Old Orange Orchard Management
Old Orange Orchard Management  Agrowon
ॲग्रो गाईड

Old Orange Orchard : जुन्या संत्रा बागांसाठी ‘कामधेनू’ चर का उपयुक्त असते?

Team Agrowon

विजय विश्‍वनाथ चवाळे

Orange Management : संत्रा हे विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे फळपीक आहे. नागपुरी संत्र्याला सन २०१४ मध्ये भौगोलिक चिन्हांकनही (जीआय) प्राप्त झाल्याने राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांतील संत्रा उत्पादकांनी संत्रा पिकातून एकेकाळी नक्कीच समृद्धी अनुभवली आहे.

मात्र गेल्या काही वर्षांत बहुतांश सर्व संत्रा उत्पादन वेगवेगळ्या कारणांमुळे मेटाकुटीला आलेले दिसतात. चांगले उत्पादन देणाऱ्या संत्रा बागांचा ऱ्हास होताना दिसतो. या ऱ्हासामागील कारणांचा शोध घेता अनेक कारणांसह ‘अयोग्य जमिनीत संत्रा लागवड’ हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत असल्याचे दिसते.

मात्र यापूर्वी अशाच किंवा जमिनीत दर्जेदार उत्पादन बहुतांश शेतकरी घेत होते. मी संत्रा पिकातील तज्ज्ञ नसलो, तरी कृषी पदवीनंतर ३०-३२ वर्षे कृषी विभागात कार्यरत आहे.

त्यामुळे विविध भागांतील बागांची निरीक्षणे, शेतकऱ्यांचे अनुभव व त्यांच्याशी नियमित होत असलेल्या चर्चा यातून काही मुद्दे माझ्या लक्षात आले आहेत. ते या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न.

विदर्भातील संत्रा बागांमध्ये अगदी टोकाच्या परस्पर विरोधी बाबी दिसतात. हमखास पावसाचा प्रदेश असल्याने पावसाळ्यात अधिक पावसाची स्थिती, बागेत पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून येणाऱ्या फायटोप्थोरासारख्या रोगांचा प्रादुर्भाव ही एक बाब, तर भूजलाचा अति उपसा आणि त्याच वेळी जलसंधारणाकडे दुर्लक्ष यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष ही स्थिती.

माझ्या शासकीय सेवा काळात स्वतःच्या शेतावर, शासकीय प्रक्षेत्रावर व ‘आत्मा’ मध्ये कार्यरत असताना कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर मृद्‍-जलसंधारणाबाबत काही प्रयोग केले.

विशेषतः सेंद्रिय चक्रीकरण चर (इंग्रजीमध्ये Water Absorption Cum Organic Recycling Trench WACORT) या नावाने स्थानिक विकसित तंत्रज्ञान (आय.टी.के.) अंतर्गत काही प्रयोग केले.

त्याचे चांगले फायदे दिसल्यामुळे माझ्या क्षेत्रीय कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांमध्ये त्याच्या प्रसाराचाही प्रयत्न केला.

जुन्या संत्रा बागांमध्ये या चरांमध्ये गरजेनुसार थोडासा बदल करून अवलंब केल्यास कथित अयोग्य जमिनीतील लागवडीमध्येही फळबागांचे आयुष्य आणि उत्पादकता वाढवता येईल, असा विश्‍वास वाटतो. विशेषतः फळबागांच्या ऱ्हासाची साधारणतः ५० टक्के कारणे तरी कमी करता येतील.

या बहुपयोगी मृद्‍-जलसंधारण, सेंद्रिय चक्रीकरण अन् अतिरिक्त जलनिस्सारण चराच्या तंत्राला ‘कामधेनू चर’ असे नामकरण मी केले आहे. ते समजून त्यात आपल्या अनुभवाची, प्रत्यक्ष शेतीतील निरीक्षणाची जोड देता येईल. परिस्थितीनुरूपही काही बदल करता येतील.

...असे आहे कामधेनू चर बनविण्याचे तंत्र

१) सर्वप्रथम आपल्या बागेचे निरीक्षण करून शेताचा मुख्य उतार व दुय्यम उतार जाणून घ्यावा. प्रत्येक शेतकऱ्याला अनुभवाने हे माहीत असतेच. वाफे पद्धतीने पाणी देण्यासाठी आपण पाण्याचा मुख्य पाट (चर किंवा दांड) मुख्य उताराच्या दिशेने व झाडापर्यंत पाणी पोहोचणारे दांड किंवा पाट दुय्यम उताराच्या दिशेनेच ठेवतो.

२) संत्रा झाडांच्या दोन रांगेच्या अगदी मधोमध मुख्य उताराला आडव्या दिशेने ४५ ते ५० सेंटिमीटर रुंद आणि ४५ ते ६० सेंटिमीटर खोल चर बैलाच्या नांगराने, छोट्या ट्रॅक्टरद्वारे नांगरून किंवा मजुरांकडून खोदून करून घ्यावा.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे म्हणजे हलक्या जमिनीत कमी खोलीचा, तर भारी जमिनीत जास्त खोलीचा असावा. या चरातून निघालेली वरील थरातील सुपीक मातीची भर संत्रा झाडांच्या बुंध्याभोवती घालावी.

३) दोन ओळींतील चरांचा दुय्यम उतार ज्या बाजूला असेल, त्या बाजूला टोकाकडे ६० ते ७५ सेंटिमीटर रुंद व ६० ते ७५ सेंटिमीटर खोल नाली मुख्य उताराच्या दिशेने तयार करावी. सर्व चरांची उताराकडील बाजूची टोके या नालीला जोडून घ्यावी. त्यामुळे अति पावसामुळे शेतात साचणारे पाणी या नाली वाटेबाहेर काढणे सोपे होईल.

४) दोन ओळींच्या मधील प्रत्येक चरांमध्ये बागेतील तणांचे अवशेष, काडी कचरा व शेतातील शिल्लक राहणारे सेंद्रिय अवशेष, धुऱ्यावरील सुबाभूळ, गिरिपुष्प, शेवगा यांसारख्या वारा प्रतिबंधक झाडांच्या कोवळ्या फांद्या इ. भरून घ्याव्यात.

म्हणजेच चरांच्या आजूबाजूंनी वहिवाट करताना करताना चर खचणार किंवा बुजणार नाहीत. त्यात टाकलेले सेंद्रिय पदार्थ पुढील वर्षभरात चांगले कुजतात. त्याचे उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.

५) या चरांतील कुजलेले सेंद्रिय खत पुढील हंगामात काढून झाडांना देण्यासाठी वापरावे. पुन्हा हा चर पूर्वीप्रमाणे काडीकचरा व सेंद्रिय पदार्थाने भरून घ्यावेत.

या चरातील काडीकचरा चांगला कुजण्यासाठी बायोडीकंपोझर, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, पीएसएम अशा जिवाणू खतांचा वापर करावा. सोबतच ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकांचाही वापर केल्यास जमिनीतून येणाऱ्या रोगांना अटकाव करण्याचे काम ते नक्कीच करते. एकूणच जमिनीची व पिकाची आरोग्यात सुधारणा होते.

६) प्रत्येक दोन ओळींच्या मधील चर हे मुख्य उताराला आडवे असल्याने पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी व त्या सोबत वाहून जाणारी माती या चरात अडेल.

पाणी जिरण्यासाठी जास्त वेळ मिळाल्याने भूगर्भातील पाण्याचे संधारण होईल. ही जमा झालेली सुपीक माती आणि पाणी यामुळे चरातील काडीकचरा लवकर कुजण्यास मदत होईल. म्हणजे मृदा व जलसंधारणासोबतच सेंद्रिय चक्रीकरण साध्य होईल.

७) पावसाळ्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस होऊन अतिरिक्त पाणी साचण्याची स्थिती असताना या चरांची मुख्य नालीकडील टोके (तोंडे) मोकळी करून द्यावीत. त्यामुळे शेतातील अतिरिक्त पाणी मुख्य नालीमधून शेताबाहेर जाते. अतिरिक्त पाण्याचा निचरा झाल्याने संभाव्य नुकसान टाळता येते.

८) एखाद्या वर्षी पावसाळा दुर्दैवाने कमी झाला तर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब भूगर्भात जिरण्यासाठी या चरांची मदत होते. कमी पावसाच्या वर्षानंतर उन्हाळ्यात कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्येही आपली बाग वाचवता येते. याच चरांचा वापर सिंचनासाठीही करता येईल.

विशेषतः विहिरीत पाणी कमी असण्याच्या स्थितीमध्ये वाफ्याने पाणी देण्याऐवजी उपलब्ध पाण्याद्वारे हे चर भरून ठेवता येतात. या चराच्या बाजूला असलेल्या झाडांना दोन्ही बाजूंनी ओलावा मिळतो. सेंद्रिय पदार्थांचे आवरण असल्यामुळे बाष्पीभवनही कमी होते.

पर्यायाने कमी पाण्यातही बाग वाचू शकते. त्यातही पाणी एकदमच कमी असेल तर एक आड एक चरामध्ये पाणी सोडता येते. म्हणजे एकदा झाडाच्या एका बाजूला व दुसऱ्यांदा दुसऱ्या बाजूला ओलावा मिळतो. पाण्याविना झाडे वाळण्याचे प्रमाण नियंत्रित करता येईल.

वर्षातून एकदा काम आणि वर्षभर उपयोग

प्रत्येक बागेत उन्हाळ्यापूर्वी एकदाच असे कामधेनू चर व नाली तयार करून घेता येते. त्यात दरवर्षी कुजलेले सेंद्रिय पदार्थ काढणे व नवीन पदार्थ भरणे एवढेच काम करावे लागते. ही संपूर्ण यंत्रणा वर्षानुवर्षे कार्यरत राहते.

कामधेनू चर तयार करण्यासाठी पहिल्या वर्षी मात्र थोडा अधिक खर्च व भरपूर श्रम पडतात, हे खरे. मात्र त्या तुलनेत त्याचे फायदे बहुआयामी आणि बहुमोल असतील यात शंका नाही.

कामधेनू चराचे फायदे

- पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत मुरण्यासाठी मदत होते.

- पावसासोबत वाहून जाणारी सुपीक माती चरात अडते.

- चरातील काडी कचऱ्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते.

- चर खोदताना निघालेल्या मातीची भर झाडांना दिल्यामुळे खोडांचे रोगापासून संरक्षण होते.

- अति पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा तयार राहते. अतिपाण्यामुळे फायटोप्थोरासारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रसाराला अटकाव होतो.

- जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य सुधारेल.

- जैविक बुरशीनाशके व जैविक खतांचा चरात वापर केल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. जमिनी सजीव व सुपीक होण्यास मदत होते.

- अशा प्रयत्नातून जमिनीबाबतच्या समस्या हळूहळू कमी होतील. पहिल्या काही वर्षांतच किमान ५० टक्के समस्या संपल्याचे शेतकऱ्यालाच जाणवते. उर्वरित समस्या नेमकेपणा तज्ज्ञांकडून जाणून घेऊन उपाययोजना केल्यास आपली बाग वाचवणे शक्य होईल. यात शंका नाही. शेवटी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शब्दात ‘तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय, शिकवावे?’

विजय विश्‍वनाथ चवाळे, ९४२३१२५१६७, (प्राचार्य, रामेती, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT