट वाढवण्यास मदत होते. आहारामध्ये ५ ते ६ टक्क्यांपेक्षा जास्त फॅट नको. आहारामध्ये संरक्षित फॅट (बायपास फॅट) पुरविल्यास ऊर्जेचा स्तर स्थिर राखण्यास मदत होते.

Animal Diet

प्रथिनांची आवश्यकता ः

प्रथिनांचा विचार केल्यास, आहारातील सर्वांत महागडा घटक म्हणून प्रथिने ओळखली जातात. प्रथिने पचनाच्या वेळेस सर्वांत जास्त उष्णता तयार करतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये खाद्यामार्फत गरजेपेक्षा जास्त प्रथिने पुरविण्याचे टाळावे. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने पुरविल्यास त्यांना पचवण्यासाठी जास्त ऊर्जा वापरली जाते. तसेच यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण येतो. जास्त प्रथिनांना पचण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते ती ऊर्जा दुग्ध उत्पादन वाढवण्यास वापरली जाऊ शकते. आपल्या दुभत्या जनावरांच्या आहारात किती व कोणत्या प्रकारची प्रथिने असायला हवीत हे पशुआहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.

तंतुमय घटक ः

कोठीपोटाच्या कार्यासाठी आहारात तंतूमय घटकांचे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. या घटकांचे पचन आणि चयापचनामुळे जनावरांच्या शरीरात तापमानाची वाढ होऊन जनावर चारा ग्रहण करण्याकडे दुर्लक्ष करते, परिणामी दूध उत्पादन कमी होते. परंतु तंतुमय घटकांच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण हे घटक दुधातील फॅट आणि कोठीपोटाच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. रेषा कमी असल्यामुळे पोटाची आम्लता वाढून पचनसंस्थेचे आजार दिसतात. तंतूमय घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ओला आणि कोरडा चारा बारीक तुकडे (२ ते ३ सेंमी) करून पूर्ण मिश्रित आहार तयार करून पुरवावा. पूर्ण मिश्रित आहारात शक्य झाल्यास मुरघास वापरावे.आहारावर थोड्या प्रमाणात पाणी शिंपडून पुरविल्यास आहार ग्रहण वाढते. उत्तम प्रतीचा चारा पुरवावा.

खनिजांची आवश्यकता ः

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिजांचा स्तर वाढवावा, जेणेकरून उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही. उन्हाळ्यात पोटॅशिअम घामावाटे आणि सोडिअम मुत्रावाटे शरीराबाहेर टाकले जाते, याच कारणामुळे जनावरांत पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम खनिजांची गरज जास्त भासते. साधारण परिस्थितीत प्रती १ किलो शुष्क आहारामध्ये पोटॅशिअम ०.९, सोडिअम ०.१८, मॅग्नेशिअम ०.२ टक्का असते. राष्ट्रीय संशोधन परिषदेने सुचवल्यानुसार उन्हाळ्यात प्रति १ किलो शुष्क आहारामध्ये पोटॅशिअम १.५ टक्का, सोडिअम ०.६, मॅग्नेशिअम,०.३५ टक्क्यांपर्यंत वाढवावे.

पूरक घटक ः

पूरक घटक म्हणजे असे घटक जे आहारात कमी प्रमाणात वापरल्यास फायद्याचे ठरते. बफर व यीस्ट वापरल्यास पोटाची आम्लता राखून ठेवण्यास मदत होते. बफर म्हणून खाण्याचा सोडा वापरत असल्याने त्यात सोडिअम भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. उन्हाळ्याचा ताणापासून बचाव करण्यास बायपास फॅट खूप महत्त्वाची भूमिका पार पडतो. प्रथिन आणि कार्बोदाकांपेक्षा बायपास फॅट मध्ये २.२५ पट जास्त ऊर्जा असते. सोबतच बायपास फॅट कोठीपोटाला इजा न करता सरळ आतड्यामध्ये आपले कार्य करते. बायपास फॅट शरीराचा उष्मांक न वाढवता ऊर्जेचा स्तर टिकून ठेवण्यास मदत करतो.

आहारामधील धन आणि ऋण खानिजांमधील तफावत ः

जनावरांच्या आहारामध्ये धन आणि ऋण प्रभारित खानिजे असतात. ज्यात पोटॅशिअम आणि सोडिअम धन प्रभारित तर क्लोराइड आणि स्फुरद ऋण प्रभारित वर्गात मोडतात. यांच्यातील असमतोल प्रमाणाला आहारामधील धन आणि ऋण खानिजांमधील तफावत म्हणतात. हा असमतोल नाहीसा करण्यासाठी धन प्रभारित संयुगे जसे, की अमोनिअम क्लोराइड, अमोनिअम सल्फेट, ॲल्युमिनिअम सल्फेट, कॅल्शिअम क्लोराइड, कॅल्शिअम सल्फेट, मॅग्नेशिअम क्लोराइड आणि मॅग्नेशिअम सल्फेट वापरतात. संशोधनांती असे निदर्शनास आले, की आहारामध्ये धन आणि ऋण प्रभारित संयुगांना +२५ ते +३० एमइक्यू /१०० ग्रॅम शुष्क भारानुसार वापरल्यास जास्त तापमानामध्ये चांगल्या प्रकारे दूध उत्पादन घेता येते.

पूर्ण मिश्रित आहाराचे महत्त्व ः

पूर्ण मिश्रित आहार म्हणजे दुधाळ जनावराला आहार पुरवण्याचा एक प्रकार. यामध्ये ठराविक अन्न घटक जसे, की धान्य, सुका आणि ओला चारा, खनिजे, पूरक घटक, बायपास फॅट आणि जीवनसत्त्व एका विशिष्ट प्रमाणात मिसळतात. उन्हाळ्यात तापमानामुळे जनावरे आहारामधून निवडून खाण्यावर जास्त भर देतात, त्यामुळे पोषकतत्त्वांचा समतोल राखला जात नाही. जास्त तापमानामुळे जनावरे चारा ग्रहण कमी करून दाणा मिश्रण ग्रहण करण्यावर भर देतात. पूर्ण मिश्रित आहार पुरवल्यास जनावरांच्या निवडून खाण्यावर आळा बसतो, सोबतच जास्त शुष्क ग्रहण होऊन मोठ्या पोटाची निगा राखली जाते.

संपर्क ः डॉ. अमित शर्मा, ९६७३९९८१७६ (लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT