औरंगाबाद ः सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात (Sakal Agrowon Agriculture Exhibition) रविवारी (ता.१५) सलग तिसऱ्या दिवशीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत होते. शेतीविषयक नावीन्यपूर्ण माहिती, ज्ञान, तंत्रज्ञानाकडे (Agriculture Technology) शेतकऱ्यांच्या सर्वाधिक नजरा राहिल्या.
प्रदर्शनातील विविध स्टॅाल्सवर फिरून शेतकरी त्यासंबंधीची माहिती आणि त्याची पत्रके घेत होते. कृषी निविष्ठा, बी-बियाणे, सिंचन सुविधेसह सेंद्रिय शेती (Organic Farming) ते हायटेक शेतीसंबंधीची माहिती खूपच फायदेशीर ठरल्याचे शेतकरी आवर्जून सांगत होते.
कृषी प्रदर्शनात गांडूळखताची माहिती चांगल्या पद्धतीने मिळाली. सेंद्रिय उत्पादनेही पाहायला मिळाली. सिंचन सुविधा आणि बी-बियाण्यांची माहिती घेतली. खूपच छान अनुभव राहिला. शेतकऱ्यांना उपयुक्त आणि फायदेशीर असे हे प्रदर्शन आहे.
- रमेश वलांडे, बोरगाव अर्ज, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद
सिंचन सुविधातील हायटेक तंत्रज्ञान आम्हाला मिळाले. त्याशिवाय शेततळे, पाण्यातील क्षारावरील उपायाचे तंत्रज्ञान पाहायला मिळाले. त्याशिवाय सेंद्रिय शेतीसाठीची माहितीही मिळाली. एकूणच प्रदर्शनातून हवी ती माहिती अगदी नेमकेपणाने मिळाली.
-रमाकांत गोटे, कोक, ता. जिंतूर, जि. परभणी
प्रदर्शनातील ट्रॅक्टरचलित अवजारे मला अधिक भावली. त्यातही रोटाव्हेटर आणि हैड्रॉलिक नांगर ही यंत्रे मला सर्वाधिक फायदेशीर वाटली. शेतकऱ्यांनी त्याचा वापर वाढवण्याची गरज आहे. सध्या मजुराच्या समस्येवर ही यंत्रे फायदेशीर आहेत. प्रदर्शनात या अवजारांसाठी खास सवलत ठेवली आहे. त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
-भगवान वाघ, जडगाव, जि. औरंगाबाद
माझी धाड गावात शेती आहे. सध्या शेती करत नाही, पण करण्याचा विचार आहे. त्यासाठी प्रदर्शन पाहायला आलो आहे. मला ट्रॅक्टरचलित अवजारे, सिंचनविषयक सुविधा, पीकवाण, पशुधनविषयक साहित्य मला भावले.
- उदय कुलकर्णी, धाड, ता. जि. बुलडाणा
सेंद्रिय शेती, ट्रॅक्टरचलित अवजारे, बी-बियाण्यांतील नवीन वाणाची माहिती मिळाली. पण कृषी निविष्ठा आणि सिंचनातील विविध प्रकारही मला फायद्याचे वाटले. कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी पाहण्यासारखेच आहे.
- ज्ञानोबा गणपत राक, पारधे बाभळगाव, ता. जि. परभणी
‘अॅग्रोवन’ने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी माहितीचे खऱ्या अर्थाने भांडार आहे. माझी शेती असून या ठिकाणी विविध प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्रांची माहिती, बी-बियाणे, कीटकनाशके, यांत्रिकीकरणाची माहिती घेतली. या ज्ञानाचा निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
- डॉ. गणेश डोंगरे, प्राचार्य, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, औरंगाबाद
मी बारा एकर शेती करतो. सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांसह हळदीचे उत्पादन काढतो. वाशीम जिल्ह्यातून खास करून हे प्रदर्शन पाहण्यासाठी औरंगाबादला आलो होतो. या ठिकाणी बियाणे, अवजारे, नवनवीन शेती पद्धती, वृक्ष, रोपांची माहिती मिळाली. अतिशय चांगल्या प्रकारचा हा कृषी प्रदर्शनाचा अनुभव होता.
- मधुसूदन कांबळे, ता. रिसोड, जि. वाशीम
आम्ही संपूर्ण परिवार श्रीरामपूर येथून हे प्रदर्शन बघण्यासाठी आलो आहे. डेअरी उद्योग, शेतीला कुंपण झटका पद्धती, पशुखाद्य अशा विविधांगी स्वरूपाची माहिती घेतली. शेतीला लागणाऱ्या यंत्र-तंत्रांची इत्थंभूत माहिती मिळाली. मुलांनाही या प्रदर्शनात सर्व दालने दाखवत शेतीमातीची माहिती करून दिली. त्यांनाही खूप आनंद वाटला.
- योगेश जैन, श्रीरामपूर, जि. नगर
मी तीन एकर शेती करतो. प्रदर्शनात मी सिंचन साधनांची माहिती घेतली. शेततळ्यात टाकण्यासाठी प्लॅस्टिक ताडपत्रीबाबत चौकशी केली. कीटकनाशकांच्या स्टॉलवरून नवनवीन औषधांची माहिती मिळाली. मशागतीसाठी अत्याधुनिक यंत्रे या ठिकाणी दिसून आली.
-शेक अकील शेख सरोबर, लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद
मी २००५ पासून ‘अॅग्रोवन’चा वाचक आहे. प्रदर्शनाची माहिती मिळाल्यानंतर खास बीड जिल्ह्यातून येथे आलो. ‘अॅग्रोवन’ने नेहमीच शेतकरी हिताचा विचार करीत उपक्रम राबवले. हे प्रदर्शनही शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती देणारे ठिकाण ठरले.
- संपतराव पाटील, मनूर, ता. माजलगाव जि. बीड
‘सकाळ ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन पाहून आम्हाला आनंद झाला. मला ट्रॅक्टर पाहायचे होते. यंत्रसामग्री आम्हाला पाहायची होती. ट्रॅक्टर, बी बियाणे आणि तणनाशकांची माहिती घेतली. बऱ्याच स्टॉलवर खतांविषयी चांगली माहिती मिळाली.
- दत्तात्रेय जोगदंड, ता. शिरूर, जि. परभणी
‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनामध्ये भेट दिल्याने मला चांगली माहिती मिळाली. नवीन उपक्रम आणि आधुनिक शेतीविषयक माहिती मिळाली. यांत्रिकीकरणाच्या बाबतीत सुद्धा चांगली माहिती मिळाली.
- मधुकर देसाई, ता. चुडावा, परभणी
शेती करण्यासाठी सोप्या पद्धती आणि यंत्रे येथे बघण्यास मिळाल्या आहेत. बाजारात आम्ही गेल्यावर दुकानदार माहिती देतात. पण, ती त्रोटक असते तसेच किंमतदेखील योग्य नसतात. ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनात उत्तम माहिती व योग्य किंमत कळते.
- अशोक मारुतीराव कोंडे, मु. पो. तीडी पिंपळगाव, ता. शेलू, जि. परभणी
माझी खानदेशात चार एकर शेती आहे. पारंपरिक शेती करतो आहे. कापूस, मका, हरभरा, गहू अशी पिके आहेत. आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे प्रदर्शन आहे. नॅनो तंत्रज्ञानापर्यंत माहिती मिळाली. फवारणी तंत्रज्ञानाबाबत मला अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. कंपन्यांच्या तंत्रज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळत असल्यामुळे माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास प्रदर्शनाची मदत मिळणार आहे.
- विलास ठाणसिंग राजपूत, मु. पो. काळखेडा, ता. जामनेर, जि.जळगाव
शब्दात वर्णन करता येणार नाही, असे हे प्रदर्शन आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून या प्रदर्शनाची वाट पाहात होतो. सहकुटुंब मी प्रदर्शनाला आलो आहे. उच्च तंत्रज्ञानाची सर्वांत उत्तम माहिती देणारे हे प्रदर्शन आहे. ‘अॅग्रोवन’च्या या आधीच्या प्रदर्शनाला मी तीन दिवस भेट दिली. त्यामुळे शेतीमधील श्रम वाचले आणि आर्थिक लाभ मला झाला आहे.
- सुभाष केशव ठुबे, मु. पो. पोखरी, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद
येत्या दशकात शेती बदलणार असून, तंत्रज्ञानाचे युग येणार आहे. या युगाची माहिती करून देणारे, कोरडवाहू शेतीची उत्तम माहिती देणारे हे प्रदर्शन आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारे हे प्रदर्शन आहे. छोट्या शेतकऱ्यांना स्वयंचलित, यांत्रिक आणि नॅनो तंत्राच्या शेतीची माहिती देणारे हे प्रदर्शन आहे. गटशेतीवर मात्र अजून भर द्यायला हवा.
- अनिल भगवान दौड, मु.पो. पानवडोद खुर्द, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद
तळागाळातील शेतकऱ्यांना दिशादायक ठरणारे हे प्रदर्शन आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बाहेर जाऊन प्रदर्शन बघणे शक्य नसते. ‘अॅग्रोवन’मुळे आमच्या दारात प्रदर्शन आले. त्याचा आनंद होतो आहे. ‘अॅग्रोवन डिजिटल’च्या माध्यमातून आम्ही बाजारात उभे राहात आहोत. कृषी शेतमालाच्या बाजारपेठांबाबत प्रदर्शनामध्ये अजून माहिती हवी.
- धनंजय सोपान काकडे, मु. पो. खोपेश्वर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.