Desi Cow Conservation
Desi Cow Conservation Agrowon
काळजी पशुधनाची

Desi Cow Conservation : शास्त्रीय पद्धतीने व्हावे देशी गोसंवर्धन

डॉ.नितीन मार्कंडेय

गेल्या काही वर्षांत देशी गोवंशाची गणना (Desi Cow Census) नियमित पडताळल्यास संख्यात्मक ऱ्हास स्पष्टपणे दिसून येतो. नरपशु नंदी आणि नरवंश अधिक वेगाने कमी होत असताना देशी गोवंशाचा (Desi Cow) ‘समन्वय’ भविष्यात कसा साधला जाणार, याचा विचार महत्त्वाचा आहे. आपल्या देशातील गोवंश विभागाप्रमाणे ठराविक जातीचा संबोधला गेला.

असा ३० ते ३५ गोवंश लाखो संख्येत सीमित विभागात सांभाळला गेला. साधारण ७५ वर्षांपूर्वी गोपालन स्थानिक गायीचेच (Local Cow Breed) असल्याने परविभाग, परराज्यातून गोवंश आणण्याची स्पर्धा नव्हती.

आजच्या परिस्थितीत स्थानिक गोवंशास नकार आणि परराज्यातील गोवंश पसंतीसह खरेदी असा उत्साही प्रवाह वाढतो आहे. अनुभव असा, की काही हौसेने सुरू झालेले गोठे वर्ष-सहा महिन्यांत ‘आपल्या वातावरणात ही गाय टिकत नाही’ असा शेरा मारून बंद झाले आहेत.

शासकीय दरबारी गोवंश जात नोंदणीसाठी किमान २५,००० ते ३०,००० संख्या असणारी पुरावा कागदपत्रे पन्नास वर्षांपूर्वी आवश्यक मानली गेली. सध्याच्या काळात ही संख्या अनेक पट कमी केल्याने देशात गोवंश जाती दीडपट झाल्या आहेत.

गोवंश संख्यात्मक ऱ्हास होताना जाती संख्या वाढून काय साध्य होणार, हा चिंतनाचा विषय आहे. गोवंशाची वर्गवारी पैदाशीच्या दृष्टीने अडचणीची ठरू शकते. स्थानिक गोवंश दुर्लक्षाचे मुख्य कारण म्हणजे अल्प उत्पादक, बहुखर्चिक, अतिश्रमीक सांभाळ हे आहे.

उच्च दर्जाचे व्यवस्थापन आणि विज्ञान शिफारशी स्वीकारून कुक्कुटपालन क्षेत्राने अनेक पटीने प्रगती आणि विकास साधला. त्यापद्धतीने देशी गोवंश संगोपनाला चालना देणे आवश्यक आहे. देशी गाय व्यवस्थापनाबाबत व्यक्तीनिहाय आणि गोठेनिहाय मतभिन्नता दिसून येते.

गेल्या दहा वर्षांत देशी गोवंश ही संकल्पना प्राधान्याने पुढे आली. देशी गोवंशाबाबतच्या पैदाशीची सजगता मात्र यातून अधोरेखित झाली. यात महत्त्वाची बाब अशी, की संख्येच्या दृष्टीने देशी शुद्ध वंश दहा टक्के आणि देशी वंशविरहित गोधन पंच्याहत्तर टक्के आहे.

गोठ्यात असावी तणावमुक्त गाय

‘आनंदी गाय’ हे ताणमुक्त गायीचे लक्षण समजले जाते. केवळ स्वच्छंद जगणाऱ्या गायी पौष्टिक दूध देतात. मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात आपल्या नादात स्वैरपणे वावरणाऱ्या गायी सांभाळल्या जाणे अपेक्षित असते.

मात्र अनेक कारणे सांगून गायींचा स्वैरपणा सीमित करणारे गोपालक ताण वाढवत गायींना दुर्बल करतात. आपल्या राज्यात दूध आणि वेत उच्चांक नोंदविल्या गेलेल्या गायी ताणमुक्त आणि आनंदी होत्या हे सांगण्याची गरज नाही.

शेतीमध्ये झालेले बदल आणि सेंद्रिय/ नैसर्गिक शेतीमुळे देशी गाय पुन्हा चर्चेत आली. रसायनमुक्त शेतीत गोमय, गोमूत्र यांचा वापर सिद्ध करताना नोंदवलेले फायदे मानवी आरोग्य संवर्धनात शाश्वत दिसून आले.

सेंद्रिय शेतीला भरीव प्रोत्साहन देण्यात आले. पशुशक्तीचा शेतीकार्यात सुयोग्य वापराच्या नवनवीन पद्धती शोधल्या जात असून, देश पातळीवर असे संशोधन कौतुकास पात्र ठरत आहे.

रोगप्रतिकारक्षमता हा विषय आधुनिक युगात विषाणूजन्य रोगप्रतिबंधासाठी पुन्हा समोर आल्याने आयुर्वेदिक उपचार आणि त्यात होणारा गोमूत्र, पंचगव्य, पंचामृत वापर अग्रक्रमाने स्वीकारला जात आहे. आयुर्वेदाने प्रचंड माहिती संकलन करून प्राचीन उपचार पद्धतींचा नवसंजीवनी दिली. आयुर्वेदात नोंदवलेली गाय आणि संबंधित संदर्भ सर्वदूर उपलब्ध होणे गरजेचे आहे.

देशात प्रत्येक राज्यात पांजरपोळ, गोशाळा, गोसदन स्थापन करून गोरक्षणाचे कार्य करण्यात येते. भक्ती, श्रद्धा, आत्मिक समाधान पुरेपूर जपणाऱ्या गोशाळा विज्ञानाधिष्ठ होणे गरजेचे आहे. शासकीय अनुदानासाठी धावपळ टाळून ‘आत्मनिर्भर’ होण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असताना काही पर्याय काळानुरुप स्वीकारणे शक्य आहे. यादृष्टीने शास्त्रीय, विज्ञान आधारित शिफारशींसाठी गोशाळांची द्वारे उघडली जाण्याची गरज आहे.

‘गो ग्रंथालय’ हा गोशाळेचा अविभाज्य घटक असावा. मात्र तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती साहित्याची अनुपलब्धता असल्याने गोसांभाळ प्रश्नांकित होतो. विज्ञान आणि आध्यात्मिक/ पारंपरिक साहित्याची उपलब्धी अशी ‘देशी गाय’ तरुण शिक्षित पिढीला यथार्थ कळावी यासाठी गो ग्रंथालये गरजेची आहेत.

औद्योगीकरणात शेतीक्षेत्र कमी होताना चारा लागवड हा विषय गंभीर होत आहे. कमी झालेल्या गोधनास वर्षभर पुरेसा चारा नसल्याने पोषण अडचणी वाढत आहेत. केवळ उत्पादनच नव्हे तर आरोग्य, रोगप्रतिकार, सुदृढता कमी होत गोवंशाकडे आपोआप घडते.

‘पर्यावरण मैत्रीपूर्ण गाय’ म्हणजे पशुखाद्यातून पचनक्रियेत निर्माण होणारा मिथेन वायू कमीत कमी उत्सर्जित करत वातावरणातील प्राणवायू प्रमाण अबाधित राखणारी गाय. संतुलित पशुखाद्य हेच मिथेनसाठी उत्तर असल्याने अतिरेकी पेंड वापर टाळणे महत्त्वाचे असते.

शेणातून ऊर्जानिर्मिती म्हणजे उत्पन्नस्रोतात वाढ. बायोगॅसचा वापर असंख्य बाबतीत उपयुक्त ठरून उर्वरित शेणखत पीकपोषणास पूरक ठरते.

जातिवंत पैदाशीवर द्या भर

संख्यात्मक दृष्टीने शुद्ध देशी गोवंश अत्यंत कमी असताना पशुविज्ञानाचे आव्हान म्हणून निवडीचे जातिवंत वळू पैदाशीसाठी मिळविणे गरजेचे ठरते.

पैदाशीच्या वळूची जनुकीय अभियांत्रिकी पडताळणी करण्याची नियोजन पद्धती अत्यंत महत्त्वाची असून, केवळ अशा निवड झालेल्या वळूकडून शुद्ध वंशाची पिढी अपेक्षित आहे.

गायींच्या बाबतीत वर्षाच्या आत पहिला माज, दर वर्षी वासरू आणि आयुष्यात २० वेत असे आव्हान किती गोपालक स्वीकारतील, याची चर्चा करावी लागेल. अशा सगळ्या उद्दिष्टांना संप्रेरक, ओजसरस, उत्तेजना अजिबात गरजेचे नाही, हेही आत्मसात करावे लागेल.

दूध विचार नकोच म्हणून गोमूत्र, गोमयसाठीचा बहुसंख्य देशी वंशरहित गोवंश निरोगी सांभाळणे आणि हळूहळू नियोजनबद्ध पैदाशीतून शुद्धतेकडे वळविणे शक्य आहे. मात्र अशा पैदाशीसाठी काही काळ थांबण्याची मानसिकता शोधावी लागेल. ‘सात पिढ्यांत घडते वंशशुद्धता’ याप्रकारे पैदास उपयुक्त ठरू शकते.

देशी वंशरहित गोधन नेमका कोणत्या शुद्ध वंशात परावर्तित करायचा याचा निर्णय नोंदी, पशुवैद्यक, शिफारशी आणि स्थानिक गरज यातून शक्य आहे.

देशी गोवंश संवर्धन आणि विकासासाठी झालेले अनेक प्रयत्न पडताळताना प्रत्येक राज्यात शासनाने ‘पशुधन विकास मंडळ’ निर्माण करून स्थानिक गोवंश जाती संवर्धनाचे उद्दिष्ट निर्धारित केले.

देशात साधारणपणे २० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अशा यंत्रणांची कार्यात्मक साध्यता सहसा कुणी तपासणी करत नाही. एक हजार गोधनाचे गोकूळग्राम अद्याप दिवास्वप्न आहे. प्रत्येक राज्यात पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यक विद्यापीठात स्थानिक गोवंशाची मोठी प्रक्षेत्रे आहेत.

डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१

(पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT