Animal care
Animal care Agrowon
काळजी पशुधनाची

Snake Bite : जनावरांतील सर्पदंशाबद्दल दक्ष राहा...

डॉ. अनिल भिकाने

शेतातील अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचे नियंत्रण साप (Snake Controlling Rate Outbreak In Farm) करतात. परंतु काही वेळेस शेतात काम करताना लोकांना सर्पदंश (Snake Bite) होतो. काही वेळा गवताळ रानामध्ये चरताना जनावरांना सर्पदंश (Animal Snake Bite) होतो. भारतात ३०० च्या आसपास जाती आहेत. त्यातील ५० विषारी असल्या तरी प्रामुख्याने चार अतिविषारी साप भारतात आढळतात. सर्पदंश वर्षभर आढळतो. मात्र प्रामुख्याने पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अधिक आढळतो. नाग, कवड्या किंवा घोणस, फुरसे आणि मण्यार हे विषारी साप आहेत. सर्पदंश प्रामुख्याने लवकर सकाळी किंवा संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास अधिक दिसून येतो. या वेळात साप भक्ष्य पकडण्यासाठी फिरत असतात.

नाग ः

१) सर्वांना परिचित व बहुतांश ठिकाणी आढळणारा हा साप आहे.

२) रंगाने काळा किंवा गर्द तपकिरी असतो

३) पूर्ण वाढ झालेला नाग ६-७.५ फूट लांब असतो.

कवड्या साप ः

१) हा साप तपकिरी, पिवळ्या रंगाचा असतो.

२) अंगावर अंडाकृती काळ्या रंगाच्या नक्षीदार तीन रांगा असतात.

३) सापाचे डोके त्रिकोणी असते. मान बारीक, शरीर जाड व शेपटी आखूड असते.

४) लांबी ३ ते ५ फूट असते.

फुरसे साप ः

१) साप रंगाने तपकिरी असून त्याच्या अंगावर लालसर रंगाचे अंडाकृती नक्षी असते.

२) डोके पसरट असते. शरीर जाड व शेपटी आखूड असते.

३) डोके, शरीरावर चमकदार, गुळगुळीत पण अनियमित खवले असतात.

४) लांबी ३-३.५ फूट असते.

मण्यार साप ः

१) साप रंगाने काळा असून अतिशय चमकदार असतो. त्याच्या अंगावर वैशिष्ट्यपूर्ण पांढऱ्या रंगाच्या दोन रेषेसारख्या पट्ट्या असतात.

२) हा सर्व विषारी सापांत लहान असून याची लांबी फक्त २.५ ते ३ फूट असते.

सापाचे विष ः

१) साप त्याच्या विषाचा उपयोग स्वतःचे भक्ष्य पकडण्यासाठी किंवा त्याच्या जिवास धोका निर्माण झाल्यास बचावासाठी करतो.

२) कठीण प्रसंगी साप इशारा देवून पळवून लावण्यासाठी फणा काढतात, फुत्कारतात पण हे करून धोका कमी न झाल्यास शत्रूचा चावा घेतात. विषबाधा करतात.

३) सापास छेडल्यास, जनावरे शेतात चरताना सापाच्या अंगावर पाय पडल्यास तो चावा घेतो.

विषातील घटकांचा परिणाम ः

१) सापाचे विष हे त्यांच्या लाळ ग्रंथीतून स्त्रवणारा पिवळ्या रंगाचा

पातळ पदार्थ असून त्यात विकरे, खनिजद्रव्ये, प्रथिने आणि वीसहून अधिक इतर अनेक अकार्बनिक पदार्थ असतात.

२) नाग व मण्यार या जातीच्या सापाच्या विषात न्युरोटॉक्झीन असते. हे विष चेतासंस्था म्हणजे मेंदूवर प्रभाव करून निकामी करते.

३) कवड्या, फुरसे या घोणस जातीच्या सापाबरोबर मण्यार या जातीच्या विषात प्रामुख्याने हिमोटॉक्सीन असते. हे विष शरीरात रक्त स्त्राव घडवून आणते.

४) सायटोटॉक्झीन हे सर्व जातीच्या विषात असते. हे विष शरीरातील सर्व पेशी निकामी करते किंवा नष्ट करते. यामुळे पेशींना सूज येते, पेशी सडतात.

५) या व्यतिरिक्त रक्त गोठण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. त्यामुळे जनावरे दगावतात.

जनावरांमध्ये होणारा सर्पदंश ः

१) सर्पदंश सर्वच जनावरात आढळून येतो.

२) गाय, बैल, म्हैस या जनावरांच्या तुलनेत घोडा, गाढव सर्पदंशास संवेदनशील आहेत. शेळ्या, मेंढ्यांमध्ये तसेच श्‍वानांमध्ये सर्पदंश होतो.

३) कोबंड्याची अंडी व पिल्ले हे सापाचे खाद्य आहे. त्यामुळे साप त्यांची शिकार करतात. कोंबड्याही सर्पदंशास बळी पडतात.

४) सर्व वयोगटाच्या जनावरास सर्पदंश होतो. लहान वासरे सुरक्षित ठिकाणी असल्याने कमी प्रमाण दिसून येते मात्र तीव्रता अधिक असते.

सर्पदंशाची लक्षणे ः

१) सर्वच जातीच्या सर्पदंशात चाव्याच्या ठिकाणी म्हणजे तोडांवर, पुढच्या किंवा मागच्या पायावर सर्वसामान्यपणे खालील बाजूस सुजेस सुरवात होते. ती हळूहळू वर वाढत जाते.

२) सूज आलेल्या पायाने जनावर लंगडते. तोडांवर सजू असेल तर श्‍वसनास त्रास होतो.

३) सुजेतून रक्तस्राव होतो. नाकातून लघवी, शेणातून रक्त पडते.

४) जनावर आडवे पडून दगावते.

५) नागदंशात जनावर थरथरते, दात खाते, पापण्याची उघडझाप बंद होते. श्‍वसनास त्रास होतो. तोंडातून लाळ गळणे, उलटी होते. जनावर आडवे पडून झटके देते.

सर्पदंश लक्षणावरून विषारी सापाची ओळख ः

१) घोणस सर्पदंशामध्ये सूज वेगाने मोठ्या प्रमाणावर येते. रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो. उपचारास विलंब झाला तर कोरडा गँगरीन हळूवार होतो. चेतासंस्थेशी निगडित लक्षणे फारशी दिसत नाहीत.

२) नागदंशामध्ये प्रामुख्याने ------------------निगडित लक्षणे प्रामुख्याने------------------ दिसतात. सूज हळूवारपणे येते, मात्र वेट गँगरीन लवकर होतो. रक्तस्राव फारसा आढळून येत नाही.

३) मण्यार दंशामध्ये सूज कमी दिसते. लक्षणास थोडा विलंब होतो. शरीर अंतर्गत रक्तस्राव झाल्याने पोटदुखी आणि झटके ही प्रमुख लक्षणे दिसतात.

विषारी व बिनविषारी सर्पदंशाची ओळख ः

१) विषारी सर्पदंशामध्ये दोन खोल दाताच्या जखमा दिसतात. बिनविषारी सर्पदंशात इंग्रजी यू आकाराच्या बारीक खरचटल्या सारख्या जखमा दिसतात.

२) विषारी सर्पदंशात चाव्याच्या जागेवर वेदना अधिक असतात.

३) लक्षणांची तीव्रता अधिक असते. खाणे पिणे बंद होते, सुस्तपणा येतो. रक्तस्राव दिसतो.

सर्पदंश झाल्यावर तातडीचा उपचार ः

१) जनावरास पूर्ण आराम द्यावा. त्यांची हालचाल टाळावी.

२) सर्पदंश झालेल्या दोन इंच वरच्या बाजूस पट्टीने बांधावे. दर वीस मिनिटांनी अर्ध्या मिनिटासाठी पट्टी सोडावी.

सर्पदंश झाल्यावर काय करू नये?

१) जनावरास चालवत, पळवत दवाखान्यात नेऊ नये. ज्यामुळे विष लवकर पसरते. जनावरास पूर्ण आराम द्यावा

२) सुजेवर घासून पुसू नये, त्यामुळे विष पसरते.

३) जखमेवर डाग देणे, कोंबड्याचे गुदद्वार लावणे, जखम करणे, चिरा देणे, जखमेवर शेंदूर लावणे, जागेवर तोंड लावून विष बाहेर काढणे असे अघोरी प्रकार करू नयेत.

सर्पदंशात रक्त तपासणीचा उपयोग ः

१) सर्पदंशाची तीव्रता ही प्लेटलेट्सची संख्येवरून तसेच रक्त गोठण्याच्या क्रियेवरून ओळखता येते.

२) प्लेटलेट्‍सची संख्या जेवढी कमी व रक्त गोठण्यास जेवढा विलंब तेवढी तीव्रता अधिक असते.

३) मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालू आहे का हे पण कळते.

सर्पदंशाची तीव्रता अवलंबून असणारे घटक ः

* सापाचा प्रकार, वय

* सापाने सोडलेले विष

* सर्पदंशाची संख्या

* जनावराचा प्रकार, वय

* जनावराचे आकारमान

* सर्पदंशाची जागा

सर्पदंशावर प्राण्यासाठी उपचार पद्धती ः

उपचार पद्धती ही मनुष्यासारखी आहे. यामध्ये मुख्यत्वे अँटी व्हेनम वापरले जाते. फरक एवढा आहे मोठ्या जनावरांना मात्रा कमी लागते. यशस्वितेसाठी लवकर उपचार करणे आवश्यक आहे.

सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना ः

१. जनावरांना सुरक्षित निवारा द्यावा

२. गोठा, परिसरात अडगळ नसावी. स्वच्छता ठेवावी.

३. जनावरांना दाट कुरणात चरावयास शक्यतो टाळावे.

५. जनावरांना अंधारात चरावयास सोडू नये.

६. जनावरांचे शक्यतो गोठ्यामध्ये संगोपन करावे.

संपर्क ः डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३

(संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

SCROLL FOR NEXT