Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture Technology : कृषी तंत्रज्ञान प्रसार, जैवविविधता संवर्धनात ‘स्नेहसिंधु‘ अग्रेसर

Team Agrowon

संदीप राणे

निसर्गसंपदा, जैवविविधता, सागरी किनारा आणि जगाच्या नकाशात नोंदणी झालेला अतिसंवेदनशील पश्चिम घाटाचा भाग अशा विविधतेने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा विविध पिके आणि फळबागांनी (Fruit Orchard) समृद्ध आहे.

या जिल्ह्यातील पर्यावरण, जैवविविधतेच्या संवर्धनासोबत पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील पदवीधरांनी एकत्र येऊन १२ ऑगस्ट २००६ रोजी ‘स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

विविध पिकांचे क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या व्यापक उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. सध्या हेमंत सावंत संस्थेचे अध्यक्ष असून डॉ.योगेश परुळेकर उपाध्यक्ष आणि डी.आर.परब सचिव म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे २८० कृषी पदवीधर सभासद आहेत.

कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असले तरी पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थेने काम सुरु आहे. प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, प्रदर्शने, शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद इत्यादींच्या माध्यमातून संस्था सोळा वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे.

सिंधुदुर्गातील फलोत्पादन विकासाची संधी लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाला शासनस्तरावर मंजुरी मिळवून देण्याच्या प्रक्रियेत संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे.

कृषी तंत्रज्ञान प्रसार

कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी २००६ पासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थेतर्फे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

कोकण विभागातील हवामानाच्या बदलत्या परिस्थितीत लागवड करता येणाऱ्या फळपिकांच्या विविधतेबद्दल जागरूकता तसेच आंबा, काजू, नारळ, मसाले तसेच भाजीपाला पिकासंबंधी विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतात.

देशी गोवंश संवर्धन

संस्थेच्या माध्यमातून स्थानिक देशी गोवंशाचे संवर्धन आणि शेण,गोमूत्राचे मूल्यवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्यात येते.

या उपक्रमाच्या माध्यमातून कणेरी मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्वर महाराज, चेन्नई येथील पंचगव्य चिकित्सा केंद्राचे प्रमुख निरंजन वर्मा आणि निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख विलास घाग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

रानभाज्यांचा प्रचार आणि प्रसार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे साठहून अधिक हंगामी आणि बारमाही रानभाज्या आढळतात. या दुर्मिळ रानभाज्यांचे संवर्धन आणि वापराविषयी संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून प्रदर्शन,पाककृती स्पर्धा आयोजित केली जाते.

यावर्षी ७ ऑगस्ट रोजी कणकवली महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेता अनिल गवस उपस्थित होते.

रानभाज्यांची संपूर्ण माहिती, औषधी उपयोग आणि काही पाककृतींची माहिती पुस्तक रूपात डॉ.बाळकृष्ण गावडे यांनी एकत्रित केली आहे. ‘स्नेहसिंधु‘च्या रानभाज्या संकल्पनेस महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात राबवून सन्मान केला आहे.

ग्रामीण युवकांना मार्गदर्शन

ग्रामीण भागातील युवकांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची ओळख तसेच पूरक उद्योगात आवड वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रातील करियरच्या संधींबद्दल संस्थेने विज्ञानभारतीच्या संयुक्त सहकार्याने ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले होते. या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील तरुणांचे शहराकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होत आहे.

खासगी तसेच सरकारी अनुदानित कृषी प्रकल्पांमध्ये कृषी पदवीधरांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी संस्था प्लेसमेंट एजन्सीचे काम करते.

संस्थेने दोनशेहून अधिक कृषी पदवीधरांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन मिशनद्वारे अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत राज्य कृषी विभागाला प्रादेशिक सल्लागार उपलब्ध करून दिले आहेत.

गावठी बाजाराला चालना

सेंद्रिय, गावठी शेतीमाल शहरातील लोकांसाठी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळण्यासाठी संस्थेने ‘गावठी बाजार' ही संकल्पना कणकवली तालुकास्तरावर राबविली. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री साखळी तयार केली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सहकार्याने तीन तालुक्यांमध्ये याचा विस्तार झाला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाशी चर्चा

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पीक विमा योजना पहिल्यांदा कोकणात कार्यान्वित करण्याचे काम संस्थेने केले आहे.

याबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची नवीन योजना मिळवून देण्यासाठी स्नेहसिंधु पाठपुरावा करत आहे. संस्था शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सातत्याने शासनदरबारी मांडत असते.

भरडधान्य लागवडीसाठी पुढाकार

१) ऑक्टोबर २०२२ पासून भरडधान्याचे गावठी बियाणे संकलन, धान्याचा आहारात वापर वाढविण्यासाठी लोकांमध्ये जागृती.

२) यावर्षी विविध भरडधान्यांची माहिती देणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

३) कृषी विभाग, जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भरड धान्याच्या विविध जातींच्या बीजोत्पादनास चालना. शेतकऱ्यांना बियाणे वाटप.

४) भरडधान्यांच्या पाककृतींचा प्रसार आणि आहारात वापर. तालुका स्तरावर चर्चासत्र, प्रदर्शन आणि प्रशिक्षण. कार्यक्रमात वरी आणि नाचणीची इडली हा अल्पोपाहार. माघी गणेशोत्सवानिमित्त नाचणीच्या मोदकाचा प्रसाद. हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून वरी बियाणे पाकिटांचे वाटप.

५) भरड धान्य वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पाच हजार शेतकऱ्यांना भरडधान्य बियाणे वाटपाचे नियोजन. जिल्हा पातळीवर २०० प्रात्यक्षिकांचे आयोजन.

१) पाणथळ जागांचे सर्वेक्षण : संस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणथळ जागांचे सर्वेक्षण करण्यामध्ये सहभाग. यामुळे पाण्याची पातळी राखण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक जलसाठ्यांचे संवर्धन. हा उपक्रम राबविणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा. संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५७ पाणथळ जागांचे सर्वेक्षण पूर्ण.

२) जैवविविधतेची नोंद : ग्रामस्तरावर जैवविविधता नोंदवही विकसित करण्यासाठी संस्थेचा पुढाकार. संस्थेतर्फे जिल्ह्यातील १३० गावांतील जैविविधतेची नोंद. याचा अहवाल जैवविविधता महामंडळास सादर.

३) कृषी पर्यटन : ग्रामीण रोजगारातील संधी लक्षात घेऊन संस्थेतर्फे कृषी पर्यटनाला चालना. खवणे, पागेरेवाडी येथे पर्यटकांची राहण्याची व्यवस्था करून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती.

४) वनीकरणाला चालना : कणकवली शहराजवळ असलेले ४०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड रस्ता रुंदीकरणाच्यावेळी तोडण्यात आले. त्या झाडाच्या फांद्यांपासून रोपवाटिकेत रोपेनिर्मिती. कणकवली शहराजवळून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने संस्थेतर्फे या रोपांची लागवड.

‘स्नेहसिंधु‘चा गौरव

१) रोटरी क्लब, जिल्हा परिषदेकडून विशेष पुरस्कार.

२) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे ‘आबासाहेब कुबल' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार.

संपर्क : हेमंत सावंत (अध्यक्ष), ९४२१२६७३४०, डी.आर.परब (सचिव), ९३०७८७२३२८, (लेखिका स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्या सदस्या आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT