Crop Protection Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : सूत्रकृमी ओळख, नुकसान अन् उपाययोजना

सूत्रकृमीची ओळख, नुकसानीचा प्रकार याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून नियंत्रणासाठी योग्य उपायांचा अवलंब करता येईल.

टीम ॲग्रोवन

डॉ. पल्लवी पाळंदे, डॉ. चिदानंद पाटील

मागील काही वर्षांत विविध फळबागा (Orchard) आणि पिकांमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव (Thread worm Outbreak On Crop) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सूत्रकृमी हे अतिसूक्ष्म धाग्यासारखा लांबट सूक्ष्मजीव आहे. त्यांची सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मिमी असून, उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. सूत्रकृमी जमिनीत किंवा वनस्पतींच्या अंतर्गत भागात राहून पिकांचे नुकसान (Crop Damage) करतात.

पिकांमध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या सूत्रकृमींचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. त्यात मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी, लिंबूवर्गीय पिकांवरील सूत्रकृमी, रॅडोफोलस आणि मूत्रपिंडीय सूत्रकृमी यांचा समावेश होतो. उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी, लिंबूवर्गीय फळझाडे आणि केळी पिकामध्ये लिंबूवर्गीय पिकांवरील सूत्रकृमी व रॅडोफोलस सूत्रकृमी आणि भाजीपाला, द्राक्षे, कडधान्ये आदी पिकांमध्ये मूत्रपिंडीय सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून येतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच योग्य उपाययोजनांचा अवलंब करणे फायदेशीर ठरते.

१) मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) :

ओळख ः

- मादी चंबूच्या आकाराची असून ०.५ ते ०.७२ मिमी लांब व ०.३३ ते ०.५२ मिमी रुंद असते. ती मुळांच्या आंतरभागात राहून तोंडातील सुईसारख्या अतिसूक्ष्म तीक्ष्ण अवयवाच्या साह्याने मुळांतील अन्नरस शोषून घेते.

- नर आकाराने लांबट दोऱ्यासारखे आणि १.१० ते १.१५ मिमी लांब असतात. नर सूत्रकृमी पिकांचे नुकसान करत नाहीत. नरांचा जीवन कालावधी मादीपेक्षा फारच कमी असून, ते प्रजोत्पादनाचे काम झाल्यानंतर लगेच मरतात.

जीवनक्रम ः

- मादी मुळांवर पुंजक्यामध्ये साधारणपणे २०० ते २५० अंडी तर काही वेळा सुमारे ५०० पर्यंत अंडी घातल्याचे दिसून आले आहे.

- अंड्यांतून २ ते ३ दिवसांत बाहेर येणारी अळी लहान मुळांत शिरून रस शोषण करू लागते.

- साधारणपणे २२ ते २५ दिवसांत चार वेळा कात टाकून कृमींचा जीवनक्रम पूर्ण होतो. जीवनक्रमाचा काळ हा जमिनीतील ओलावा, उष्णता व पिकांवर अवलंबून असतो.

- कृमींच्या वाढीसाठी २५ अंश सेल्सिअस तापमान व ६० ते ७५ टक्के आर्द्रता पोषक ठरते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सूत्रकृमींच्या अंडी किंवा अळी अवस्था बराच काळ सुप्तावस्थेत राहतात.

पिके ः

टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरची, वाटाणा इ. फळभाज्या तसेच कारली, भोपळा, घोसाळी, दोडके इत्यादी वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये प्रादुर्भाव दिसतो. यासह द्राक्षे, डाळिंब, पपई, अंजीर, पेरू इत्यादी फळझाडे आणि बटाटे, तंबाखू, गाजर व इतर कडधान्य पिके या सूत्रकृमींना बळी पडतात. टोमॅटो, वांगी, कारले, द्राक्षे, हरभरा, तूर, मूग आणि चवळी या पिकांच्या उत्पादनात मोठी घट येते.

नुकसानीचा प्रकार ः

- मादी सूत्रकृमी सुईसारख्या अतिसूक्ष्म व तीक्ष्ण अवयवाने मुळांतील अन्नरस शोषून घेतात. अन्नरस शोषताना सूत्रकृमी त्यांच्या पोटातील पाचक रस मुळांमध्ये सोडतात. त्यामुळे मुळांतील पेशीभित्तीका विरघळून अनेक केंद्रके असणारी मोठी पेशी निर्माण होते. ही पेशी वाढून त्यापासून अनेक मोठ्या पेशी तयार होतात व मुळांवर गाठी तयार झाल्याप्रमाणे दिसते. त्यामुळे मुळांच्या पाणी आणि अन्न शोषून क्रियेवर परिणाम होतो.

- झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, अकाली फळगळ होते.

- सूत्रकृमींनी इजा केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. परिणामी झाड मरते.

नियंत्रणाचे उपाय ः

- नियंत्रणासाठी सूत्रकृमी नाशकांचा वापर हा अति खर्चिक व अवघड आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब फायद्याचा ठरतो.

- सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे एकदल पिकांपेक्षा द्विदल पिके जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यासाठी पिकांची फेरपालट करावी. द्विदल पिकानंतर एकदल पिके घ्यावीत.

- सूत्रकृमीग्रस्त पिकांमध्ये झेंडूसारखे मिश्रपीक घ्यावे किंवा संपूर्ण शेतामध्ये झेंडूची लागवड करून नंतर दुसरे पीक घ्यावे.

- गादी वाफ्यात सूत्रकृमी नियंत्रण करणे किफायतशीर ठरते. त्यासाठी प्रतिलिटर पाण्यात

फ्युओपायरम ०.३ मिलि १ ग्रॅम याप्रमाणे वाफ्यात वापर करावा. एक महिन्यानंतर दुसरा हप्ता द्यावा.

- पीक लागवडीच्या २-३ आठवडे आधी निंबोळी पेंड हेक्टरी दीड ते दोन टन प्रमाणे जमिनीत मिसळावी.

- फळबागांमध्ये बहर धरताना किंवा छाटणी करतेवेळी निंबोळी पेंड द्यावी. निंबोळी पेंड कुजून त्यातून कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि फिनॉलिक संयुगे बाहेर पडतात. या संयुगांमुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होऊन जमिनीचा पोत सुधारतो.

२) लिंबूवर्गीय पिकावरील सूत्रकृमी (सीट्रस निमॅटोड) ः

या सूत्रकृमी सर्व लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये नुकसान करतात.

ओळख ः

- पूर्ण वाढ झालेली मादी आकाराने काजूच्या बीसारखी दिसते. मादी मुळांमध्ये मान खुपसून रस शोषून घेते.

- मादी ०.२५ ते ०.३६८ मिमी आणि नर ०.३०६ ते ०.४०१ मिमी लांब दोऱ्यासारखा असतो.

जीवनक्रम ः

- मादी सरासरी ९० ते १०० अंडी चिकट पदार्थांच्या वेष्टणात पुंजक्याने घालते.

- नर आणि मादी अळ्यांची वाढ चार अवस्थांमध्ये पूर्ण होते. पहिली अवस्था अंड्यातच पूर्ण होते. पहिल्या अवस्थेतील अळ्यांच्या कातीमध्ये (मोल्ट) तोंडातील सुईसारखा सूक्ष्म आणि तीक्ष्ण अवयव नसतो.

- नर आणि मादीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास अनुक्रमे १६ आणि ४८ ते ५२ दिवसांचा कालावधी लागतो.

नुकसानीचा प्रकार ः

- या सूत्रकृमीचा प्रादुर्भाव डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात जास्त दिसून येतो. दुसऱ्या अवस्थेतील मादी अळी अधिक उपद्रवी असते.

- अळी सुईसारख्या तीक्ष्ण अवयवाने मुळांवरील सालीला जखमा करते. मुळांच्या आंतर भागातील रस शोषताना पोटातील विशिष्ट पाचक रस मुळांमध्ये सोडते. त्यामुळे तेथील पेशी मरतात. ही मुळे तपकिरी काळसर पडतात. मुळांच्या अन्नशोषण कार्यात अडथळा येऊन झाडाची वाढ खुंटते. नंतर पाने पिवळी पडून गळतात. अन्न शोषण करणाऱ्या मुळांची लांबी आणि प्रमाण कमी होते. फळांचा आकार लहान होऊन ती पक्व होण्यापूर्वी गळतात.

- सूत्रकृमींनी केलेल्या जखमेवर बुरशी किंवा विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे लिंबूवर्गीय वनस्पती शेंड्याकडून खोडाकडे सुकत जातात, यालाच ‘आरोह’ (सीट्रस डायबॅक) असे म्हणतात. आरोह बऱ्याच कारणांमुळे होतो, त्यापैकी लिंबूवर्गीय सूत्रकृमींच्या प्रादुर्भाव हे एक प्रमुख कारण आहे.

नियंत्रणाचे उपाय ः

- नवीन रोपवाटिका ही जुन्या लिंबूवर्गीय फळबागेपासून दूर अंतरावर असावी. लागवडीसाठी शक्यतो संपूर्ण निर्जंतुकीकरण केलेल्या रोपवाटिकेतील रोपे वापरावीत.

- लागवडीपूर्वी रोपांची मुळे ४५ अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात ४५ मिनिटे बुडवावीत.

- रोपवाटिकेमध्ये शिफारस केलेले दाणेदार कीटकनाशक शिफारस केलेल्या मात्रेमध्ये

वापरावे.

- या सूत्रकृमींचा प्रादुर्भाव लिंबूवर्गीय फळबागांमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात जास्त असतो. त्याकरिता नोव्हेंबरच्या शेवटी निंबोळी पेंड ३ किलो प्रतिझाड प्रमाणे द्यावी.

- सूत्रकृमीग्रस्त बागेतील वाफ्यांमध्ये झेंडूचे (फ्रेंच झेंडू) मिश्रपीक घ्यावे.

---------------------------

उत्तरार्ध उद्याच्या अंकात.

- डॉ. पल्लवी पाळंदे, (सहायक प्राध्यापक)

- डॉ. चिदानंद पाटील, (प्रमुख कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT