Agriculture Warehouse
Agriculture Warehouse  Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture Warehouse : गोदाम कामकाज स्वीकृत कार्यप्रणाली

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

Agriculture Warehousing वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडे ऑनलाइन पद्धतीने गोदाम प्रमाणीकरण (Warehouse Standardization) करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर (SOP)/स्वीकृत कार्यप्रणाली/प्रमाणित कामकाज प्रक्रिया सादर करावी लागते.

या पद्धतीसाठी लागणारी कागदपत्रे व त्यातील मार्गदर्शक सूचनांमुळे वखार केंद्रावरील कामकाजात सुसूत्रता आणून कामकाज सुरळीतपणे होऊ शकते.

वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत स्टँडर्ड ऑपरेटिंग पद्धत ः

वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत (WDRA) स्टँडर्ड ऑपरेटिंग पद्धत अंतर्गत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या आधारे जर वखार केंद्राचे कामकाज केले तर कामकाज अत्यंत सुरक्षित व वेगाने करता येते.

या पुढील काळात गोदाम व्यवसायात (Warehousing Business) संगणक प्रणालीच्या वाढत्या उपयोगामुळे गोदामातील सर्व प्रक्रिया सोप्या होऊ शकतील.

गोदामात साठा जमा करण्याची नियमावली ः

१) ठेवीदाराची माहिती संग्रहित करण्याची पद्धत ः

१)वखार प्रमुखाने ठेवीदाराने ठेवलेला साठा (Stock) स्वीकारण्यापूर्वी ठेवीदाराचे ओळखपत्र, साठ्याची मालकी, साठ्याची प्रत, तपासणे गरजेचे आहे. साठ्यासंदर्भातील कागदपत्रे, रहिवासी दाखला, वेअरहाउस अधिनियम शेड्यूल ७ (नियम २४) २०१७ प्रमाणे सर्व कागदपत्रे जमा करावीत.

२) साठा स्वीकारण्यापूर्वी ठेवीदार किंवा ठेवीदारांच्या प्रतिनिधींची सर्व कागदपत्रांवर सही घेणे गरजेचे आहे.

३) ठेवीदार किंवा त्याच्या प्रतिनिधींची सत्यता पडताळण्यासाठी लागणारी कागदपत्रे तपासून घ्यावीत.

२) साठ्याची साठवणूक करण्याची नियमावली ः

ठेवीदाराने साठ्याची वखार केंद्रावर आवक आणल्यानंतर करावयाची पूर्तता पुढील प्रमाणे आहे.

१ - साठा ठेवण्यासाठीचा अर्ज दाखल करणे.

२ - भरलेल्या साठ्याचा ट्रक गेट रजिस्टरमध्ये नोंद करून वखार केंद्रावर दाखल करणे.

३ - भरलेल्या गाडीचे वजन करणे.

४ - साठ्याच्या प्रतीची तपासणी करणे.

५ - ट्रकने आणलेला साठा गोदामात उतरविणे.

६ - गोदामात उतरविलेल्या साठ्याची थप्पी मारणे.

७ - गोदामात आणलेल्या साठ्याची रजिस्टरमध्ये नोंद करणे.

८ - हस्तांतर करणारी पावती तयार करणे.

९ - वखार पावती आणि साठ्याची व्यवस्थित नोंद करणे.

३) वखार केंद्रावर साठा जमा करण्यापूर्वी घेण्याची खबरदारी ः

१ - वखार केंद्रावर जमा करण्यात आलेल्या साठ्याची तपासणी करावी.

२ - वखार केंद्रावर साठा आवक होताना जर फाटकी पोती असतील, तर ती शिवून पूर्णपणे भरून घ्यावीत. खराब पोती असतील तर ती मोकळी करून साठा वाळवून परत भरून घ्यावी.

३ - कीटकग्रस्त साठ्याचे त्वरित धुरीकरण करावे.

४ - धान्य साठा विविध कारणांमुळे खराब होण्याच्या मार्गावर असेल, तर तो साठा जास्त दिवस साठवणुकीस ठेवू नये.

५ - आवक घेताना सर्व काळजी घेऊनच साठा साठवणुकीस ठेवावा.

४) साठा स्वीकारण्यापूर्वी वजन करण्याची पूर्तता ः

वखार केंद्र प्रमुखाने अचूक इलेक्ट्रॉनिक हस्तांतरीय वखार पावती, ज्यात साठ्याचे वजन व प्रतीचा समावेश असेल अशी तयारी करावी.

यामध्ये खाली नमूद केलेल्या कृतींचा समावेश असेल.

१ - वखार केंद्रावर साठा स्वीकारण्यापूर्वी साठ्याचे वजन करूनच तो स्वीकारण्यात यावा.

२ - केंद्र प्रमुखाने वजन व्यवस्थित नोंदवून त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी.

३ - साठ्याची वखार केंद्रावर आवक होत असताना आलेल्या ट्रकची गेट रजिस्टरवर नोंद घ्यावी.

४ - वखार केंद्रावर वजनकाटा उपलब्ध नसेल, तर प्लॅटफॉर्म स्केल उपलब्ध करावे.

५ - वखार केंद्रावर वजनकाटा उपलब्ध नसेल, तर बाहेरील काट्यावर स्वत: देखरेख करून वजन तपासावे.

६ - काट्याचे वजन वखार केंद्रप्रमुख ठेवीदाराला दाखवून व सही करून मगच वखार केंद्रावर साठवणुकीस ठेवतील.

७ - वखार केंद्रावर आलेल्या साठ्याचे १०० टक्के वजन करूनच साठा साठवणुकीस ठेवावा, पण जर पॅकिंगवर वजन नमूद केले असेल, तर १० टक्के मालाचे वजन घ्यावे.

८ - वजनकाटा व वजनमाप हे वजनकाटा तपासणी अधिकाऱ्याकडून दरवर्षी प्रमाणित करून घ्यावा.

वखार केंद्रावर साठा ठेवताना प्रत तपासणी ः

१) वखार केंद्रावर साठ्याची आवक होत असताना त्याची प्रत तपासण्याची व्यवस्था ठेवण्यात यावी.

२) केंद्रप्रमुख आलेल्या साठवणुकीचा नमुना घेऊन त्याची प्रत तपासणी करतील.

३) केंद्रप्रमुखाने साठा सरकारने नेमून दिलेल्या विहित परिमाणात आहे, याची काळजी घ्यावी.

४) ॲगमार्कने शेतीमालाच्या दर्जाचे परिमाण वखार केंद्रावर स्पष्ट दिसतील अशा रीतीने फलकावर लावावे.

५) वखार केंद्रावर नमुना तपासण्यासाठी तपासनीस असावा किंवा एनएबीएलने मान्यता दिलेल्या तपासनीसाकडून नमुना तपासण्याची सोय असावी.

वखार केंद्रावर साठविलेल्या साठ्याची तपासणी करण्याकरिता नमुना काढण्याची पद्धती ः

वखार केंद्रावरील साठा तपासणीसाठी आणलेल्या साठ्याची खाली नेमून दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून तपासणी करावी.

१) साठवणुकीस ठेवलेल्या साठ्याचा नमुना काढण्यासाठी BIS code चा २८१४-१९८चा अवलंब करावा.

२) साठवणीत ठेवलेल्या साठ्याचा ठेवीदार व केंद्रप्रमुख यांनी संयुक्तपणे नमुना काढावा.

३) साठवणुकीत ठेवलेल्या साठ्याचा सर्वसमावेशक नमुना काढावा व पूर्णपणे मिसळून घ्यावा.

४) खराब धान्य असेल, तर तो इतर चांगल्या धान्यापासून लांब साठवणुकीस ठेवावा.

५) साठविलेल्या धान्याचा नमुना हा स्वच्छ, वाळलेला व इतर पदार्थ न मिसळलेला/निर्भेळ असावा.

६) साठवणुकीस असलेल्या धान्याचा नमुना व्यवस्थित ठिकाणी सांभाळून ठेवावा जेणेकरून तो खराब होणार नाही.

साठवणुकीस ठेवलेल्या धान्याचा नमुना पोत्यातून काढणे ः

१) धान्याचा नमुना परखी किंवा बॅग ट्रायरच्या आधारे चारही बाजूंनी नागमोडी पद्धतीने निरनिराळ्या ठिकाणच्या साठ्यातून काढावयाचा आहे.

२) धान्याचा नमुना हा काही पोत्यातून काढायचा आहे, तसेच काही पोत्यांची शिवण उसवून नमुना काढायचा आहे.

३) धान्याचा नमुना निरनिराळ्या पोत्यातून काढून तो चांगल्या दर्जाचा आहे की नाही हे तपासून घ्यावे.

४) धान्याचा नमुना काढल्यानंतर तो पूर्णपणे मिसळून घ्यावा, आणि तो तपासण्यासाठी त्यातून विहित वजनाचा नमुना काढण्यासाठी सँपल डिव्हायडरचा वापर करावा. किती पोत्याचा नमुना घ्यावा, हे थप्पीत एकूण उपलब्ध पोत्यांप्रमाणे ठरवावे.

५) हळद, मिरची, चिंच, गूळ इत्यादी पदार्थांचा नमुना निरनिराळ्या भागातून पोत्यांची शिवण उसवून काढता येतो.

सायलो, बीन्स व मोठ्या प्रमाणात मोकळा असलेल्या गोदामांतील शेतीमालाचा नमुना काढणे

१) गोदामातील साठा हा एका नमुन्याचा आहे की नाही याची खात्री करणे.

२) जेथे शेतीमालाचा मोठा पाला (खराब, चांगला शेतीमाल विशिष्ट प्रमाणात एकत्र करणे) होत असेल तेथे हात घालून नमुना काढून घ्यायचा असतो.

३) मोठ्या प्रमाणावर धान्याचा ढीग असेल, तर बॅग ट्रायरचा वापर करून नमुना काढता येतो.

४) असा नमुना ढिगाच्या वेगवेगळ्या भागातून व वेगवेगळ्या खोलीतून काढायचा असतो.

५) असा काढलेला नमुना व्यवस्थित एकत्र केला जातो. तो सँपल डिव्हायडरने २० ग्रॅम किंवा ५० ग्रॅमपर्यंत घेता येतो.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०, (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT