Humani Control Agrowon
ॲग्रो गाईड

Humani Ali Control : हुमणी अळीचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे

Soybean Pest : सद्यःस्थितीत मराठवाड्यात हुमणी या बहुभक्षी अळीचा खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ज्वारी, मका यासह ऊस या नगदी पिकावरही प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या किडीची अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडून मोठे नुकसान करते.

प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार पिकांचे ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हलकी जमीन व मध्यम ते कमी पाऊस असे हुमणीसाठी अनुकूल वातावरण मागील काही वर्षापासून मराठवाड्यामध्ये दिसत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन करण्याची गरज असते.

जीवनक्रम :
-प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था.

यातील अंडी, अळी आणि कोष या अवस्था जमिनीखालीच पूर्ण होतात.
फक्त प्रौढ भुंगेरे पहिल्या चांगल्या पावसानंतर (मे, जून, जुलै) जमिनीतून बाहेर निघतात. संध्याकाळी बाभूळ किंवा कडुनिंबाच्या झाडावर बसून रात्रभर पाने खातात. या काळात नर व मादी यांचे मिलन होते. मिलनानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये ७ ते १२ सें.मी. खोलीपर्यंत ५० ते ७० अंडी घालते. ही अंडी ९ ते २४ दिवसांमध्ये उबतात.

त्यामधून अळ्या बाहेर पडतात. अळी तीन अवस्थेतून कोषावस्थेत जाते. पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेले पदार्थ खाते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी (साधारण ऑगष्ट ते नोव्हेंबरमध्ये) पिकांची मुळे कुरतडून त्यावर उपजीविका करते. अळीची पूर्ण वाढ ६-९ महिन्यांमध्ये होऊन ती जमिनीत २० ते ४० सें.मी. खोलीवर मातीचे आवरण तयार करून त्यात कोषावस्थेत जाते. कोषावस्था २-३ आठवड्यांची (नोव्हेंबरमध्ये) असते.

या कोषातून प्रौढ प्रामुख्याने नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात निघाले तरी जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. जानेवारी ते मे महिन्यातील पहिल्या पावसापर्यंत त्यांची सुप्तावस्था चालते. अशा प्रकारे हुमणी किडीची एका वर्षामध्ये केवळ एकच पिढी तयार होते.

खाद्य वनस्पती :
प्रौढ भुंगेरे व अळी यांच्या खाद्य वनस्पती वेगवेगळ्या आहेत.
प्रौढ भुंगेरे : हे बाभूळ, कडुनिंब, बोर, चिंच इ. झाडांची पाने खातात.
अळी : अळी विविध पिकांच्या मुळे कुरतडून त्यावर उपजीविका करते. उदा. सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, आले, भाजीपाला पिके इ.

नुकसानीचा प्रकार :
या किडीची अळी अवस्था ही जमिनीत राहून पिकाची मुळे कुरतडून खाऊन नुकसान पोहोचवते. त्यामुळे झाडे सुरुवातीला पिवळे पडून सुकतात. नंतर वाळून जातात. या अळीचा प्रादुर्भाव एका रेषेत दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळलेली दिसतात. झाडांची मुळे कुरतडल्यामुळे अशी प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरीत्या उपटली जातात. जोराच्या वादळातही ही झाडे कोलमडून पडल्याचे दिसले आहे.

आर्थिक नुकसान पातळी : एक अळी प्रति चौरस मीटर.

सद्यःस्थितीतील अळीचे व्यवस्थापन :

- पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी. निंदणी आणि कोळपणी अशा आंतरमशागतीच्या कामामध्ये हुमणीच्या अळ्या पृष्ठभागावर येतात. त्यांना पक्षी वेचून खातात किंवा त्या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात. शक्यतो अशा अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
-शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी देऊन काही काळ साचवून ठेवावे. या अळ्या गुदमरून मरतील.
-शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
-प्रथम अवस्थेतील अळ्या शेणखतात आढळून आल्यास मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशी एक किलो प्रति टन शेणखतात मिसळावी.
-पिकामध्ये वापरताना मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली दहा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापरावी. ही बुरशी हुमणीच्या अळ्यांना रोगग्रस्त करते.
- ऊस पिकामध्ये फारच अधिक प्रादुर्भाव असल्याच्या स्थितीमध्ये फिप्रोनील (४० टक्के) + इमिडाक्लोप्रिड (४० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ऊस पिकामध्ये आळवणी करावी.
- कार्बोफ्युरॉन (३ टक्के सीजी) ३३.३ किलो प्रति हेक्टर किंवा फिप्रोनील (४० टक्के) + इमिडाक्लोप्रिड (४० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे भुईमूग पिकामध्ये आळवणी करावी.

डॉ. अनंत लाड, (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४
डॉ. राजरतन खंदारे, (संशोधन सहयोगी), ८२७५६०३००९
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
---------------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT