Soil Fertility
Soil Fertility Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Fertility : प्रकारानुसार ठरते जमिनीची सुपीकता

डॉ. पपिता गौरखेडे

महाराष्ट्रातील काळ्या जमिनी (Black Soil Land) बेसॉल्ट या काळ्या खडकापासून तयार झालेल्या आहेत. बेसॉल्ट खडकामध्ये (Basalt Rock) कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पालाश, लोह आणि क्लोराईड मूलद्रव्ये असलेली खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जमिनीमध्ये वरील मूलद्रव्यांचे प्रमाण भरपूर आहे. बेसॉल्ट खडकातील खनिजे अल्कलीधर्मी असल्यामुळे येथील जमिनीचा सामू (Soil) सातच्या वर असतो.

हा खडक अत्यंत लहान कणांनी तयार झालेला असल्यामुळे काळ्या मातीमध्ये चिकण मातीच्या कणांचे प्रमाण जास्त (सरासरी ३० टक्क्यांपेक्षा) आढळते. म्हणून या जमिनी भिजल्यानंतर चिकट होतात. त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि रंगाने त्या काळ्या किंवा गर्द तपकिरी दिसतात. कुजलेले सेंद्रिय पदार्थ, टिटॅनियम आणि लोह यांच्या संयुगाने मातीला गर्द रंग प्राप्त होतो. जमिनीची खोली वेगवेगळी असते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गुणधर्माची मृदा (माती) आढळते.

महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार

काळी जमीन : महाराष्ट्रातील बहुतांशी प्रदेश अशा प्रकारच्या जमिनीने व्यापलेला आहे. या जमिनी बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांपासून निर्माण झालेल्या आहेत. रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग वगळता सर्व जिल्ह्यांत आढळतात. मुख्यत्वे या कमी पावसाच्या प्रदेशात तयार होतात. जमिनीतील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पालाश या विद्राव्य क्षारांचा कमी पाऊस व कोरडे हवामान यामुळे ऱ्हास होत नाही. त्यामुळे या जमिनी तुलनात्मकदृष्ट्या इतर जमिनीपेक्षा सुपीक असतात.

जमिनीचे महत्त्वाचे गुणधर्म

जमिनी विम्लधर्मी आहेत. चुन्याचे प्रमाण जास्त असते.

जमिनीमध्ये नत्राचे प्रमाणे कमी स्फुरद कमी ते मध्यम तर पालाशचे प्रमाण मध्यम ते अधिक असते.

जमिनी चिकणमातीच्या असून चिकण कणांचे प्रमाण ३० ते ६० टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक असते.

सच्छिद्रता ४० ते ६० टक्के इतकी असते. सामू ७.२ ते ८.५ इतका असतो. तसेच कॅटायन विनिमय क्षमता ५० मिलि इक्विवॅलंट प्रती १०० ग्रॅम माती इतकी असते.

जमिनीचा रंग हा गडद काळा ते करडा असतो. काळ रंग हा ह्यूमस आणि टिटॅनीफेरस मॅग्नेटाईट या द्रव्यांमुळे येतो.

खोलीनुसार काळ्या जमिनीचे प्रकार

उथळ काळी जमीन : या जमिनीचा रंग फिक्कट किंवा करडा काळा असतो. या जमिनीची खोली साधारणपणे ३० सेंमी इतकी असते. तुलनात्मकदृष्ट्या या जमिनी कमी सुपीक असतात.

मध्यम काळी जमीन : या उथळ काळ्या जमिनीपेक्षा जास्त चिकणवटीच्या असतात. जमिनीची खोली एक मिटर पर्यंत असते. जमिनीचा काळा रंग खालच्या थरात फिक्कट होतो. या मध्ये फक्त कॅल्शिअमचे प्रमाणे ६० ते ८० टक्के इतके असते. जमिनीस पाणी दिल्यानंतर हाताने दाबल्यास घट्ट गोळा होतो. पण हाच गोळा फेकल्यानंतर त्याचे कण कण वेगवेगळे विखरून पडतात. जमिनी चांगल्या सुपीक असतात.

खोल काळी जमीन: तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या किनारी गाळाच्या जमिनीवर या विकसित होतात. या जमिनी सपाट भागात आढळतात. या जमिनी अधिक सुपीक असतात. या जमिनीची खोली १ मीटरपेक्षा अधिक असते.

लाल माती:

महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील ठाणे, रायगड, पुण्याचा पश्चिम भाग व पूर्वेकडील चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात या जमिनी आढळतात.

जमिनी ग्रॅनाईट या खडकांपासून तयार होतात.

सामू थोडासा आम्लधर्मीय असतो.

खरीप हंगामात भात, तर रब्बी हंगामात ज्वारी, कडधान्ये पिके या जमिनीत चांगली येतात.

जमिनीत लोह संयुगाचे प्रमाण जास्त असल्याने तिला लाल रंग येतो.

या जमिनी कमी सुपीक असतात.

जांभा जमीन

जमिनी जास्त पावसाच्या व घनदाट जंगले असलेल्या भागात तयार होतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचा दक्षिण भाग तसेच सातारा, सांगली, नाशिक व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील भागात हा प्रकार दिसतो.

जमिनीत चुना, सिलिका यांचे प्रमाण कमी असते, परंतु लोह, अॅल्युमिनियम या क्षारांचे प्रमाण अधिक असते.

जमिनी आम्लधर्मी गुणधर्माच्या असतात. जमिनीचा सामू ५ ते ६ इतका असतो.

जमिनीची पाणी धारण क्षमता कमी असते. तसेच जमिनीचा पोत पोयटा या वर्गात मोडतो.

केओलीनाईट हे खनिज अधिक असते.

जांभा जमिनीचे प्रकार

भाताची जांभा जमीन : या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. या सखल भागात आढळतात. या जमिनीत भात पीक उत्तम येते.

वरकस जांभा जमीन : डोंगर उतारावरील जांभा जमीन या प्रकारात मोडते. या जमिनी उथळ असतात. पोत खडबडीत असतो. जमिनीचा रंग पिवळसर लाल असतो.

गार्डन जमीन : या जमिनी हलक्या मशागत करण्यास सोप्या पिवळसर ते तपकिरी रंगाच्या असतात. या जमिनीत प्रामुख्याने नारळ, सुपारी ही फळ वर्गीय पिके उत्तम येतात.

- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT