Vermicompost Agrowon
ॲग्रो गाईड

Vermicompost Production : शाश्‍वत शेतीसाठी गांडूळ खत उत्पादन

शेतीमध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खते वापरली जात असली तरी त्यात गांडूळ खत हे लवकर तयार होणारे व उत्कृष्ट खत म्हणून ओळखले जाते. गांडूळ हा जमिनीमध्ये राहणारा आणि सातत्याने माती खालीवर करत राहणारा जीव आहे.

टीम ॲग्रोवन

डॉ. अशोक डंबाळे, वैभव लिपने

शेतीमध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खते (Organic Fertilizer) वापरली जात असली तरी त्यात गांडूळ खत (Vermicompost) हे लवकर तयार होणारे व उत्कृष्ट खत म्हणून ओळखले जाते. गांडूळ (Earth Worm) हा जमिनीमध्ये राहणारा आणि सातत्याने माती खालीवर करत राहणारा जीव आहे. या दरम्यान तो प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ व काही प्रमाणात माती खातो. त्यातील शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असा सुमारे १० टक्के भाग सोडून उर्वरित ९० टक्के भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकला जातो.

त्यालाच गांडूळ खत (इंग्रजीमध्ये वर्मी कंपोस्ट) असे म्हणतात. त्याच्या सेंद्रिय पदार्थाच्या पचनक्रियेला साधारणपणे २४ तासाचा कालावधी लागतो. त्याच्या पचनक्रियेदरम्यान त्यात वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक अशी अन्नद्रव्य, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू मिसळले जातात. अशा प्रकारे तयार झालेल्या गांडूळ खताचा पिकासाठी वापर केल्यास पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच उपयुक्त जिवाणूंमुळे जमिनीचे जैविक गुणधर्म वाढतात.

गांडूळ खतनिर्मितीसाठी गांडुळाच्या योग्य जाती

गांडुळाच्या ३०० हून अधिक योग्य जाती आहेत. त्यातील प्रामुख्याने आयसेनिया फेटिडा, युड्रीलस युजेनिई, फेरेटीमा इलोंगेटा या गांडुळाच्या योग्य जाती आहेत. या जातीची वाढ सेंद्रिय पदार्थांमध्ये चांगली होते. कंपोस्टिंग प्रक्रिया वेगाने (वातावरणानुसार ४५ ते ६० दिवसांत) होते.

जीवनक्रम

गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था, आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. वाढीच्या या सर्व अवस्थांमध्ये ओलसर जमीन आवश्यक असते.

पूर्ण वाढ झालेल्या गांडुळामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन्ही जननांग असतात.

गांडूळ प्रत्येक ६ ते ७ दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यांमध्ये २ ते २० गर्भ असतात.

अंडी अवस्था हवामानानुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळांची अपूर्णावस्था २ ते ३ महिन्यांची असते. त्यांना प्रौढावस्था प्राप्त होताना त्यांच्या तोंडाकडील २ ते ३ सें. मी. अंतरावरील अर्धा सें. मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडुळाचे लक्षण होय.

सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षांचे असते.

आयसेनिया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें. मी. असते. एका किलोमध्ये पूर्ण वाढ झालेली साधारण एक हजार गांडुळे बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.

गांडुळांच्या खाद्याची सोय

हौदाच्या तळाशी ८ ते ९ सें. मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर ८ ते ९ सें. मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. गांडुळे सोडण्यापूर्वी हे सर्व थर १५ ते २० दिवस कुजू द्यावेत. गांडूळ खताच्या बेडमधून पाण्याचा निचरा होण्यासाठी तोटी किंवा जाळी केलेली असावी. तिथे खड्डा करून गांडूळपाणी (वर्मिवॉश) जमा करण्यासाठी डबा किंवा भांडे लावता येईल, अशी सोय करावी.

गांडूळ खत वेगळे करणे

खतांचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाल्यानंतर तयार झालेल्या गांडूळ खताचे बेडवरच लहान लहान ढीग करावेत. त्यामुळे त्यातील गांडुळे खाली जातात. वरील खत हलक्या हाताने एखाद्या गोणपाटावर घ्यावे. पुन्हा गांडूळ खताचे छोटे छोटे ढीग करावेत आणि एखाद दिवसानंतर खत काढून घ्यावे.

अशा प्रकारे वरील दोन थर हलक्या हाताने काढल्यानंतर शेवटच्या थरामध्ये अद्याप न कुजलेले काही घटक असल्यास त्यावर आणखी सेंद्रिय पदार्थ, शेणखत टाकून खताचे बेड सुरू ठेवावे. काढलेल्या खतामध्ये काही चुकून आलेली मोठी गांडुळे पुन्हा बेडमध्ये सोडावीत. खत काढण्यासाठी टिकाव, खुरपे अशा साधनांचा अजिबात वापर करू नये. हाताळणी करतानाही नाजूक गांडुळाला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. या गांडूळ खतामध्ये गांडुळांची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. निरनिराळ्या पिकांसाठी हे खत हेक्टरी ५ टन प्रति वर्ष या प्रमाणात टाकावे.

फायदे

गांडूळ खताचा शेतामध्ये सातत्याने वापर केल्यास पुढील फायदे दिसतात.

 जमिनीचा पोत सुधारतो.

 मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.

 जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

 जमिनीची धूप कमी होते.

 बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.

 जमिनीचा सामू योग्य प्रमाणात राखला जातो.

 गांडूळ खतामध्ये ह्यूमसचे प्रमाण भरपूर असते. त्यातील व अन्य नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य आणि गंधक, मंगल, जस्त, तांबे, लोह अशी अन्य सूक्ष्मद्रव्ये झाडांना त्वरित उपलब्ध होतात. मुळात शेणखतामध्ये ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

 जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्येत भरमसाट वाढ होते. पीक अवशेष आणि ओला कचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येते.

 या खतामुळे मातीतील सूक्ष्म जिवांची संख्येत वाढ होते. मातीचा कस टिकून राहतो. जमिनीची सुपीकता वाढते.

गांडुळाचे प्रकार

एपिजिक ः ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नांपैकी ८० टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर २० टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. तसे त्यांचा आकारसुद्धा लहान असतो.

अँनेसिक ः ही गांडुळे साधारणतः जमिनीत दोन मीटर खोलीपर्यंत राहतात. ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो. ही गांडुळे जरी जरी २ मीटर खोलीपर्यंत राहत असली तरी ते त्यांचे अन्न मिळवण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागावर येतात.

एंडोजिक ः ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो. रंग फिकट असतो. प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात.

शेतीमध्ये वरून देण्यासाठी गांडुळ खत तयार करण्याच्या उद्देशाने एपिजिक व अँनेसिक या जातीची गांडुळे वापरली जातात.

गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

गांडूळ खत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.

शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे प्रमाण ३:१ असावे.

गांडुळे सोडण्यापूर्वी हे सर्व १५ ते २० दिवस कुजवावे. गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.

गांडूळ खताच्या बेडमधून होणारा पाण्याचा निचरा एक डब्यामध्ये साठू द्यावा. दोन ते तीन वेळा तो पुन्हा शिंपडून गांडूळ खताच्या बेडवर टाकावा. या पाण्याचा रंग लालसर झाल्यानंतर ते गांडूळपाणी म्हणून वेगळे काढावे. योग्य प्रमाणात द्रावण तयार केल्यानंतर हे गांडूळपाणी त्वरित पिकांसाठी वापरावे. हे द्रावण फवारणी आणि मुळांद्वारे देता येते.

- डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४, (सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, सेलू)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT