BT Cotton
BT Cotton Agrowon
ॲग्रो गाईड

बीटी कपाशी समस्यांवर आधारित लागवड व्यवस्थापन

जितेंद्र दुर्गे, सविता कणसे

बीटी कपाशी उत्पादकता वाढीसाठी सुधारित चौफुली पद्धतीने तसेच नावीन्यपूर्ण सुधारित जोडओळ पद्धतीने बीटी कपाशी लागवड करणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे येणाऱ्या संभाव्य समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. सुधारित लागवड पद्धतींमुळे कपाशी उत्पादकतेत वाढ होऊन कपाशीचा दर्जा आणि प्रत राखण्यास मदत होईल.

विषम पद्धतीने लागवडीमुळे येणाऱ्या समस्या ः
विषम पद्धतीने बीटी कपाशीची लागवड करताना, शेताच्या एका दिशेने २ ओळींमधील राखावयाच्या अंतरानुसार (उदा.४ फूट) शेतात काकर (हलक्या सरी) पाडून घेतल्या जातात. त्यानंतर बीटी कपाशी बियाण्यांची १ ते दीड फूट अंतरावर टोकण पद्धतीने लागवड केली जाते. या प्रचलित विषम पद्धतीचे विविध तोटे आहेत.

तोटे ः
- दोन झाडांत एकसारखे अंतर राखले जात नाही. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत पीक दाटते.
- बियाणे खर्चात वाढ होते.
- उभी-आडवी डवरणी (कोळपणी) करता येत नाही.
- उभ्या पिकात तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांवर अवलंबून राहावे लागते.
- तण, कीड व रोगांच्या बंदोबस्तासाठी फवारणी केवळ एकाच दिशेने करता येते.
- पिकाची दाटी वाढल्यामुळे कापूस वेचणीवेळी समस्या येते. परिणामी, वेचणी खर्चात वाढ होते.
- दाटीमुळे वाढीच्या अवस्थेत ओलीत करण्यास अडचणी येतात. स्प्रिंकलरचा वापर करता येत नाही. दांडातून सरीद्वारे देखील पाणी देताना अडचणी येतात.
- रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
- पिकाची निगराणी व निरीक्षण योग्य प्रकारे करता येत नाही.

मागील हंगामात बीटी कपाशीमध्ये आलेल्या समस्या ः
- जास्त प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव.
- अधिक प्रमाणात बोंडसड.
- कमी कालावधीत जास्त तीव्रतेच्या झालेल्या पावसामुळे आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव.
- पिकाच्या अवास्तव वाढीमुळे पानांवरील बुरशीजन्य व जिवाणूजन्य ठिपक्यांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला.
- सततच्या पावसामुळे पाणथळ जमिनीतील कपाशी पीक अकाली पिवळे पडले.
- रस शोषणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे कोकडा, लाल्या आणि चिकट्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला.
- कपाशी लागवडीनंतर पावसातील खंड आणि वाढलेले तापमान यामुळे रोप अवस्थेत झालेला वाणीचा प्रादुर्भाव तसेत मूळसडची समस्या.
- अचानक झालेला अतितीव्र पाऊस आणि त्यानंतरच्या तापमान वाढीमुळे पातीगळ आणि बाळबोंडांची गळ दिसून आली.
- पिकात दाटी वाढल्यामुळे कापूस वेचणीवेळी अडचणी येऊन मजुरी खर्चात वाढ.

बीटी कपाशीसाठी सुधारित चौफुली पद्धत ः
या पद्धतीने लागवडीसाठी शेताच्या उत्तर-दक्षिण दिशेने दोन ओळींत ४ फूट अंतर राखून काकरीच्या साह्याने हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. याच्या विरुद्ध दिशने सोयाबीनच्या दीड फूटी काकरीद्वारे शेताच्या पूर्व-पश्‍चिम दिशेने आडव्या हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजे शेतात ४ फूट बाय दीड फूट याप्रमाणे चौफुल्या तयार होतील. तयार झालेल्या प्रत्येक चौफुलीवर बीटी कपाशीचे फक्त १ बियाणे टोकण पद्धतीने लावावे.

सुधारित जोडओळ पद्धत ः
सुधारीत जोडओळ पद्धतीने लागवड करताना प्रचलित विषम पद्धतीमध्ये किंवा सुधारित चौफली पद्धतीमध्ये राखावयाच्या दोन ओळींतील अंतर कमी करावे. दोन ओळींत साधारणपणे ३ फूट अंतर ठेवावे. अशाप्रकारे ३ फूट काकरीच्या साह्याने शेतात उत्तर-दक्षिण दिशेने हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. त्यानंतर त्याच्या विरूद्ध दिशने म्हणजेच पूर्व-पश्चिम दिशेने शेतात सोयाबीनच्या काकरीने आडव्या हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजे शेतात ३ बाय १.५ फूट याप्रमाणे चौफुल्या तयार होतील. त्यानंतर प्रत्येक दोन ओळींतील चौफुल्यांवर बीटी कपाशीचे प्रति चौफुली १ बियाणे लावावे. असे करताना प्रत्येक तिसरी ओळ रिकामी ठेवावी. म्हणजेच प्रत्येक जोडओळीनंतर तिसरी ओळ रिकामी राहील. अशाप्रकारे जोडओळ पद्धतीने बीटी कपाशीची लागवड शक्य होते.

फायदे ः
- कमी प्रमाणात बियाणे लागते.
- रासायनिक खतांची बचत होते.
- प्रत्येक तिसरी ओळ रिकामी ठेवल्यामुळे शेतात फिरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होते. त्यामुळे पिकाची निगराणी आणि निरीक्षण शक्य होते.
- पीक संरक्षणासाठीची फवारणी सुलभरीत्या दोन्ही दिशेने करता येते.
- आंतरमशागतीवेळी डवरणी (कोळपणी) उभ्या-आडव्या दिशेने म्हणजेच दोन्ही बाजूंनी शक्य होते.
- उभ्या पिकातील तण नियंत्रणासाठी तणनाशकावरील निर्भरता कमी होते.
- प्रत्येक तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी सरी पाडल्यानंतर दांडाद्वारे ओलीत करता येते. किंवा त्या ठिकाणी स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यास जागा उपलब्ध होते. दाटी झाली तरी दांडाद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे ओलीत करता येते.
- पुरेशी जागा उपलब्ध झाल्यामुळे शेतात सूर्यप्रकाशाचे एकसमान वितरण होते, हवा खेळती राहते. त्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- प्रत्येक तिसरी ओळ रिकामी ठेवल्यामुळे शेवटच्या कपाशी वेचणीपर्यंत मजुरांना मोकळी जागा उपलब्ध राहते.

महत्त्वाची सूचना ः
- जोडओळ पद्धतीचा अवलंब करताना दोन ओळींत राखावयाचे अंतर हे जमिनीचा प्रकार, पिकाचा प्रकार (कोरडवाहू किंवा ओलिताखाली), वाणाचा प्रकार, पीक व्यवस्थापन आदी बाबी विचारात घ्याव्यात. तसेच प्रचलित विषम पद्धतीने लागवड करताना दोन ओळींत राखलेले अंतर, पिकाची प्रचलित पद्धतीमध्ये होणारी वाढ इत्यादी ध्यानात घेऊन लागवडीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा.
- मध्यम जमिनीमध्ये २.५ ते ३ फूट, भारी जमिनीमध्ये ३.५ ते ४ फूट या प्रकारे दोन ओळींतील अंतर राखता येईल.

