Organic Cultivation : जिवंत जमीन हे सेंद्रिय शेतीचा केंद्र बिंदू आहे. ती तयार करण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात २ टक्क्यांपर्यंत वाढ करणे गरजेचे असते. सध्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी (०.८ टक्क्यापेक्षा कमी) झाले आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची उपलब्धता करण्यासाठी पिकाचे सर्वच प्रकारचे शिल्लक अवशेष शेतातील जमिनीमध्ये गाडले जातील, किंवा त्यापासून कंपोस्ट बनेल, याकडे लक्ष द्यावे. उदा. शेतातील काडी- कचरा, धसकटे, पिकाचे अवशेष, पाला-पाचोळा, निंदण केलेले गवत, पीक उत्पादनाचे टाकाऊ घटक इ. अशा पदार्थांना शेणखताची जोड दिल्यास ते लवकर कुजतात. त्यांच्याद्वारे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण २ टक्क्यांपर्यंत निश्चितच नेता येईल.
सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर.
जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण.
पीक फेरपालट न करणे.
पीक अवशेष जाळणे
सातत्याने जमिनीची मशागत झाल्यामुळे जमिनीला विश्रांती न देणे
सेंद्रिय कर्बाचे महत्व
जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला की जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये मोठी सुधारणा होते. उदा. जमिनीचा सामू उदासीनच्या जवळपास येतो. माती कणांची जलधारण क्षमता वाढते. अतिरिक्त पाऊस व अन्य स्थितीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. परिणामी, जमीन अधिक काळ वाफसा स्थितीमध्ये राहते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची व अन्य जैविक घटकांची संख्या वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
सेंद्रिय शेतीप्रमाणेच इकोफार्मिंग, इकोफ्रेंडली फार्मिंग, इकॉलॉजीकल फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, बायोलॉजिकल फार्मिंग, बायोडायनॅमिक फार्मिंग, बायोइंटेसिव्ह फार्मिंग, कॉन्झर्व्हेटिव्ह फार्मिंग, नो टिलेज फार्मिंग, झिरो टिलेज फार्मिंग, मिनिमम टिलेज फार्मिंग, पर्माकल्चर, परमनंट ॲग्रिकल्चर, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर, इंडिजिनस ॲग्रिकल्चर, अल्टरनेट ॲग्रिकल्चर अशी सेंद्रिय शेतीला जवळ जाणाऱ्या पद्धती देश विदेशात प्रचलित आहेत. त्यामध्ये फारच थोडा फरक आहे. मात्र या सर्व प्रकारामध्ये जमिनीची सुपीकता आणि त्यातील सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या कोणत्याही प्रकारामध्ये आपण आपली शेती नेणार असू, तर त्याकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे.
सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती
सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी पिकांचे व्यवस्थापन करताना सेंद्रिय निविष्ठा, जैविक निविष्ठा, वनस्पतिजन्य निविष्ठा यांचा बीजप्रक्रिया; अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन; किडी-रोग आणि तणांचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे. सध्या सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या कमी आहेत. त्यामुळे निविष्ठांचे स्रोतही मर्यादित आहेत. त्यांची उपलब्धता गुणवत्ता व दर्जा ही चांगला नसतो. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने स्वतः अनेक निविष्ठा घरगुती पातळीवर किंवा गट पातळीवर तयार करून वापराव्या लागतात. त्यामुळे या निविष्ठा उपलब्धता होत नाहीत. अशा निविष्ठांच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या गटाने किंवा शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. उदा. गांडूळ खताचे उत्पादन, कडुनिंबाचा अर्क, दशपर्णी अर्काची निर्मिती करणे इ.
माहिती आणि संशोधन - जितेंद्र दुर्गे, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती
(An initiative by Salam Kisan.)
(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.