Cotton Bollworm  Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Bollworm : कपाशीवरील गुलाबी अळी व्यवस्थापन

Cotton Bollworm Management : गुलाबी बोंड अळी ही कपाशीवरील एक अतिशय उपद्रवी कीड आहे. बीटी कपाशीलाही या किडीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झाल्यामुळे २०१७-१८ च्या कापूस हंगामापासून महाराष्ट्रात कपाशीचे लक्षणीय नुकसान करत आहे.

Team Agrowon

डॉ. बाबासाहेब फंड, डॉ. विश्‍लेष नगरारे, डॉ. जी. टी. बेहेरे, डॉ. वाय. जी. प्रसाद

Cotton Bondali : गुलाबी बोंड अळी ही कपाशीवरील एक अतिशय उपद्रवी कीड आहे. बीटी कपाशीलाही या किडीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झाल्यामुळे २०१७-१८ च्या कापूस हंगामापासून महाराष्ट्रात कपाशीचे लक्षणीय नुकसान करत आहे. मॉन्सून पाऊस (८०-१०० मिमी) पडल्यावर आणि जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास जून महिन्यात महाराष्ट्रात कपाशीच्या लागवडीची शिफारस केली जाते.

या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतांश कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाने ओढ दिली. दरवर्षीच्या तुलनेत कपाशीची लागवड १५ ते २० दिवस उशिराने झाली असून, सध्या बहुतांश भागातील कपाशीचे पीक हे पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत (५० ते ६० दिवस) आहे. या अवस्थेतील कपाशी पीक गुलाबी बोंड अळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावास संवेदनशील असते. हे लक्षात घेऊन आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करत राहणे गरजेचे आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास गरजेनुसार वेळेत उपाय योजना करणे शक्य होते.

वास्तविक गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पूर्वहंगामी म्हणजेच मॉन्सूनपूर्व (एप्रिल - मे) कपाशीची लागवड न करण्याचीच शिफारस केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने केलेली आहे. तरीही राज्याच्या काही भागांत (जळगाव, जालना, धुळे) पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली जाते. हंगामी पिकाच्या तुलनेत या पिकाला पात्या व फुले लवकर येतात. त्यामुळे मागील १५-२० दिवसांपूर्वीच या भागात कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

हंगामी लागवड केलेले कपाशीचे पीकसुद्धा सध्या ५०-६० दिवसांचे झाले असून, पात्या -फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने चालू आठवड्यापासून (ऑगस्टचा शेवटचा आठवडा) काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे डोमकळ्या दिसून येत आहेत. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नागपूर व वर्धा जिल्ह्यांतील कापूस पट्ट्यात केलेल्या पाहणी दौऱ्यात ५०-६० दिवसांच्या कपाशीवर २ टक्के ते ३ टक्केपर्यंत डोमकळ्या (प्रादुर्भावग्रस्त फुले) आढळून आल्या आहेत.

संस्थेच्या नागपूर येथील प्रायोगिक क्षेत्रावरही चालू आठवड्यापासून कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची नोंद झाली आहे. सध्या तरी हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र अळीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पुढील प्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना :
१) पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन (हेक्टरी पाच) याप्रमाणे पेक्टीनोल्यूर अथवा गॉसिप्ल्यूर हे सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे पीक ४५ दिवसांचे झाल्यावर लावावेत. सापळ्यात अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी. (तक्ता १).
२) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कपाशीचे पीक पात्या लागण्याच्या अवस्थेत (५०-६० दिवसांचे) असताना ५ टक्के निंबोळी अर्क ५०० मिलि अधिक नीम तेल ५० मिलि + डिटर्जंट पावडर १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे पतंगाना अंडी घालण्यापासून परावृत्त होतात. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात रसशोषक किडींनाही प्रतिबंध होतो.

३) प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. त्यामुळे पुढील प्रादुर्भाव रोखता येईल. १० टक्के डोमकळ्या किंवा प्रादुर्भावग्रस्त फुले ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत.
४) कपाशीला हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला अनिश्‍चित स्वरूपात एकरी २० बोंडाचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी (१० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
५) उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्र कीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे कपाशीच्या फुले लागण्याच्या अवस्थेपासून १५ दिवसांच्या अंतराने तीनदा प्रसारण करावा. त्यामुळे चांगले नियंत्रण मिळते. मात्र या जैविक घटकांचा वापर करण्यापूर्वी किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये.

तक्ता १ ः कपाशीच्या वाढीच्या अवस्थानुरूप गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशके.

पेरणीनंतर दिवस --- कीटकनाशक व मात्रा (प्रति १० लिटर पाणी) --- पीक वाढीची अवस्था
५० ते ६० --- ५ टक्के निंबोळी अर्क + नीम तेल + डिटर्जंट पावडर --- ५०० मिलि + ५० मिलि + १० ग्रॅम --- पात्या लागणे
६० ते ९० --- प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) ३० मिलि अथवा क्विनॉलफॉस (२५ टक्के एएफ) २० मिलि अथवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) २५ मिलि --- फुलोरा ते बोंडे लागणे
९० ते १२० --- इंडोक्साकार्ब (१४.५ एससी) १० मिलि अथवा इमामेक्टिन बेंजोएट (५ टक्के एसजी) ५ ग्रॅम अथवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) २५ मिलि --- बोंडे लागणे ते बोंडे परिपक्वता
१२० पासून पुढे --सायपरमेथ्रिन (१० टक्के ईसी) १०-१५ मिलि अथवा सायपरमेथ्रिन (२५ टक्के ईसी) ४-६ मिलि अथवा अल्फा सायपरमेथ्रिन (१० टक्के ईसी) ६ मिलि अथवा लॅम्बडा सायहलोथ्रीन (५ ईसी) १० मिलि अथवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के ईसी) १० मिलि अथवा फेनप्रोपाथ्रीन (१० टक्के ईसी) १५-२० मिलि --- बोंडे परिपक्वता ते कापूस वेचणी

कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी :
रसशोषक किडीचा उद्रेक टाळणे, किडीमध्ये कीटकनाशकांप्रती प्रतिकारकक्षमता वाढीस लागू नये, तसेच फवारणी करणाऱ्या व्यक्तीस विषबाधा होऊ नये, इ. साठी खालील बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
१) पीक वाढीच्या सुरुवातीच्या ६० दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.
२) पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रीन, लॅम्बडा सायहलोथ्रीन, फेनव्हलरेट, डेल्टामेथ्रीन, फेनप्रोपाथ्रीन इ.) कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या १२० दिवसांपर्यंत वापर करू नये.
३) एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
४) त्वचेला हानी, इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हातांनी हाताळू नयेत. हातामोज्यांचा वापर करावा.
५) श्‍वासाद्वारे शरीरात जाऊन विषबाधा होऊ नये यासाठी फवारणी करताना नाक आणि तोंडाला मास्क लावावा.
६) फवारणीचे तुषार/शिंतोडे डोळ्यांत गेल्यास गंभीर इजा होऊन दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना गॉगल किंवा संरक्षक हूड लावावे.
७) विषबाधेची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करून घ्यावेत.

डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५
(केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

टीप ः शिफारस केलेली कीटकानशके हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीची (उदा. नॅपसॅक पंप) आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT