डॉ. सचिन शिंदे, प्रा. प्रवीण मताई
Water Conservation Planning Update : मूलस्थानी जलसंधारणाच्या कामांबरोबरच मृद्, जलसंधारणाचे अभियांत्रिकी उपचार पाणलोट क्षेत्र विकासाच्या माथा ते पायथा या सूत्रानुसार करावेत. जमिनीच्या उतारानुसार जमिनीचे निरनिराळे भाग करावेत. त्यानुसार बांध टाकावेत, बांधाच्या आतील भागाचे सपाटीकरण करावे.
सध्याच्या काळात फुटलेले बांध दुरुस्त करावेत. योग्य ठिकाणी सांडवा ठेवावा. त्यामुळे जादा झालेले पाणी सुरक्षितरीत्या शेताबाहेर काढता येते. सांडव्यामधून माती वाहून जाऊ नये म्हणून त्यामध्ये दगडी बांध घालावेत.
मातीचे बांध पुन्हा पावसाने फुटू नयेत यासाठी पावसाळ्यात त्यावर स्टायलो, मद्रास अंजन, खस, सुबाभूळ, ग्लिरिसिडियाची लागवड करावी. येत्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील पाणी आणि माती आपल्याच शेतात राहील याची काळजी घ्यावी.
समपातळी चर :
पाणलोट क्षेत्रातील डोंगराच्या उताराहून खालील भागात वेगात वाहत येणारे पाणी समपातळी चरामध्ये अडविले जाते. त्यामुळे पाण्याचा वेग कमी होतो.
पाण्याबरोबर वाहत आलेली माती चरामध्ये साठून राहिल्यामुळे झाडांची वाढ जोमाने होते. समपातळी चरामध्ये साठलेली माती ही दर तीन वर्षांनी काढून टाकून चर पुन्हा पूर्वीप्रमाणे होतील याप्रमाणे व्यवस्थापन ठेवावे.
गली प्लग
पाणलोट क्षेत्रातून वरच्या भागातून पावसाचे पाणी ओहोळांमधून वाहत येते. याला अडथळा निर्माण करण्यासाठी या ओहोळांमध्ये कमी उंचीचे बंधारे तयार करावेत.
बंधाऱ्याच्या खालच्या भागात ५० सेंमी x ५० सेंमी अंतराने घायपाताच्या दोन ओळी लावाव्यात, त्यामुळे बंधाऱ्याला आधार मिळतो. कालांतराने एक नवीन जैविक बांध तेथे तयार होऊन मूळ बंधाऱ्याला संरक्षण मिळेल.
नालाबांध :
नाल्यातून वाहून येणारे पाणी पावसाळ्यानंतर येथे साठून राहते. हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे बांधाच्या खालच्या भागातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. दर दोन ते तीन वर्षांनी नालाबांधामधील गाळ काढावा. त्यामुळे पाणी साठवणक्षमता कायम राहील. नाला बंधाऱ्याच्या एका बाजूला सांडवा दिलेला असतो.
वनराई बंधारा
हा बंधारा नदी-ओहोळांवर बांधला जातो. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो.
यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात. नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशा रीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचाव्यात.
अनघड दगडी बांध
पाणलोट क्षेत्रातील वरच्या भागात घळी नियंत्रणासाठी अनघड दगडी बांध परिणामकारक आहेत. यामुळे वाहत्या पाण्याची गती कमी होते. पाण्याबरोबर वाहून आलेली माती बांधाच्या वरच्या बाजूला साठविली जाते, त्यामुळे जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो.
बांध घालण्याची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्यक आहे.
दगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा. दगड सांधमोड पद्धतीने रचावेत, त्यामुळे दगड मजबूत बसतील. दोन दगडांतील पोकळ्या लहान दगडांनी भरून काढाव्यात.
गॅबियन बंधारा
- जाळीच्या सांगाड्यात दगडांचा जो बांध घातला जातो, त्यास गॅबियन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असेल आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असेल, अशा ठिकाणी प्रवाहामुळे दगडी बांध टिकू शकत नाही. अशा ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त आहे.
- गॅबियन बंधारा बांधावयाच्या नाल्याची रुंदी दहा मीटरपेक्षा अधिक असू नये. नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये. नाल्याच्या पात्रात ज्या ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावयाचा आहे, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंकडील काठ चांगले खोदून घ्यावेत.
नंतर बांध बांधावयाच्या जागेवर योग्य आकाराची लोखंडी जाळी अंथरावी, नंतर त्यात दगड रचून घ्यावेत. मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात. दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी.
- कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावा. गॅबियन बंधाऱ्यामुळे पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते.
समपातळी बांधबंदिस्ती
१) शेतातील वाहते पाणी अडविण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने घातलेल्या मातीच्या अथवा दगडाच्या अडथळ्यास बांध असे म्हणतात.
२) साधारणतः सहा टक्के अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात लागवडीयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात.
३) समपातळी बांधाच्या उपाययोजनेमुळे वाहत्या पाण्याचा संकलन काळ वाढतो. जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते. सलग ढाळाचे विभाजन झाल्याने वाहणाऱ्या पाण्याची गती रोखली जाऊन धूप कमी होते, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
ढालीची बांधबंदिस्ती
१) अनियमित अथवा अतिपावसाच्या प्रदेशात ढालीच्या बांधाची उपाययोजना केली जाते. या स्वरूपाच्या उपाययोजनेमध्ये बांधामधील जास्तीचे पाणी अधुपकारी गतीच्या आधारे बांधाच्या बाहेर काढून दिले जाते.
पुनर्भरण चर
१) बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास टाळून जमिनीच्या पृष्ठभागाखालील पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चराची उपाययोजना अतिशय उपयुक्त आहे.
२) चरांमध्ये ६ ते ८ महिने पुनर्भरणाची प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे त्याच्या खालच्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सदर उपाययोजना उपयुक्त आहे.
पाणी साठविण्यासाठी शेततळे
येत्या काळात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व कौशल्याने करावे लागणार आहे. काही वेळेस पाऊस पडतच नाही, तर कधी-कधी तो ऐन मोक्याच्या वेळेस ताण देतो. अशा वेळेस संरक्षित सिंचनाच्या आधारे पिकांना वाचवावे लागते.
शेततळ्याच्या उपाययोजनेमुळे संरक्षित पाणी देणे शक्य असल्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये ही उपाययोजना महत्त्वाची समजली जाते.
१) पावसाचे वाहून जाणारे पाणी जमा करण्यासाठी आणि त्याचा पुन्हा वापर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रात योग्य ठिकाणी शेततळे खोदावे.
२) जमिनीवरून वाहून जाणारे पाणी शेततळ्याकडे वळविण्यासाठी योग्य ठिकाणी गवत लागवड केलेली चारी तयार करावी. शेततळ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते.
३) शेततळ्यास योग्य पद्धतीचे अस्तरीकरण केल्यास त्यामध्ये पाणी जास्त काळ साठविता येते. हे साठविलेले पाणी पिकास आणि फळबागेस निकडीच्या अवस्थेत संरक्षित पाणी म्हणून वापरावे.
पाझर तलाव
१) पाझर तलाव म्हणजे नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बांधलेला आणि पाणलोटक्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून तो जास्तीत जास्त दिवस साठवून, तो जमिनीत मुरवून त्या क्षेत्रातून भूजलाची पातळी वेगाने वाढविणाऱ्या बंधाऱ्यामुळे तयार होणारा जलाशय.
२) पाणलोटक्षेत्रात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन शेतीकरिता व त्या क्षेत्रातील भूजल पुनर्भरणाकरिता त्याचा वापर होऊ शकतो.
३) पाझर तलावामुळे पाण्याबरोबर वाहून जाणारी सुपीक मातीदेखील अडविली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी दुष्काळी प्रदेशात पाझर तलावाचे बांधकाम करतात.
४) पाझर तलावाचे बांधकाम करताना अशा पद्धतीने करावे की, पावसाळ्यात तलाव संपूर्ण भरावा आणि हिवाळ्यापर्यंत सर्व पाणी पाझरून/ मुरून आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.
५) ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते, त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरास योग्य असावा लागतो.
तांत्रिक दृष्टिकोनातून पाझर तलावांचे नियोजन
१) पाझर तलावाचे मुख्य कार्य म्हणजे त्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे. पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला, तरच त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणून पाझर तलाव हा एखाद्या भारी अथवा अभेद्य जमिनीवर बांधू नये, की ज्यामुळे पाझर तलावाच्या मुख्य कार्याला बाधा होईल.
२) पाझर तलाव अशा ठिकाणी बांधावा, की तेथील जमिनीचा वरचा थर सच्छिद्र असेल आणि त्याखालच्या कमीत कमी तीन मीटर जाडीचा थर हा जास्तीत जास्त झिजलेला असेल. अशा प्रकारच्या जमिनीवर बांधलेल्या तलावामुळे भूजल पुनर्भरणाचा वेग वाढतो.
३) पाझर तलावाच्या खालच्या बाजूला अथवा परिणाम क्षेत्रात पिकायोग्य जमीन मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. अशी मोठ्या प्रमाणातील शेतजमीन असल्याने पाझर तलावाचा जास्तीत जास्त उपयोग करून शक्य होते.
त्याचप्रमाणे या भागात अनेक विहिरी असणे किंवा नवीन विहिरी खोदण्यालायक क्षेत्र असणे गरजेचे आहे, की जेणेकरून त्या भागाला सिंचनाखाली आणणे सहजशक्य होईल. लहानात लहान पाझर तलावाच्या क्षेत्राची लांबी एक किमी असते.
४) पाझर तलावामध्ये जास्त होणारे पाणी काढून टाकण्यासाठी सांडव्याची साधी, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि कार्यक्षम व्यवस्था करता येणे भौगोलिकदृष्ट्या शक्य व्हावयास हवे.
५) पुरेशा सच्छिद्र भूस्तरावर पाझर तलाव बांधताना तो एखाद्या खोल दरीसारख्या भागात बांधावा, जेणेकरून खोल तळे तयार होईल. पाणी कमीत कमी क्षेत्रावर पसरेल. उथळ तळ्यापेक्षा असे खोल तळे तयार केल्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे ऊन-वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
कमीत कमी जमीन पाण्याखाली बुडते. दुसरा फायदा म्हणजे तलावातील पाणी अडविण्याकरिता निवडलेले क्षेत्र जर पुरेसे सच्छिद्र नसेल तर त्याचे साठवण क्षेत्र वाढवावे, ज्यायोगे अधिक पाणी जमिनीत मुरू शकेल.
६) ज्या पाणलोटक्षेत्रामधून पाझर तलावामध्ये पाणी येणार आहे, त्यात योग्य प्रमाणात झाडेझुडपे व गवत असावे, की ज्यामुळे मातीची धूप होणार नाही. जर अशा प्रकारची व्यवस्था नसेल, तर त्या पाणलोटक्षेत्रात मृद्संधारणाची कामे हाती घ्यावीत; अन्यथा ती वाहून आलेली माती पाझर तलावात साठून त्याची साठवणक्षमता कमी होऊ शकते.
७) पाझर तलावाचा भराव तयार करण्याकरिता योग्य प्रकारची माती इतर बांधकाम साहित्य त्या क्षेत्रातच उपलब्ध होणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. बाहेरून साहित्य वाहून आणून भराव तयार करण्यामुळे खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते.
संपर्क: डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९० - (विषय विशेषज्ञ,कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.