Wheat Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Wheat Sowing : उशिरा गहू पेरणीचे नियोजन

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्लू-१९९४),निफाड ३४ (एनआयएडब्लू-३४) किंवा एकेएडब्लू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे लागते.

डाॅ. आदिनाथ ताकटे

यंदा परतीच्या पावसाने (Rainfall) हजेरी लावल्याने जमिनीत वाफसा येण्यास विलंब लागला.मशागतीस पुरेसा वेळही मिळाला नाही.त्याच बरोबर ऊस तोडणीनंतर (Sugarcane Harvesting),खरीप पिकांच्या काढणीस (Kharif Crop Harvesting) उशीर होण्याने गहू पिकांची लागवड (Wheat Cultivation) उशिरा करावी लागते.

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा परतल्याने जमिनीची मशागत करण्यास उशीर झाल्याने लागवड क्षेत्रात निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे. बागायत उशिरा पेरणीची शिफारसही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे.मात्र काही शेतकरी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी करतात.वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते.

गव्हाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर अवलंबून असते.गहू वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते.

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्लू-१९९४),निफाड ३४ एनआयएडब्लू-३४ किंवा एकेएडब्लू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी.

बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाऱ्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ सेंमी अंतरावर पेरावे.

पेरणी करते वेळी निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश (९०:६०:४० नत्र:स्फुरद :पालाश किलो प्रती हेक्टरी ) म्हणजेच ९७ किलो युरिया,३७५ किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता ९७ किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.

गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.

पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोल करावी.त्यामुळे उगवण चांगली होते.पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता एकेरी करावी.म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी.

जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसा दरम्यान द्यावे.बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.

जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल,तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी गव्हास पाणी द्यावे.दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.

शिफारशीत जाती ः

१) फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) ः

बागायत वेळेवर व उशिरा पेरणीसाठी

बागायतीत वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी शिफारस.

तांबेरा रोगास प्रतिकारक.

प्रथिने १२ टक्यांपेक्षा जास्त.

चपातीसाठी उत्तम.

पक्व होण्याचा कालावधी बागायतीत वेळेवर ११५ दिवस आणि बागायतीत उशिरा पेरणीखाली ११० दिवस.

उत्पादनक्षमता ः

- बागायतीत वेळेवर ४५ ते ५० क्विं/हेक्टरी

- बागायतीत उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ क्विं/हेक्टरी

२) एनआयएडब्लू ३४

(निफाड ३४)

द्विपकल्पीय विभागात बागायतीत उशिरा पेरणीसाठी शिफारस.

मध्यम टपोरे दाणे, प्रथिने १३ टक्यांपेक्षा अधिक.

तांबेरा रोगास प्रतिकारक

चपातीसाठी उत्तम

पक्व होण्याचा कालावधी १०० दिवस

उत्पादनक्षमता ः उशिरा पेरणी ३५ ते ४० क्विं/हेक्टरी.

- डॉ.आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT