Cow Rearing
Cow Rearing Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Rearing : पाथर्डी तालुक्यातील जितेंद्र चेमटे यांचे गोपालन

Team Agrowon

शेतकरी : जितेंद्र ज्ञानदेव चेमटे

गाव : कौडगाव, ता. पाथर्डी, जि. नगर

एकूण गाई : २५

एकूण शेती : ९ एकर

नगर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागाला सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागतो. शेतीसाठी पाण्याचे शाश्‍वत स्रोत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसायांची जोड देताना दिसत आहेत. विशेषतः दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते.

पाथर्डी तालुक्यातील कौडगाव येथील जितेंद्र ज्ञानदेव चेमटे यांनी योग्य व्यवस्थापनाला प्राधान्य देत दूध व्यवसाय वाढीवर भर दिला. एका संस्थेमध्ये १० वर्षे क्लार्क म्हणून नोकरी केली. मागील तीन वर्षांपूर्वी नोकरीला पूर्ण विराम देत दुग्ध व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित केले. सध्या ते पूर्णवेळ शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात.

जितेंद्र यांची वडिलोपार्जित ९ एकर शेती. कुटुंबाचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. आधी केवळ ३-४ गाई होत्या. त्यातून ४० लिटरपर्यंत दूध संकलन होत असे. गेल्या ५ ते ६ वर्षांत त्यांनी गायींच्या संख्येत वाढ करीत व्यवसाय वाढविला.

सध्या त्‍यांच्याकडे १५ मोठ्या गाई व १० वासरे आहेत. संगोपनासाठी साडेपाच गुंठे जागेत मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. साधारणपणे १०० फूट लांब आणि ६० फूट रुंद आहे. तर बंदिस्त गोठ्यामध्ये ९० फूट लांबीची गव्हाण आहे. आणि गायींना बसण्यासाठी रबर मॅटचा वापर केला आहे.

सध्या प्रतिदिन दोन्ही वेळचे मिळून साधारण १६० लिटरपर्यंत दूध संकलन होते. शेतामध्ये चाऱ्यासाठी एक एकर मेथी घास, एक एकर नेपिअर आणि एक एकरावर ऊस लागवड आहे. याशिवाय चाऱ्यासाठी मका, कडवळ प्रत्येकी १ एकर क्षेत्रावर आहे.

व्यवस्थापनातील बाबी

- गोठ्यातील कामांस दररोज सकाळी साडेचार वाजता सुरुवात होते.

- प्रथम मका, ऊस, नेपिअर गवत यांची कुट्टी केली जाते. त्यानंतर चारा कुट्टी आणि गहू भुस्सा एकत्रितपणे साधारण १२ ते १५ किलो चारा प्रत्येक गाईला दिला जातो. पाच वाजता गोळी पेंड आणि खुराक प्रत्येकी ३ किलो प्रति गाय याप्रमाणे दिले जाते.

- त्यानंतर यंत्राद्वारे दूध काढणी केली जाते. सध्या १३ गायी दुधावर आहेत. गोठ्यातील सर्व गायींचे दूध काढण्यास साधारण १ तास पुरेसा होतो.

- दूध काढणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाईला पाच किलो हिरवा चारा दिला जातो.

- सात वाजता गाई मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते. सायंकाळी चार वाजेपर्यंत गाई मुक्त संचार मोकळ्या सोडल्या जातात. मुक्त संचार गोठ्यामध्येच गाईंसाठी चारा आणि पाण्याची सोय केली आहे.

- सायंकाळी चार वाजता पुन्हा चारा सकाळी दिलेल्या प्रमाणानुसार चारा, खुराक आणि घास दिला जातो.

- पाण्यासाठी मुक्तसंचार गोठ्यात पाण्यासाठी दोन गव्हाणी केलेल्या आहेत. त्यात २४ तास स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध केले जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची अधिक गरज भासते. मुक्तसंचार गोठ्यात गायी सोडल्यानंतर त्या आवश्यकतेनुसार पाणी पितात. पुरेसे पाणी पिण्यात येत असल्याने दुधाचे प्रमाणही चांगले मिळते.

गोठा व्यवस्थापन

- गाईंना गोठ्यात बसण्यासाठी सहा वर्षांपासून मॅटचा वापर करत आहेत. त्यामुळे गोठ्यातील दगड किंवा मातीमुळे पायांच्या नखांचे, तसेच गायींना होणारा शारीरिक त्रास कमी झाला आहे.

- उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरावर ताण येतो. गोठ्यात तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचे फॉगर्स बसविले आहेत.

- गायी दिवसभर मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात. मुक्तसंचार गोठा पद्धतीमुळे दररोज शेण उचलण्याची गरज भासत नाही. साधारणपणे चार महिन्यांतून एक वेळ गोठ्यातील सर्व शेण उचलले जाते.

- सहा महिन्यांत गोठ्यातून साधारण २५ ट्रॉली शेणखत मिळते. दर्जेदार शेणखतामुळे मागणी आणि दरही चांगली असतो. स्वतःच्या शेतामध्ये वर्षाला साधारण २० ट्रॉली शेणखताचा वापर केला जातो. तर उर्वरित शेणखताची ५ हजार रुपये दराने विक्री होते.

वासरांची जपवणूक

- गोठ्यामध्ये उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास होण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी उच्च दर्जाच्या वळूचे सिमेन्स भरण्यावर भर दिला जातो. घरच्या गाईंच्या कालवडीची जपवणूक करूनच गाईंची संख्या वाढ केली.

- नवजात वासरांची पहिली तीन महिने विशेष काळजी घेतली जाते. वासरांना स्वतंत्र ठिकाणी ठेवले जाते.

- वजन वाढ व पुढील काळात कालवडीला कोणत्याही समस्या उद्‍भवू नयेत, यासाठी दुधातून २५ मिलिग्रॅमपर्यंत प्रथिनयुक्त घटकांचा पुरवठा केला जातो.

- गाईचे दूध वासराला थेट पिऊ दिले जात नाही. त्याऐवजी बाटलीने दूध पाजले जाते.

- गाय व्यायल्यानंतर तिचे कोवळे दूध नवजात वासरांसाठी वरदान असते. त्यासाठी पहिल्या दोन तासांमध्ये वासराला अधिक प्रमाणात कोवळे दूध पाजण्यावर भर दिला जातो. त्यानंतर पाच दिवसांपर्यंत दोन वेळा प्रत्येकी दीड लिटर तर त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत अडीच लिटर दूध प्रत्येकी दोन वेळा याप्रमाणे दूध पाजले जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुधाची मात्रा कमी करून खुराक खाण्याची सवय लावली जाते.

- साधारणपणे तीन महिन्यांनंतर दूध पिण्याची सवय कमी करून दररोज १ किलो खुराक खायला घातला जातो.

- अशा पद्धतीने वासरांचे जन्मल्यापासून नियोजन केल्यामुळे वासरांचे वजन वाढते, लवकर मोठी होतात. तसेच गाभणही लवकर राहण्यास मदत होते.

लसीकरणावर भर

- मागील काही महिन्यांपासून राज्यासह जिल्ह्यात लम्पी आजाराचा मोठा प्रादुर्भाव होता. गोठ्यातील गायींना आजाराची बाधा होऊ नये यासाठी वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले. त्यामुळे आजाराचा धोका टाळला गेला.

- सहा महिन्यांतून एक वेळ लाळ्या खुरकूत आजाराचे लसीकरण केले जाते. पुढील काही दिवसांत पावसाळा सुरू होण्यापूर्वी लाळ्या-खुरकूत तसेच पशुवैद्यकांच्या सल्ल्याने अन्य लसीकरण केले जाईल.

- मुक्तसंचार गोठा असल्याने गोचीडाची समस्या फार भेडसावत नाही. त्यासाठी मुक्त संचार गोठ्याच्या मध्यभागी खांब रोवून त्याला काथ्या बांधलेला आहे. त्या काथ्याला गायी खेटून जातात. त्यामुळे गोचिडींची समस्या गोठ्यात अद्यापतरी उद्‍भवलेली नाही.

संपर्क - जितेंद्र चेमटे, ७४९९५५०४५५ (शब्दांकन - सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT