Cow Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Health: गाईंमधील बाह्य परजीवींचे नियंत्रण

Animal Care: संकरित गायींमध्ये बाह्यपरजीवीचा धोका अधिक प्रमाणात आढळतो. बाह्य परजीवींचे योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रण केले नाही तर गाईंना विविध आजार होतात. प्रादुर्भावामुळे दूध उत्पादन कमी होते, वजनामध्ये घट होते, शरीरावरील केस कोरडे आणि निस्तेज दिसतात.

Team Agrowon

डॉ. विवेक संगेकर, डॉ. बालाजी अंबोरे

Dairy Farming: गाईंमध्ये बाह्य परजीवींचा वाढता प्रादुर्भाव दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम करतो. गायींच्या त्वचेवर किंवा केसांमध्ये राहणारे बाह्य परजीवी गायींचे आरोग्य आणि आर्थिक उत्पन्नावर नकारात्मक परिणाम करतात.

गोचीड

गाईच्या शरीरावर दिसतात. मागच्या आणि पुढच्या पायांच्या अंतर्गत भागात, मानेच्या खालच्या भागावर, कासेच्या बाजूला, पोटावर, कानांच्या मागे आणि शेपटीखाली जास्त प्रमाणात असतात.

दावणीमधील भिंतीवर, जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये गोचीड अंडी घालतात. याच अंड्यातून गोचिडांची उत्पत्ती होते आणि ते परत गाईंवर प्रादुर्भाव करतात.

गोचीड सतत जनावरांचे रक्त शोषतात, त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते, अशक्तपणा येतो.

माश्‍या

गोठ्यात आढळणाऱ्या माश्यांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. माश्‍या गाईच्या जखमांवर अंडी घालतात, अंड्यांतून लहान अळी बाहेर पडते. हीच अळी जखमेवर उपजीविका करते. त्यामुळे गाईच्या शरीरावरील जखम भरत नाही. यालाच आपण आसडी पडणे असे म्हणतो.

गोठ्यामध्ये प्रामुख्याने सामान्य माशी, गोमाशी, हिरवी माशी आणि काळी माशी यांचा प्रादुर्भाव दिसतो.

माश्‍यांच्या त्रासामुळे गाई अस्वस्थ होतात. यामुळे त्यांचे चारा खाणे, पाणी पिणे आणि रवंथ करणे या गोष्टींकडे लक्ष लागत नाही.

माशा अंडी घालण्यासाठी अस्वच्छ जागा निवडतात, जसे की शेण उकिरडा, नाल्याचे गलिच्छ पाणी, शरीरावरील जखमा किंवा खरचटलेली जागा.

उवा

गाईंमध्ये चावणाऱ्या उवा आणि रक्त शोषणाऱ्या उवा दिसतात.

उवांचे प्रमाण गाईच्या केसाळ भागांमध्ये अधिक आढळते. उवांच्या प्रादुर्भावामुळे गाई अस्वस्थ होतात, त्यांचे खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही. त्यांच्या शरीरावर खूप खाज सुटते, त्यामुळे त्वचा जाड होते आणि केस गळू लागतात.

पिसवा

पिसावा पांढऱ्या रंगाचे असून त्यांना दोन पंख असतात.

पिसवा अंडी घालण्यासाठी गाईचे शरीर आणि गोठ्याच्या पृष्ठभागातील भेगा निवडतात.

प्रादुर्भावामुळे होणारे आजार

सरा (ट्रिपॅनोसोमा)

कारणीभूत घटक : ट्रिपॅनोसोमा इव्हान्साय

प्रसार : चावणाऱ्या माश्‍यांपासून प्रामुख्याने ‘टॅबॅनस’ जातीच्या माशीपासून प्रसार होतो.

गोचीडजन्य ताप (थायलेरिओसिस)

कारणीभूत घटक : थायलेरीया अॅन्युलेटा, थायलेरिया पारव्हा

प्रसार : गोचिडीद्वारे प्रसार होतो.

गोचीडजन्य लालमूत्र रोग (बेबेसिओसिस)

कारणीभूत घटक : बॅबेसिया बायजेमिना, बॅबेसिया बोव्हीस

प्रसार : गोचिडींद्वारे प्रसार

अॅनाप्लाझ्मोसिस

कारणीभूत घटक : अॅनाप्लाझमा मार्जिनेल, अॅनाप्लाझमा सेंट्रल

प्रसार : गोचिडीद्वारे प्रसार

आजाराची लक्षणे

शरीरावर खाज सुटल्यामुळे गाय शरीर झाड, भिंत, निर्जीव वस्तूवर घासते. स्वतःच्या शरीरावर चाटून किंवा चावून गंभीर जखमा करतात.

शरीर जास्त घासल्याने किंवा चावल्याने केस गळतात.

त्वचा कुरूप, निर्जीव आणि काळसर स्वरूपाची दिसते.

बाह्य परजीवींनी रक्त शोषल्याने त्वचेवर खपल्या, जखमा किंवा खरूज होतात.

गायींमध्ये अस्वस्थता आणि बेचैनी पसरते. त्यामुळे गाई सतत शेपूट हलवतात, डोके हलवतात किंवा पाय आपटतात.

सततच्या अस्वस्थतेमुळे गाईचे खाणे, पिणे, आणि रवंथ करणे याकडे लक्ष लागत नाही.

दूध उत्पादन कमी होते, वजनामध्ये घट होते, शरीरावरील केस कोरडे आणि निस्तेज दिसतात.

सततचा ताण, रक्तक्षय आणि गोचीड बाधित आजारामुळे वजन आणि उत्पादन कमी होते.

गोचीड चिकटलेल्या ठिकाणी सूज, खपल्या आणि रक्तस्राव दिसतो.

गाईच्या शरीरावर खूप जास्त प्रमाणात गोचीड झाल्यास, त्यांच्या शरीरातील रक्त कमी होते, त्या कमजोर होतात, वजन कमी होते.

गोचीड प्रादुर्भाव वाढल्यामुळे गोचीडबाधित आजार होऊन गायींच्या मुरतुकीचे प्रमाण वाढते.

गोमाशी गायींच्या शरीरावर आढळणाऱ्या जखमांवर अंडी घालते, त्यातून अळी बाहेर पडते आणि त्या जखमेवर उपजीविका करतात. त्यामुळे जखम भरून येत नाही.

संसर्गासाठी प्रवृत्त करणारे घटक

उष्ण आणि दमट हवामानात बाह्यपरजीवींची संख्या वाढते, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

संसर्ग मुख्यतः वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात वाढतो, कारण या काळात त्यांच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण तयार होते.

कमजोर प्रतिकारशक्ती आणि संतुलित आहाराचा अभाव असणाऱ्या गायीमध्ये बाह्यपरजीवींचा धोका अधिक असतो.

संकरित गायींमध्ये बाह्यपरजीवींचा धोका अधिक प्रमाणात आढळतो. (उदा. होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी)

वासरांमध्ये बाह्यपरजीवींचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो.

बंदिस्त गोठा व्यवस्थापनात गाईंची संख्या जास्त असल्यामुळे, त्यांच्या शरीरावर राहणाऱ्या परजीवींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

गोठ्याजवळच असणारा शेणाचा उकिरडा बाह्यापरजीवींच्या प्रसारासाठी कारणीभूत आहे.

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

नेहमी गोठा स्वच्छ ठेवावा, जेणेकरून माश्‍या आणि गोचीड यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल.

गोठ्यामध्ये हवा खेळती असावी, त्यामुळे जास्त दमटपणा राहणार नाही.

गोठ्यामधील शेण नियमित स्वच्छ करावे. बंदिस्त गोठ्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त गायी ठेवू नयेत.

गोमाशीवर नियंत्रण करण्यासाठी गोठ्याभोवती ‘फ्लाय रेपेलंट’ जाळीचा वापर करावा.

संध्याकाळच्यावेळी गोठ्यामध्ये कडूलिंबाच्या पानांचा धूर करावा, जेणेकरून गोमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल.

कडूलिंबाच्या पानांचा रस करून गायींच्या शरीरावर लावावा, त्यामुळे गोचीड निर्मूलन होते.

गाईंना संतुलित आणि पौष्टिक आहार द्यावा, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. निरोगी गाईंना परजीवींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते.

परजीवी नियंत्रणाच्या औषधाची गोठ्यामध्ये फवारणी करावी. गोठ्यामध्ये प्रामुख्याने भिंती, पृष्ठभागावरील भेगा, दावणीच्या आतील बाजू आणि आजूबाजूचा परिसर फवारून घ्यावा.

बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी आवश्यक औषधे योग्य त्या प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गाईच्या अंगावर आणि गोठ्यात फवारावी.

वासरांमध्ये बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी दिली जाणारी औषधी टाळावी, जेणेकरून वासरांमध्ये औषधीचा दुष्परिणाम होऊन विषबाधा होणार नाही.

गाभण गाय आणि आजारी गाईसाठी बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी दिली जाणारी औषधे टाळावीत.

डॉ. विवेक संगेकर, ९०७५८८९४९०

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन

Gokul Dudh Sangh: डिबेंचर रक्कम कपातीचा मुद्दा, कोल्हापुरातील वातावरण तापलं, 'गोकुळ'समोर दूध उत्पादकांचे उपोषण

Crop Damage Compensation : ‘दौरे बंद करून वाढीव मदतीसाठी प्रयत्न करा’

Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक

Nanded Rainfall : सरासरी १३९.०६ टक्के पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT