देवानंद राऊत, डॉ. नंदकिशोर हिरवे
Grass Cultivation Update : दशरथ घास हे द्विदल वर्गीय बहुवार्षिक चारा पीक आहे. कमीत कमी पाच वर्ष जनावरांना हिरवागार, कोवळा, लुसलुशीत सकस हिरवा चारा मिळतो. हे पीक २ ते ३ मीटर वाढते.
हा चारा कमी जास्त प्रमाणात जनावरास खाण्यास दिला तरी शरीरावर कोणताही वाईट परिणाम जाणवत नाही. तसेच हिरवळीचे खत म्हणूनही वापर करतात.
चाऱ्याची वैशिष्ट्ये
- हिरव्या चाऱ्यामध्ये १८ ते २१ टक्के प्रथिने, ९० टक्के स्निग्ध पदार्थ, १९ टक्के खनिजे, ३७.७ टक्के कर्बोदके.
- पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, सोडिअम.
- हिरवा, कोवळा लुसलुशीत सकस चारा.
लागवडीचे नियोजन
- पाण्याचा निचरा होणाऱ्या, हलक्या ते मध्यम, सामू ५.५ ते ६ दरम्यान असलेल्या जमिनीत लागवड करावी.
- जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या कोळपणीच्या वेळी हेक्टरी आठ ते दहा टन कुजलेले शेणखत मिसळावे. सारा यंत्राच्या मदतीने चार ते पाच मीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. सऱ्याची लांबी ही आपल्या निवडीनुसार ठेवावी.
- पेरणी जून-जुलै दरम्यान करता येते. प्रति हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते. पेरणी उथळ करावी. साधारण १ते २ इंच खोलीवर बियाणे पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलीवर पेरणी केल्यास बी उगवणार नाही.फेकून पेरणी करावयाची असेल तर हेक्टरी २० ते २५ किलो बियाणे लागते.
- बियाणाचे कवच कठीण असल्यामुळे उगवणीवर परिणाम होतो. त्यामुळे गरम पाण्याची प्रक्रिया करावी. साधारणपणे ४ लिटर पाण्यात १ किलो बियाणे मिसळावे. पाण्यावर तरंगत असलेले बियाणे बाजूला काढावे.
शिल्लक राहिलेले बियाणे उकळी आलेल्या पाण्यात ५ मिनिटे ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे बियाणे फुगलेले दिसेल. फुगलेले बियाणे गोणपाटावर सावलीत पसरवून जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. एक किलो बियाणासाठी ५ मिलि रायझोबियमची प्रक्रिया करावी.
- लागवडीवेळी हेक्टरी २० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि २० किलो पालाशची मात्रा द्यावी. स्फुरद व शेणखताच्या मात्रेमुळे चाऱ्याचे उत्पादन वाढते.
- पिकाच्या मुळ्या खोल जात असल्याने जमिनीतील खोलवरचे पाणी शोषून घेतात. त्यामुळे दुष्काळात तग धरतात.
- पहिली कापणी पीक ६० ते ७० दिवसांचे असताना आणि त्यानंतरच्या कापण्या दर महिन्याला कराव्यात. कापणी जमिनीपासून ३० सेंमीवर करावी. त्यामुळे फुटवे परत फुटण्यास मदत होते.
- हेक्टरी ८० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
संपर्क - देवानंद राऊत, ७०२०५३२८२०, (पशुसंवर्धन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता.दारव्हा, जि.यवतमाळ)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.