Grass Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Grass Cultivation : सकस चाऱ्यासाठी बहुवार्षिक गवतांची लागवड

बहुवार्षिक गवताच्या लागवडीमुळे हिरव्या चाऱ्याची वर्षभर टंचाई जाणवणार नाही. लागवड केल्यानंतर या पिकापासून कमीत कमी तीन ते चार वर्षे हिरवा चारा मिळतो. त्यामुळे पूर्वमशागतीवर होणारा खर्च एकदाच करावा लागेल. यातून खर्चातही बचत होईल.

टीम ॲग्रोवन

डॉ. एस. एस. कदम, डॉ. बी. एस. कातकडे

वर्षभर जनावरांना पौष्टिक हिरवा चारा (Animal Fodder) उपलब्ध व्हावा याकरिता संकरित नेपियर (Napier Grass) (फुले गुणवंत, डीएचएन ०६, बीएचएन १०) आणि गिनी गवत यासारख्या बहुवार्षिक गवताची लागवड (Grass Cultivation) करावी.

फुले गुणवंत संकरित नेपियर ः

१) महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या जातीच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.

२) जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ इतका असावा. याची लागवड वर्षभर कोणत्याही हंगामात करू शकतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत लागवड केल्यास सिंचनावरील खर्च कमी होऊ शकतो.

३) लागवड सरी वरंब्यावर ९० × ६० सेंटिमीटर अंतरावर करावी. हेक्टरी १८ ते २० हजार कांड्या / बेणे पुरेसे आहे.

४) पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर २.५ महिन्यांनी आणि नंतरच्या कापण्या ४५ ते ५० दिवसांच्या अंतराने कराव्यात. वर्षभरात सरासरी ६ ते ८ कापण्या मिळतात. त्यापासून सरासरी प्रति हेक्टरी १२५ ते १५० टन हिरवा चारा उपलब्ध होतो.

वैशिष्ट्ये ः

१. हिरवी गर्द रुंद लांब पाने व मऊ खोड.

२. पाच सहा फूट उंच वाढते.

३. एका कांडीला सरासरी २० ते २५ फुटवे फुटतात.

४. प्रथिनांचे प्रमाण ९ ते १० टक्के.

संपूर्णा (डीएचएन ०६) संकरित नेपियर ः

१) भारतीय चारा संशोधन केंद्राच्या धारवाड (कर्नाटक) येथील प्रादेशिक केंद्राने विकसित केलेल्या या जातीची लागवड सरी वरंबा तयार करून ६० × ६० सेंटिमीटर अंतरावर करावी.

२) पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम जमीन निवडावी. या पिकाची लागवड पाण्याची हमखास सुविधा असणाऱ्या भागात वर्षभर केव्हाही केली तरी चालेल. एक हेक्टर क्षेत्राकरिता २७,००० ते ३०,००० इतके बेणे / कांड्या आवश्यक आहेत.

३) पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या या ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. एकूण सहा ते आठ कापण्यांतून वर्षभरात सरासरी १५० ते १६० टन हेक्टरी हिरवा चारा उपलब्ध होतो.

वैशिष्ट्ये ः

१. या जातीचे खोड थोडे टणक असते. त्यामुळे जनावरांना खाऊ घालताना तो चाफ कटरच्या साह्याने कुट्टी करून घालावा

२. पाने हिरवीगर्द व लांब असतात.

३. प्रथिनाचे प्रमाण १०.५ ते ११ टक्के व गोडवा ८ ब्रिक्स असतो. त्यामुळे यापासून चांगला मुरघास तयार होतो.

बीएचएन १० संकरित नेपियर ः

१) बाएफ संस्थेने विकसित केलेली ही जात आहे. या पिकास पोयट्याची चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. या जातीची लागवड ही ठोंब किंवा कांड्या वापरून करावी. हेक्टरी १८ ते २० हजार काड्या लागतात.

२) लागवड सरी वरंब्यावर ९० × ६० सेंटिमीटर अंतरावर करावी. पिकाची पहिली कापणी ही लागवडीनंतर अडीच महिन्यांनंतर करावी. त्यानंतरच्या कापण्या या ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

३) सहा ते आठ कापण्यांपासून वर्षभरात प्रति हेक्टरी सरासरी १८० ते २०० टन हिरवा चारा उपलब्ध होतो.

वैशिष्ट्ये ः

१. सर्वसाधारण ६ ते ८ फूट उंच वाढते.

२. एका कांडीला फुटव्यांची संख्या ३० असते.

३. हिरवी गर्द रुंद व लांब पाने तसेच खोड मऊ व रसाळ असते.

४. प्रथिनांचे प्रमाण १० ते ११ टक्के असते.

संकरित नेपियरच्या वरील सर्व जातींकरिता लागवडीच्या वेळी हेक्टरी १० ते १५ टन शेणखत आणि २५: ५०: ५० किलो नत्र, स्फुरद व पालाश या पद्धतीने खताच्या मात्रा द्याव्यात. प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी २५ किलो नत्र खताची मात्रा द्यावी, त्यामुळे पिकास अधिक फुटवे फुटण्यास मदत होईल.

गिनी गवत

१) हे गवत भारी ते मध्यम, परंतु पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत उत्तम वाढते. गवताची लागवड सरी वरंब्यावर ९० × ६० सेंटीमीटर अंतरावर करावी. प्रति हेक्टर क्षेत्राकरिता १८ ते २० हजार ठोंब / कांड्या / बेणे पुरेसे आहे.

२) बुंदेल गिनी- १ व २ आणि हरीथा यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.

३) लागवड करताना प्रति हेक्टरी १० ते १२ टन शेणखत आणि ६० :३०; ३० किलो नत्र, स्फुरद व पालाश अनुक्रमे या खताच्या मात्रा लागवडीच्या वेळी द्याव्यात. प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी २५ -३० किलो नत्र खताची मात्रा द्यावी.

४) पहिली कापणी लागवडीनंतर २.५ महिन्यांनी आणि त्यानंतरच्या कापण्या ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. वर्षभरातील एकूण ६ ते ७ कापण्यांपासून सरासरी ८० ते ९० टन प्रति हेक्टरी हिरवा चारा उपलब्ध होतो.

वैशिष्ट्ये ः

१. पाला हिरवीगर्द आणि खोड मऊ व रसाळ असते.

२. हे गवत सावलीत देखील उत्तम वाढते. याकरिता उद्यान कुरण व वनकुरण पद्धतीत याची यशस्वीपणे लागवड करता येते.

३. चारा पौष्टिक व रुचकर असून, यामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने मिळतात.

४) हा चारा स्वादिष्ट, रुचकर व रसाळ असल्याने जनावरे तो खूप आवडीने खातात.

------------------------------

संपर्क ः डॉ. एस. एस. कदम, ९८३३५४०९१२

(पशुधन प्रक्षेत्र संकुल, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, गोरेगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IMD Rain Predication : चिंता वाढणार: राज्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस; मराठवाडा, विदर्भात खंड पडणार ?

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT