Animal Feed Update Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed Update : जनावरांच्या आहारात चिलेटेड खनिज मिश्रणांचा योग्य वापर

खनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन क्षमतेवर होतो. दूध उत्पादन क्षमता खालावते. त्यामुळे जनावरांच्या रोजच्या आहारात शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा वापर केल्यास दुष्परिणाम टाळता येतात.

Team Agrowon

डॉ. संजय भालेराव, डॉ. विकास सरदार, डॉ. समाधान गरंडे

Animal Feed : जनावरांच्या उत्तम निरोगी वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, गर्भाच्या वाढीसाठी खनिजांची आवश्यकता असते. मानवी शरीराप्रमाणे जनावरांच्या शरीराला देखील दोन प्रकारच्या खनिजांची गरज असते. यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो प्रकारातील खनिजे येतात.

मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे म्हणजे मॅक्रो खनिजे (प्रतिदिन १०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त) होय. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम इत्यादी खनिजे येतात.

सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे मायक्रो खनिजे (प्रतिदिनी १०० मिलिग्रॅमपेक्षा कमी) होय. यामध्ये झिंक, कोबाल्ट, मॅंगेनीज, कॉपर, आयर्न, आयोडीन, सेलेनिअम इत्यादी खनिजांचा समावेश होतो.

गाई, म्हशींकडून जास्त दूध उत्पादन (MIlk Production), रोगप्रतिकारकशक्ती वाढ, वेळेवर माजावर येणे, गाभण राहणे, वासरांची लवकर वाढ होण्यासाठी चिलेटेड खनिजांची मदत होते. चांगल्या व्यवस्थापनाबरोबरच दर्जेदार पशुखाद्य किंवा आंबोण, हिरवा व कोरडा चारा, याबरोबरच चांगल्या प्रतीची पशुखाद्य पुरके उपयुक्त असतात.

गाई, म्हशी वेळेवर माजावर येणे, गाभण जाणे, वासराची योग्य वाढ, विताना वार न अडकणे, खुरांची काळजी, कासदाहाला प्रतिकार, खाद्य व चाऱ्याच्या योग्य पचनामध्ये पुरके उपयुक्त ठरतात.

गाई, म्हशी, कालवडींना पशुआहारासोबत पूरक म्हणून खनिज मिश्रण देतात. परंतु काही पशुपालक दर काही महिन्यांनी खनिज मिश्रणे बदलतात. खनिज मिश्रणाचा वापर, प्रमाण तसेच त्यातील घटकांविषयी जागरूकता नाही. त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसत नाही.

सर्वसाधारणपणे खुराकामध्ये एक टक्का मीठ, दोन टक्के क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते. प्रति किलो वजनाच्या प्रमाणात ४० मिलिग्रॅम क्षार मिश्रणाचे प्रमाण जनावरांसाठी पुरेसे असते.

दुभत्या गाई आणि म्हशीला ६० ते ७० ग्रॅम/ जनावर / दिवस (दुग्धोत्पादनानुसार). मोठी वासरे, कालवड आणि भाकड जनावरे ४० ते ५० ग्रॅम/ जनावर / दिवस आणि लहान वासरांना २० ते २५ ग्रॅम / वासरू /दिवस (योग्य वजन वाढीसाठी) खनिज मिश्रण द्यावे.

चिलेटेड खनिजांचे प्रकार :

१) मायक्रो खनिज व प्रथिने, अमिनो आम्ल किंवा अमिनो आम्लाचे एकत्र संयुग करून चिलेटेड खनिज तयार करावयाचे विविध प्रकार आहेत.

२) यामध्ये अमिनो ॲसिड कॉप्लेक्स, सोया हायड्रोलायसेटस, ग्लायसीनेट्‍स, मिथीओनेट्‍स, एमएचए, एचएमटीबीए इत्यादी व इतर उत्पादन प्रक्रिया प्रकार येतात. ही एक क्लिष्ट प्रक्रिया असून, यात १० ते २० टक्के मायक्रो खनिज व बाकी चिलेटिंग एजंट असे संयुग असते.

३) केवळ खनिजे आणि प्रथिने एकत्र मिश्रण करून त्यांचे संयुग तयार होत नाही. त्यामुळे योग्य प्रकारच्या व शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या चिलेटेड खनिजांचा वापर पशुपालक गाई, म्हशींच्या पशुआहारात योग्य प्रमाणात करू शकतात.

४) संकरित गाई, जास्त दूध देणाऱ्या मुऱ्हा, मेहसाणा म्हशींना दुग्धोत्पादनानुसार पोषक तत्त्वांची जास्त गरज असते. चिलेटेड खनिजे नॉन चिलेटेड खनिजांपेक्षा शरीरात जास्त शोषली जातात. दुभत्या जनावरांना चिलेटेड खनिजे देण्याचा उद्देश म्हणजे कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करणे.

५) खनिजांची विविध चयापचय प्रक्रियेमध्ये शरीराला गरजेची असते. तसेच ते उत्प्रेरक म्हणून विविध विकर आणि संप्रेरके यांच्यासाठी काम करतात. हे संपूर्ण आरोग्य, पचन, शरीराची वाढ व उत्पादन यासाठी आवश्यक असते.

६) नेहमीच्या पशुखाद्यामध्ये तसेच हिरवा, कोरडा चाऱ्यामध्येही खनिजे असतात, परंतु जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींची शारीरिक गरज जास्त असल्याने त्यांना अतिरिक्त खाद्य, चारा याबरोबरच शरीराला जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकणाऱ्या खनिजांची गरज भासते.

७) सूक्ष्म खनिजे ही शरीराची चांगली वाढ, हाडांची मजबुती, खुरे, त्वचा, केसांची गुणवत्ता यासाठी उपयुक्त आहेत. गर्भाशयाशी निगडित आजार तसेच कासदाह, खुरांचा आजार व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिलेटेड खनिजांचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

८) सूक्ष्म खनिजांची शरीराला आवश्यक मात्रा आणि शरीराला विषारी मात्रा यामध्ये खूप कमी फरक असल्यामुळे काही खनिजे शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास त्याचे दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे खनिज मिश्राणांतील घटक हे काळजीपूर्वक निवडून त्यांचे प्रमाण हे एकमेकांना पूरक असेल तरच त्याचा फायदा जास्त प्रमाणात मिळू शकतो.

९) खनिज मिश्रणाची किंमत कमी करण्यासाठी काही वेळा कमी प्रतीच्या संयुगांचा वापर केला जातो. त्यामुळे खनिजांची शुद्धता महत्त्वाची आहे.

उदा. स्वस्त लाइम स्टोन पावडर (एल.एस.पी.) हा कॅल्शिअमचा स्रोत म्हणून वापरला जातो, परंतु त्यासोबत जर फ्लोरिन व इतर जड धातू जनावरांच्या पोटात गेले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

चिलेटेड खनिजे म्हणजे काय?

१) खनिजाला चिलेट करणे म्हणजे एका अर्थाने त्यांचे सेंद्रिय रेणूमध्ये रूपांतर. यामध्ये दोन भाग सेंद्रिय पदार्थ (प्रथिने किंवा अमिनो आम्ल) आणि एक भाग खनिज यांचा बंध असतो. एका सहसंयोजक बंधाने ते एकत्र जोडलेले असतात.

२) एका खनिजाला दुसऱ्या प्रथिनाने किंवा अमिनो आम्लाने धरून ठेवले जाते. यामुळे शरीरात अत्याधिक आवश्यक असलेली प्रथिने शोषली जातात. त्याबरोबरच खनिजेसुद्धा शरीरात शोषली जातात, तेथे विघटन होते. शरीरात खनिजे व प्रथिने किंवा अमिनो आम्ल आपापले काम करते.

३) खनिजांची कोठीपोटातील स्थिरता ही त्यांच्या प्रथिनासोबतच्या बंधावर अवलंबून असते. त्याद्वारे १० ते २० टक्के प्रमाणात खनिज हे अमिनो आम्ल किंवा प्रथिनांशी जोडले जाते.

४) चांगल्या प्रतीच्या चिलेटेड खनिजांवर कुठलाही धन किंवा ऋण भार नसतो, ज्यायोगे त्यांना कोठीपोटामध्ये तटस्थ राहता येते. आतड्यामधून त्यांचे शरीरात शोषण केले जाते. जनावरांच्या शरीराला अत्यावश्यक असणारी मिथीओनीन, लायसीन ई अमिनो आम्ल शरीरात लवकर शोषली जातात.

५) सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे झिंक, मँगेनीज, कॉपर, कोबाल्ट, सेलेनियमचे चिलेशन होऊ शकते, कारण त्यांच्या अमिनो आम्ल संयुगातून बनलेल्या रेणूचे वजन हे ८०० डाल्टनपेक्षा कमी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शरीरात शोषले जातात. मॅक्रो प्रकारच्या खनिजांचे चिलेशन होऊ शकत नाही.

चिलेटेड खनिज मिश्रणाचे फायदे :

१) चिलेटेड खनिजे हे नॉन-चिलेटेड खनिजांपेक्षा शरीरात जास्त शोषली जातात. शरीरामध्ये शोषण झालेल्या पोषणद्रव्यांचा चांगल्या प्रकारे शरीरात वापर होतो.

२) वासरांची आणि कालवडींची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात.

३) वळू आणि गाईंची प्रजोत्पदानाची कार्यक्षमता वाढते.

४) वेताचा काळ वाढून (दूध उत्पादनाचा काळ) दोन वेतांतील अंतर कमी होते.

५) खाद्याची उपयुक्तता वाढते. पचन क्षमतेमध्ये सुधारणा.

६) दुग्धोत्पादनात वृद्धी होते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

७) उत्तम चयापचय प्रक्रियेसाठी महत्त्वाची भूमिका.

८) त्वचा सतेज राहण्यास मदत.

९) शरीरातील रक्त, संप्रेरके, विकर चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत.

१०) कासेचे आरोग्य चांगले राहते. दात, हाडे, खुरे मजबूत होतात.

संपर्क : डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५, (पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT