Amravati News पारंपरिक पिकाच्या जोडीला अपारंपरिक क्षेत्रातही संत्रा लागवड (Orange Cultivation) वाढीस लागली आहे. वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
या भागातील फळांची गुणवत्ता देखील पारंपरिक क्षेत्राच्या तुलनेत चांगली असली तरी मात्र पाण्याअभावी या जिल्ह्यांमध्ये संत्रा लागवड विस्ताराला मर्यादा असल्याचा दावा कृषी क्षेत्रातील (Agriculture Sector) जाणकारांनी व्यक्त केला.
कृषी विभागाच्या नोंदीनुसार, सध्या राज्यात संत्र्याखालील क्षेत्र एक लाख १० हजार हेक्टरच्या आसपास आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याने ७० हजार हेक्टर लागवडीच्या माध्यमातून राज्यात आघाडी घेतली आहे.
त्यानंतर २५ हजार हेक्टर क्षेत्र ऑरेंज सिटी ओळखल्या जाणाऱ्या नागपूर परिसरात आहे. यानुसार एक लाख हेक्टरच्या आसपास संत्रा लागवड ही एकट्या विदर्भात तर उर्वरित दहा हजार हेक्टर क्षेत्र हे राज्यात आहे.
अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये उत्पादित होणाऱ्या संत्रा फळांचा दर्जा पोषक वातावरणामुळे राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत सरस आहे. या भागात जमिनीची पाणी साठवण क्षमता देखील अधिक आहे.
याउलट संत्र्याचा विस्तार होणाऱ्या वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात मात्र सिंचनाचे स्रोत मर्यादित आहेत. परिणामी संत्रा लागवडीला देखील याच कारणामुळे मर्यादा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाशीम, बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यात जमीन संत्रा लागवडीला पोषक आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी लागते. त्यामुळेच या भागातील बागा किडरोगरहित आहेत. तसे असले तरी पिकाला पाण्याची गरज अधिक राहते. अशावेळी उपलब्धता न झाल्यास बागा जळण्याचा धोका राहतो.
परिणामी, वाशीम, बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांत संत्र्याखालील क्षेत्र सध्यापेक्षा ३०० ते ४०० हेक्टर वाढण्याचा अंदाज आहे. संत्रा लागवड क्षेत्राचा विस्तार पाहता या दोन्ही जिल्ह्यांसाठी म्हणून राज्य शासनाने नुकत्याच आपल्या अर्थसंकल्पात आधुनिक संत्रा सुविधा केंद्रासाठी निधीची तरतूद केली आहे. परिणामी या भागात उत्पादित संत्रा फळांच्या गुणवत्तेत सुधारणांना चालना मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.