उत्पाकता वाढीसाठी आवश्यक बाबी ः
- लागवडीसाठी निवडलेल्या शेतात उभी-आडवी खोल नांगरणी करावी.
- बीटी कपाशीची लागवड सुधारित चौफुली पद्धत किंवा सुधारित जोडओळ पद्धत करावी.
- अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करताना नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, फेरस, बोरॉन, झिंक, मॉलिब्डेनम आणि सिलीकॉन या घटकांचा समतोल वापर करावा.
- प्रचलित किंवा सुधारित चौफुली पद्धतीने लागवड केली असल्यास, पीक ४५ ते ५० दिवसांचे असताना दोन ओळींच्या मध्ये डवऱ्याच्या (कोळप्याला) जानोळ्याला दोरी बांधून सऱ्या पाडून घ्याव्यात.
- लागवड सुधारित जोडओळ पद्धतीने केली असल्यास, पीक ४५-५० दिवसांचे असताना दोन जोडओळींच्या मध्ये (म्हणजेच रिकाम्या ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या जागी) डवऱ्याच्या (कोळप्याच्या) जानोळ्याला दोरी बांधून सऱ्या पाडून घ्याव्यात.
- प्रचलित किंवा, चौफुली किंवा सुधारित जोडओळ पद्धतीने लागवड केलेले बीटी कपाशीचे पीक ७० ते ८० दिवसांचे असताना शेंडे खुडून घ्यावेत.
- पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाती अवस्था सुरू होताना (पीक ३५ ते ४० दिवसांचे असताना) सर्व शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या शेतात पिकाच्या उंचीपेक्षा ३-४ फूट उंचीचे एकरी १२-१५ पक्षी थांबे उभारावेत. तसेच कामगंध सापळे आणि ट्रायकोकार्ड प्रत्येकी १ प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
- बीटी कपाशीवर रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी या किडींचा तसेच पानांवरील बुरशीजन्य ठिपके यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम अधिक मेटारायझिअम ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडांना मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक युरीया १५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे साध्या पंपाने स्प्रेपंपाचे नोझल काढून किंवा नोझल ढीले करून प्रति प्रादुर्भावग्रस्त झाड २५० ते ३०० मिलि द्रावण खोडावरून सोडावे. तत्पूर्वी प्रादुर्भावग्रस्त झाड पायाचा अंगठा व पहिले बोट यामध्ये पकडून झाडाच्या बुडाजवळची माती घट्ट करावी. तसेच झाडाला बाहेरच्या दिशेने किचिंत तिरका बाक द्यावा.
- गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी,
अ) रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रमाण- प्रति लिटर पाणी)
ट्रायझोफॉस अधिक डेल्टामेथ्रीन १.७ मिलि किंवा
क्लोरोपायरीफॉस अधिक सायपरमेथ्रीन २ मिलि किंवा
इंडोक्झाकार्ब अधिक ॲसिटामिप्रीड १ मिलि किंवा
इंडोक्झाकार्ब अधिक सायपरमेथ्रीन १.२ मिलि

ब) जैविक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
- बॅसीलस थुरीन्जीएन्सीस ४ ग्रॅम किंवा
- बिव्हेरिया बॅसियाना ४ ग्रॅम
याप्रमाणे फवारणी करावी.

- प्रत्येक हंगामात पातीगळची समस्या आढळणाऱ्या शेतात बीटी कपाशीचे पीक पाती अवस्थेत येण्याच्या सुरुवातीला नॅप्थेलीक ॲसेटिक ॲसिड (एनएए) ०.५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १२ ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी. तसेच शेतामध्ये एकरी २ ते ३ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाकून चांगले मिसळून घ्यावे.
- रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशीया किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे असताना एकरी २५ ते ३० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच खत व्यवस्थापन करताना प्रत्येकवेळी सिलिकॉन ५ किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे. किंवा विद्राव्य सिलिकॉन १ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- पानांवरील बुरशीजन्य व जिवाणूजन्य ठिपके तसेच बोंडसडचा प्रादुर्भाव झाल्यास,
कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT