Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ आजारावर आयुर्वेदिक उपचार...

डॉ. एस. पी. गायकवाड

लम्पी स्कीन हा विषाणूजन्य आजार (Lumpy Skin Outbreak) असल्याने यावर कोणतेही ठोस उपचार नाही. केवळ लस या आजारावर नियंत्रण (Lumpy Skin Disease Control) आणि प्रतिबंध करू शकते. त्यामुळे लक्षणे आधारित उपचार करून आपणास या आजारावर नियंत्रण मिळवावे लागते. आजाराची लक्षणे (Lumpy Skin Symptoms) दाखविणाऱ्या जनावरास तत्काळ पशुतज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत. जनावरास ज्वरनाशक, सूज कमी करणारे व वेदनाशामक औषध टोचून घ्यावे. जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी योग्य उपचार करावेत.

आजार सौम्य स्वरूपाचा असेल तर पशुपालक पारंपरिक घरगुती औषधोपचार पद्धतीचा वापर करून यावर नियंत्रण मिळवू शकतात. फलटण तालुक्यात गतवर्षी काही भागात या आजाराचा प्रादुर्भाव जनावरांना झाला होता. पशुवैद्यकांनी केलेल्या ॲलोपॅथी उपचाराबरोबरच पशुपालकांनी घरगुती पारंपरिक आयुर्वेदिक उपचाराची जोड दिली. यामुळे मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहिले, आजारावर नियंत्रणसुद्धा लवकर आले. उपचार करताना पशुपालकांनी रोगग्रस्त जनावरांना निरोगी जनावरांपासून पूर्णपणे वेगळे ठेवावे. हा संसर्गजन्य आजार असल्याने निरोगी जनावर देखील संक्रमित जनावराच्या संपर्कात आल्यास प्रादुर्भाव होऊ शकतो. निरोगी जनावरांना संक्रमित जनावराचे उरलेले पाणी किंवा चारा खाऊ देऊ नका.

पारंपरिक आयुर्वेदिक उपचाराची पद्धत ः

बंगळूर येथील ट्रान्स-डिसिप्लिनरी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. पुण्यमूर्ती यांनी घरगुती उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून आयुर्वेदिक औषधोपचार पद्धत विकसित केली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास बोर्ड या उपचार पद्धतीचा प्रसार करत आहे. फलटणमध्ये बऱ्याच पशुपालकांनी याचा वापर केला असून चांगला फायदा झाला आहे.

ताप कमी करणे, रोग प्रतिकारशक्ती वाढविणे ः

पद्धत ः १

साहित्य ः

- विड्याची (खाऊची) १० पाने, १० ग्रॅम काळी मिरी, १० ग्रॅम मीठ आणि आवश्यकतेनुसार चवीसाठी गूळ.

कृती :

१) संपूर्ण साहित्य बारीक करून पेस्ट तयार करावी. आवश्यकतेनुसार गूळ मिसळावा. यानंतर योग्य आकाराचे लाडू तयार करावेत. असे लाडू जनावरास खायला देणे सोपे जाते.

वापरण्याची पद्धत :

१) हे मिश्रण जनावरांना थोड्या-थोड्या प्रमाणात खायला द्यावे. पहिल्या दिवशी दर तीन तासांनी जनावरांना मिश्रणाचा एक लाडू द्यावा.

२) दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या आठवड्यापर्यंत, दिवसातून फक्त तीन वेळा मिश्रणाचा एक लाडू द्यावा.

३) प्रत्येक वेळी ताज्या मिश्रणाचा लाडू तयार करावा.

पद्धत ः २

साहित्य ः

- लसणाच्या पाकळ्या २, धने १० ग्रॅम, जिरे १० ग्रॅम, काळे मिरे १० ग्रॅम, विड्याची पाने १० नग, कांदे २ नग, हळद १० ग्रॅम, तुळशीची पाने १ मूठ, कडुनिंबाची पाने १ मूठ, बेल पाने १ मूठ, गूळ १०० ग्रॅम, चिरायता पावडर ३० ग्रॅम, तमालपत्र १ मूठ.

कृती ः

१) प्रथम धने, जिरे, काळी मिरी एकत्र करून ३० मिनिटे पाण्यात

भिजवत ठेवावे.

२) ३० मिनिटांनंतर हे सर्व घटक मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करावी. त्यानंतर त्यामध्ये उर्वरित घटक एकत्रित करून मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. अशा पद्धतीने पेस्ट तयार करावी.

वापरण्याची पद्धत ः

१) तयार झालेल्या पेस्टचे छोटे लाडू तयार करून घ्यावेत.

२) पहिल्या दिवशी दर तीन तासाला तयार केलेल्या लाडूंची मात्रा द्यावी.

३) दुसऱ्या दिवसापासून जनावरास बरे वाटेपर्यंत मिश्रणाचे लाडू तयार करून दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी व सायंकाळी द्यावेत.

४) दर दिवसाला दररोज नवीन मिश्रण तयार करावे. १,२ दिवसांचे किंवा आठवड्याचे मिश्रण एकदम करून ठेवू नये.

जखमेवर लावायचे मिश्रण ः

साहित्य ः १ मूठ मेथीची पाने, १० पाकळ्या लसूण, १ मूठ कडुनिंबाची पाने, १ मूठ मेंदीची पाने, ५०० मिलि खोबरेल किंवा तीळ तेल, २० ग्रॅम हळद, १ मूठ तुळशीची पाने.

तयार करण्याची पद्धत ः

- सर्व साहित्य बारीक करून पेस्ट बनवावी. यानंतर त्यामध्ये खोबरेल किंवा तिळाचे तेल मिसळून ते उकळून थंड करावे,

वापरण्याची पद्धत ः

१) प्रथमतः जनावराची जखम स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर तयार केलेले तेलयुक्त मिश्रण थंड करून स्वच्छ कापडाच्या साह्याने थेट जखमेवर लावावे.

२) दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळ आणि सायंकाळी हे मिश्रण लावावे.

३) जखमेत किडे दिसल्यास, प्रथम कापूर खोबरेल तेलात मिसळून लावावा किंवा सीताफळाची पाने बारीक करून पेस्ट तयार करून जखमेवर लावावी. हे वापरताना काळजी घ्यावी. हे मिश्रण दररोज लावण्याची गरज नाही, जर किडे असतील तरच लावावे.

संपर्क ः

डॉ. एस. पी. गायकवाड, ९८८१६६८०९९

(महाव्यवस्थापक, गोविंद डेअरी, फलटण, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT